Hacked
ता.१८-०७-२०२० सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात मंगळवार दि.२१पासून शंभर टक्के लाॅकडाऊन आशा आशयाचे मेसेज पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांचा हवाला देऊन सोशल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारे तथ्य नाही . तथापि दिवसेंदिवस जिल्ह्यात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या पाहता सोशल डिस्टंसिंगचे नियम, मास्कचा अनिवार्य वापर आणि वैयक्तिक स्वच्छता याबाबतच्या संबंधित नियमांची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना दिले आहेत, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे .गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांशी झूम द्वारे संवाद साधला. यामध्ये तूर्तास लॉकडाऊन करू नये, पण कोरोणा प्रादुर्भाव टाळण्यासाठीच्या उपाययोजनांची , सोशल डिस्टंसिंग संदर्भातील नियमांची अधिक कडक व काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात मंगळवार दिनांक 21 जुलै पासून 31 जुलै पर्यंत शंभर टक्के लाॅक डाऊन होणार अशा आशयाच्या कोणत्याही बातम्यांवर कृपया जनतेने विश्वास ठेवू नये हे असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे . त्याच वेळी सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळल्यास, अनावश्यक गर्दी केल्यास सर्व लोकप्रतिनिधींची व यंत्रणांची पुन्हा बैठक घेऊन लाॅकडाउन संदर्भात पुढील निर्णय घेण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे.तसेच नागरिकांमध्ये कोणालाही ताप, सर्दी ,खोकला, मळमळ ,वास न येणे ,मानसिक गोंधळलेली स्थिती , स्नायू दुखी आदींबाबत कोणतीही लक्षणे जाणवल्यास तात्काळ फिवर क्लिनिक अथवा आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा . गरोदर स्त्रिया, लहान मुले, 50 वर्षावरील नागरिक तसेच कमोरबिडीटी असणाऱ्यांनी अधिक सजगपणे काळजी घ्यावी .कोणतेही दुखणे अंगावर काढू नये. वेळेवर उपचार सुरू झाल्यास पुढील संभाव्य धोका तसेच वाढणारा प्रादुर्भाव या दोन्ही बाबी टाळता येतील. त्यामुळे दुखणे अंगावर काढू नका . काहीही लक्षणे जाणवल्यास त्वरित आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा. अनावश्यक गर्दी करू नका. मास्कचा वापर अनिवार्यपणे करा. सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळा आणि वैयक्तिक स्वच्छतेबाबत काटेकोर काळजी घ्या ,असे आवाहनही पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
ता.१६-०७-२०२० कातरखटाव प्रतिनिधी : ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण वाढत चालल्यामुळे प्रशासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यास दोन दिवस मुभा मिळाल्यामुळे लॉकडाऊनच्या धास्तीने बुधवारी कातरखटावसह अवघी खेडीपाडी रस्त्यावर आल्याने सोशल डिस्टनिंसगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.तालुक्यात आतापर्यत 7 जणांचा मृत्यू झाला असून 115 जण बाधित आहेत. आतापर्यंत बाहेरून आलेल्या 45 हजार लोकांची नोंद झाली आहे. कातरखटाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विभागात कालअखेर बाहेरून आलेल्या लोंकाची संख्या 4291 झाली आहे. प्रशासनाने दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे कातरखटावच्या प्रमुख बाजारपेठेत खरेदीसाठी तोबा गर्दी झाली होती. करोना रोखण्यासाठी प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केल्याने बाजारपेठेला जत्रेचं स्वरूप आलेलं दिसतं होतं. शुक्रवारपासून बाजारपेठ दहा दिवस बंद राहणार असली तरी अत्यावश्यक सेवा मेडिकल, दूध सेवा ठराविक काळात सुरू राहणार आहेत. कातरखटाव भागात काही ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर केले आहेत. असे असताना नागरिक खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी नियमाचे उल्लंघन करू नये. व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल. अशोक पाटील, पोलीस निरीक्षक, वडूज.
ता.१५-०७-२०२० सांगली प्रतिनिधी : राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या कॉंग्रेसच्या नेत्या श्रीमती जयश्री पाटील यांना परावृत्त करण्यासाठी कॉंग्रेसकडून त्यांची मनधरणी करण्यात येत आहे. युवा नेते विशाल पाटील, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज त्यांची भेट घेऊन चर्चा केली. तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत उद्या (बुधवारी) मुंबईत बैठक होणार आहे.कॉंग्रेसचे नेते मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनीही जयश्री पाटील यांना राष्ट्रवादी प्रवेशापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. याबाबत त्यांनी आज मुंबईत प्रदेशाध्यक्षांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष बाळासाहे थोरात यांच्या निवासस्थानी उद्या (बुधवारी) दुपारी चार वाजता बैठक होणार आहे. यासाठी जयश्री पाटील, डॉ. सिकंदर जमादार, नगरसेवक संतोष पाटील यांच्यासह अनेक कायकर्ते, पदाधिकारी जाणार आहेत. श्रीमती पाटील यांनी आज कॉंग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी, ग्रामीण भागातील कार्यकर्ते, महापालिकेचे नगरसेवक यांच्याशी चर्चा केली. यावेळी काही कायकर्त्यांनी त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. आज युवा नेते विशाल पाटील यांनीही विजय बंगला येथे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या निर्णयावर त्यांनी पुनर्विचार करावा. कॉंग्रेसमधून बाहेर पडू नये असे मत मांडल्याचे समजते. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनीही त्यांची भेट घेऊन कॉंग्रेसमध्येच थांबण्याबाबत विनंती केली. चार महिन्यांपुर्वीच चर्चा कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून दखल घेतली जात नसल्याने गेले काही श्रीमती जयश्री पाटील महिने नाराज आहेत. चार महिन्यापुर्वीच त्या राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांच्याशी त्यांची चर्चा झाली होती. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे मिरजेत गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या कार्यक्रमासाठी आले असताना त्यांचीही भेट श्रीमती पाटील यांनी घेतली होती. या कार्यक्रमास कॉंग्रेसचे अनेक नेते असतानाही त्या कार्यक्रमास गेल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांची नाराजी स्पष्ट झाली होती. त्यानंतर कोरोनाच्या काळात ही चर्चा थांबली होती. आता गेले दोन दिवस पुन्हा जयश्री पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे.
ता.१४-०७-२०२० सांगली प्रतिनिधी : काँग्रेसनेत्या जयश्री पाटील या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. काँग्रेसमधील गटबाजी आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने हा निर्णय त्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या प्रवेशाला राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरून ग्रिन सिग्नल मिळाल्याचे समजते.दरम्यान, अंतिम निर्णयासाठी मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. लवकरच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार असल्याचे समजते.काँग्रेसनेते डॉ. पतंगराव कदम, (स्व.) मदन पाटील यांच्या पश्चात शहरात काँग्रेसला बळ देण्याचे काम जयश्री पाटील यांनी केले. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीसह पक्षाच्या विविध पातळीवर कार्यक्रम, आंदोलनात त्या सहभागी असतात. गेल्या महापालिका निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी स्थापनेपासून ते निवडणूक प्रचारातही त्यांनी आघाडी सांभाळली होती. परंतु, त्या तुलनेत काँग्रेसमधून त्यांना व कार्यकर्त्यांना न्याय दिला जात नाही अशी खदखद होती. कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून बळ न दिल्याने विकासकामे होत नसल्याचीही खंत व्यक्त होत आहे. एकूणच या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांतून राष्ट्रवादी प्रवेशासाठी त्यांच्याकडे आग्रह सुरू आहे. याबाबत अनेकवेळा चर्चाही झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते अर्थमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चा सुरू होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशीही चर्चा झाल्याचे समजते.आता कार्यकर्त्यांनी 'राष्ट्रवादीत जाऊ', असा आग्रह धरला आहे. सोमवारी काही नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना जयश्री पाटील यांनी बोलावून तसे स्पष्ट संकेतही दिले. मंगळवारी पुन्हा नगरसेवक, पदाधिकार्यांची बैठक होणार आहे. त्यानुसार चार दिवसांत निर्णय होणार आहे. काँग्रेसकडून मनधरणी जयश्री पाटील यांनी काँग्रेस सोडू नये यासाठी पक्षश्रेष्ठींकडून मनधरणी सुरू आहे. सोमवारी कृषी राज्यमंत्री व काँग्रेसनेते डॉ. विश्वजित कदम यांनीही महापालिकेतील विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी सांगलीत याबाबत चर्चा केली. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा करून जयश्री पाटील यांनी काँग्रेस सोडू नये यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. कार्यकर्ते सांगतील तो निर्णय मान्य जयश्री पाटील म्हणाल्या,(स्व.) मदन पाटील यांच्या पश्चात कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्यांना दिलेल्या शब्दानुसार मी राजकारणात सक्रिय झाले. काँग्रेसच्या बळकटीसाठी प्रयत्न केले. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. परंतु, कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठी किंवा पक्षाकडून न्याय दिला जात नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांतूनच राष्ट्रवादीत जाण्यासाठी आग्रह सुरू आहे. त्यासाठी चार दिवसांत शहर व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. त्यांना न्याय देण्यासाठी ते म्हणतील तसा निर्णय घेऊ.
ता.१४-०७-२०२० सांगली प्रतिनिधी : सांगली शहरातील १०० फुटी रस्ता परिसरातील रामकृष्ण परमहंस सोसायटी येथे घरात घुसून एका तरुणावर लोखंडी रॉडने खुनी हल्ला करण्यात आला. सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. प्रतीक राजेंद्र गाडेकर (वय २२) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास प्रतीक घरात झोपला होता. त्याचे वडील अंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी त्याच्या घराचा दरवाजा उघडाच होता. त्यावेळी दोन अज्ञात त्याच्या घरात घुसले. प्रतिकवर त्यांनी झोपेतच हल्ला केला, त्याच्या उजवा कान, डोके, कपाळावर जोरदार हल्ला करण्यात आला.त्याच्या कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
ता.१३-०७-२०२० आटपाडी प्रतिनिधी : दुष्काळाचा कलंक लागलेल्या आटपाडी तालुक्यात टेंभूचे पाणी आलं. त्यामुळे अनेक तरुण आधुनिक शेतीकडे वळू लागलेत, मात्र आटपाडी तालुक्यात शेती विकासाला विकास सोसायटी आणि जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसह राष्ट्रीयकृत बॅंकांनी पीक कर्जाचा पुरवठा थांबवून खोडा घातला आहे. सचिव आणि बॅंकेचे अधिकारी पिक कर्ज वाटपात राजकारण करत आहेत. त्यामुळे हजारो तरूण शेतात फळबागा आणि पिके असूनही कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.तालुक्याला पाच वर्षांपूर्वी टेंभूचे पाणी आले. अनेक भागात आणि तलावात जावू लागले. बंदिस्त पाईपलाईनची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे तरुण पिढी आधुनिक शेतीकडे वळू लागली आहे. पडीक असलेली शेत जमीन विकसित केली आहे. डाळिंब, द्राक्ष बागा उभा केल्या. भाजीपाला क्षेत्र वाढत आहे. शेती विकासाची गाडी गती घेऊ लागली आहे, पण त्याला आर्थिक पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्थांनी खोडा घातला आहे. तालुक्यात 60 गावात 90 विकास सोसायटी आहेत तसेच जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या 18 आणि राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या सात शाखा आहेत. सहकारी बॅंका सोसायटीच्या माध्यमातून अल्प व्याजदरात पीक कर्जाचा पुरवठा करतात. प्रत्यक्षात तालुक्यात पिक कर्ज पुरवठ्यात वेगळे चित्र आहे. शेतकऱ्याची पीक पाणी नोंद करण्यापासून ते विकास सोसायटी, बॅंक अधिकारी प्रचंड अडवणूक आणि पिळवणूक करीत आहेत. सोसायटीमधून यापूर्वी राजकारण्यांना शेतात पिके, बागा नसतानाही क्षमतेपेक्षा जास्त पीक कर्ज पुरवठा केला आहे. तर शेतीकडे वळलेल्या तरुणांना बागा असतानाही कर्ज देण्यात डावलले जात आहे. सोसायटी एक वर्ष कमाल मर्यादा नोंदवत नाहीत. सचिवाकडून एकदम 50 शेतकऱ्यांची सांगलीतून नोंद करून आणू असे सांगून टाळले जात आहे. प्रत्यक्षात नोंदणी आटपाडी होते. अनेक गावातील हजारो कमाल मर्यादा नोंदणी सहा महिन्यापासून विविध कारणे सांगून प्रलंबित ठेवली आहेत. शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करणारी सोसायटी ते बॅंकापर्यंतची व्यवस्था पडली आहे. याचा परिणाम तालुक्याच्या शेती विकासावर होणार आहे. ""पीक कर्जासाठी आवश्यक असलेली कमाल मर्यादा नोंदणी थांबवता येत नाही. तक्रारीनंतर सचिवांना नोंदणी कामे करण्याचे आदेश दिलेत. सचिवांनी शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास कारवाई केली जाईल.'' - बी.डी.मोहीते, (सहाय्यक निबंधक, आटपाडी)
ता.१३-०७-२०२० दहिवडी प्रतिनिधी : एका आजीला भुलवून गुन्हा करण्याच्या हेतूने आलेल्या संशयित चोरट्यास तरुणांच्या सतर्कतेमुळे जाळ्यात पकडण्यात दहिवडी पोलिसांना यश आले. शनिवारी सायंकाळी एक मध्यमवयीन पुरुष दुचाकीवरुन भवानवाडी परिसरात आला. एका घराच्या जवळ वयस्कर महिलेशी बोलून पाहुण्यारावळ्यांची चौकशी केली. नंतर मी तुमचा पाहुणाच आहे, अशी बतावणी त्याने केली. आजी त्याच्या बोलण्याला भुलल्या व त्याला घरी चहा पिण्यास बोलवले. घरात असलेल्या वयस्कर मंडळींना त्याने आपल्या बोलण्याने भुलवून विश्वास संपादन करण्यास सुरुवात केली.त्याचवेळी राजू मुळीक हे त्या ठिकाणी आले. त्यांनी त्या संशयिताची चौकशी करण्यास सुरुवात केली असता तो गडबडून गेला.काही वेळातच त्याने काढता पाय घेतला. मात्र, त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने वाहतूक पोलीस केतन बर्गे यांच्या सहाय्याने राजू मुळीक, पाडुरंग सत्रे, स्वप्नील मुळीक व आशिष मुळीक यांनी त्याचा पाठलाग करुन त्याच्या दुचाकीला स्वतःच्या दुचाकी आडव्या लावून त्याला फलटण रस्त्यावर पकडले.त्यानंतर संशयितास दहिवडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी अधिक चौकशी केली असता त्याचे नाव बंडू विठ्ठल बिटले (वय 45) असल्याचे व गाव बिटलेवाडी (ता. खटाव) असल्याचे त्याने सांगितले. त्याच्याजवळ असलेली दुचाकी (एम. एच. 11 बी. क्यू. 4614) चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्या संदर्भातील गुन्हा पुसेगाव पोलीस ठाण्यात नोंद आहे. त्यामुळे या संशयितास पुसेगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. दहिवडीतील सतर्क तरुणांमुळे एका चोरट्यास पकडण्यात पोलीस यंत्रणेला यश आले. त्यामुळे या तरुणांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
ता.१२-०७-२०२० सांगली प्रतिनिधी : कुपवाड एमआयडीसी मध्ये काल शुक्रवारी भर दुपारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या खुनाचा उलगडा २४ तासाच्या आत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आलं आहे. पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून निलेश गडदे याने त्यांच्या मित्रांसमावेश थरारक पाठलाग करून निर्घृणपणे दत्तात्रय पाटोळे यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या हत्ये प्रकरणी निलेश विठोबा गडदे (वय २१ रा. वाघमोडेनगर कुपवाड) सचिन अज्ञान चव्हाण (वय-२२ रा, आर पी पाटील शाळेजवळ कुपवाड, वैभव विष्णु शेजाळ (वय २१ वाघमोडेनगर कुपवाड, मृत्युंजय नारायण पाटोळे (वय २७ रा.आंबा चौक यशवंतनगर आणि किरण शंकर लोखंडे (वय १९ रा वाघमोडेनगर कुपवाड) या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी कि, कुपवाड एमआयडीसी येथील रोहिणी कोल्ड स्टोअरेज मध्ये राष्ट्रवादीचा युवक जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाटोळे यांचा काल दि. १० जुलै रोजी भर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमानी संगनमत करुन गाडी आडवी मारून, पाठलाग करून त्यांच्या डोक्यातधारदार शस्त्राने वार करुन त्यांचा खुन केला होता, या घटनेच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी भेट देवुन या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना या गुन्हयातील आरोपींचा शोध घेवुन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी सदर गुन्हयातील आरोपीच्या शोधासाठी दोन पथक तयार केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पाटोळे राहत असलेले वाघमोडे नगर मधील त्यांचे मित्र, नातेवाईकांसह पाहुण्यांकडे चौकशी करत असताना पथकातील पोलीस नाईक सागर लवटे यांना माहिती मिळाली की, दत्तात्रय पाटोळे यांचा काही दिवसापुर्वी किरकोळ कारणावरुन निलेश गडदे याच्यासोबत झाला होता, याचा राग मनात धरुन निलेश गडदे व त्याच्या मित्रांनी मिळून हा खुन केला असल्याचे समजले. सदरचे आरोपी हे जत तालुक्यातील जिरग्याळ येथील शेतामध्ये लपून बसल्याची माहीती मिळाली, माहिती प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा मारुन पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दत्तात्रय पाटोळे यांच्या खुनाच्या गुन्हयाचे अनुषंगाने निलेश गडदे याचे कडे चौकशी करता. सदरचा गुन्हा मी माझे साथीदार यांनी यापुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन त्याचा खुन केला असल्याचे सागितले. त्याने खून केल्याची कबुली देताच या हत्ये प्रकरणी निलेश विठोबा गडदे, सचिन अज्ञान चव्हाण, वैभव विष्णु शेजाळ, मृत्युंजय नारायण पाटोळे आणि किरण शंकर लोखंडे या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना पुढील तपास कामी कुपवाड एमआयडीसी ठाणेकडे वर्ग करणेत आले.
ता.१२-०७-२०२० विटा प्रतिनिधी : कोरोना "लॉकडाउन' च्या काळात सातशे रूपयापर्यंत गेलेला मटणाचा दर सध्या 550 रूपयापर्यंत उतरला आहे. तर चिकन दरात अडीचशे रूपयांवरून दोनशे रूपयांपर्यंत घसरण झाली आहे. अद्यापही काही विक्रेते मात्र जादा दरानेच विक्री करत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये काहीसे गोंधळाचे वातावरण आहे."लॉकडाउन' च्या काळात जनावरांचे बाजार बंद करण्याचे आदेश दिले गेले. त्यामुळे मटण विक्रेत्यांना सहजपणे माल मिळणे अवघड बनले. अनेकांनी स्वत:च गावोगावी बकरे शोधून आणून मटण विक्री सुरू केली. त्यामुळे लॉकडाउनपूर्वी 560 रूपयांवर असलेला मटणाचा दर 650 ते 700 रूपयांपर्यंत पोहोचला. तसेच कोरोनामध्ये अफवामुळे चिकन विक्री व्यवसायावर संकट आले होते. शंभर रूपये किलोपासून ते अनेक पोल्ट्री व्यवसायिकांनी फुकट कोंबड्या वाटल्या. परंतू नंतर मटणाचा वाढलेला दर आणि अफवा दूर झाल्यामुळे चिकनला मागणी वाढली. परंतू पुरवठा कमी असल्यामुळे दर थेट 250 रूपयांवर पोहोचला. मटण आणि चिकन दराने उच्चांक गाठल्यामुळे खवय्यांची चांगलीच पंचाईत झाली. तर या काळात मटण-चिकन विक्रेत्यांचा काही प्रमाणात नफा झाला. गेले काही दिवस मटण 650 रूपये आणि चिकन 250 रूपये दराने विकले जात आहे. परंतू सध्या जनावरांचा बाजार बंद असल्यामुळे अन्य राज्यात जाणारा माल थांबला आहे. स्थानिक पातळीवर बोकडांची संख्याही वाढली आहे. तसेच हॉटेल व्यवसाय अद्यापही बंदच आहे. त्याचा परिणाम म्हणून मटण विक्रेत्यांना स्वस्तात माल मिळू लागला आहे. त्यामुळे चार-पाच दिवसापासून अनेक मटण विक्रेत्यांनी दरात 650 रूपयावरून 550 रूपयांपर्यंत कपात केली आहे. तोच प्रकार चिकनच्या बाबतीत आहे. 250 रूपयावरून चिकन दर 200 रूपयांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात जादा दरामुळे मांसाहार वर्ज्य केलेल्या सामान्य व मध्यमवर्गीयांना मांसाहाराची चव चाखता येऊ लागली आहे.मटण व चिकनच्या दरात अनेक विक्रेत्यांनी कपात केली असली तरी काहीजण अद्यापही जादा दराने विक्री करत आहेत. एकीकडे स्वस्त तर दुसरीकडे महाग यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. स्वस्त आणि महाग दराने विक्री करणारे ग्राहकांना आपला दर कसा योग्य आहे? हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.
ता.११-०७-२०२० सांगली प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय महादेव पाटोळे (वय 41, रा. वाघमोडेनगर) यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मिरज औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या हॉटेल अशोका समोर रोहिणी ऍग्रोटेक कोल्ड स्टोअरेज मध्ये येथे शुक्रवारी (10 जुलै) दुपारी ही घटना घडली. तीन हल्लेखोरांनी धारधार शस्त्रांनी दत्तात्रय पाटोळे यांच्यावर हल्ला चढवला. यात त्यांचा मृत्यू झाला. आर्थिक वादातून ही हत्या घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.प्राप्त माहितीनुसार, दत्तात्रय पाटोळे हे आपल्या दुचाकीवरुन शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास मिरज औद्योगिक वसाहतीत निघाले होते. त्यांची दुचाकी हॉटेल अशोका समोर येताच तीन हल्लेखरांनी त्यांना अडवले आणि त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात ते दुचाकीवरुन खाली पडले. हल्लेखोर हल्ला करतच होते. त्यातूनही उठून जीव वाचविण्यासाठी ते इकडेतिकडे पळू लागले. अखेरचा प्रयत्न म्हणून त्यांनी रोहिणी ऍग्रोटेक कोल्डस्टोअरेजमध्ये धाव घेतली. मात्र, हल्लेखोरांनी त्यांचा पाटलाग करत त्यांच्यावर हल्ला केला. डोक्यावर आणि शरीराव धारधार शस्त्राने वार केल्याने पाटोळे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पाटोळे यांना वाचविण्यासाठी स्टोरेजमधील एक कामगार पुढे आला पण हल्लेखोरांनी त्याच्यावरही वार केला. यात तो कामगार जखमी झाल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच, कुपवाड एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाटोळे यांची हत्या करुन हल्लेखोर पसार झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार दत्तात्रय पाटोळे हे औद्योगिक वसाहतीत मनुष्यबळ (कामगार) पुरविण्याीच कंत्राटे घेत असत. ते राजकारणात सक्रीय होते. अलिकडेच झालेल्या सांगली महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांमध्ये त्यांचा समावेश होता.
ता.१०-०७-२०२० कराड प्रतिनिधी : येथील कृष्णा हॉस्पिटलमधून करोनामुक्त झालेल्या सात जणांना गुरूवारी डिस्चार्ज देण्यात आला. करोनामुक्त झालेल्या नागरिकांमध्ये पाचजण कराड तालुक्यातील तर दोन जण पाटण तालुक्यातील आहेत.या करोनामुक्तांचा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. विनायक राजे, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. संजय पाटील, संध्या जगदाळे, कविता कापूरकर यांच्यासह हॉस्पिटलचे वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.
ता.१०-०७-२०२० विटा प्रतिनिधी : विटा येथील नगरपालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी धडक मोहीम राबविण्यात येत असल्याने सामान्य नागरिक व व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली. कोरोनापासून बचावासाठी मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास सरकारने बंदी घातली आहे. सरकारच्या निर्देशानुसार विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून धडक कारवाईच्या मोहिमेत सहभाग घेतला.विट्यामध्ये प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत.मात्र काही नागरिक विनाकरण रस्त्यावर फिरत असल्याने करोनाच्या फैलावाची शक्यता आहे.अशा नागरिकांवर नगरपालिकेच्या पथकाद्वारे कारवाईही केली जात आहे.मात्र तरीही घराबाहेर पडण्याचे नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही.त्यामुळे आता राज्य सरकारने पूर्वपरवानगी घेऊन घराबाहेर पडणाऱ्यांनाही मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. त्यानुसार आता नगरपालिकेने शहरात मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर प्रत्येकी 100 रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई सुरू केली आहे.शहरात नियमांची कडक अंमलबजावणी करत या मोहिमेंतर्गत गेल्या दोन दिवसांत काटेकोरपणे नागरिकांवर बेधडक कारवाई करण्यात आली. याशिवाय निर्धारित वेळेत दुकाने बंद न करणाऱ्या व्यावसायिकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.कारवाई दरम्यान मास्क लावण्याची समज नागरिकांना देण्यात येत आहे.
ता.०९-०७-२०२० पलूस प्रतिनिधी : गेल्या महिनाभरापासून आणि अलीकडे पंधरा दिवसात पलूस तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. ही चिंतेची बाब आहे. आज अखेर पलूस तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 47 वर जाऊन पोहोचली आहे.कोराना साथीच्या पार्श्वभूमीवर लॉंकडाऊन जाहीर झालपासून 5 जून पर्यंत पलूस तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता. मात्र, 6 जून रोजी मुंबई येथून आलेल्या व संस्थात्मक क्वारंटाईन असलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तालुक्यात कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत गेली. विशेषतः बाहेरून आलेल्या व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह येत होत्या. मात्र, आंधळी येथील एका स्थानिक व्यक्तीला कोरानाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. एक महिला कोरोनाने मयत झाली आहे. प्रशासनाने दखल घेतल्यामुळे पलूस तालुक्यात कोरोनाचा प्रसार झाला नाही.प्रशासनाने बाहेरून आलेल्या जवळपास आतापर्यंत सहा हजारपेक्षा जास्त नागरिकांना क्वारंटाईन करून, त्यांचेवर देखरेख ठेवली. यामध्ये तहसीलदार राजेंद्र पोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, गटविकास अधिकारी राहुल रोकडे, आरोग्य अधिकारी डॉ. रागिणी पवार , सर्व विभागाचे अधिकारी, महसूल, आरोग्य, पोलिस कर्मचारी यांनी अतिशय सतर्कपणे काम केले. पलूस- कडेगाव विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधी आणि राज्याचे कृषी व सहकार राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी वेळोवेळी प्रशासनासोबत बैठका घेतल्या. गावांना भेटी देऊन नागरिकांना दिलासा दिला.पलूस तालुक्यात कोरोनाचे पुन्हा रुग्ण सापडणार नाहीत. असे वाटत असतानाच पलूस तालुक्यातील एका राजकीय नेत्यास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.तेव्हा मात्र, प्रशासनासह सर्वांचे धाबे दणाणले. कारण हे राजकीय नेते नेहमी लोकांच्या मध्ये, समाजात मिळून मिसळून वागणारे नेते आहेत. त्यांचा संपर्क अधिक लोकांशी येणार. हे माहिती होते.झाले तसेच त्यांचे कुटुंबासह ईतर नागरिकांचे अहवाल पॉंझिटिव्ह आले.दुधोंडी, पुणदी, ब्रम्हनाळ, आमणापूर येथील नागरिकांचे अहवाल पॉंझिटिव्ह आले. दुधोंडी शंभर टक्के लॉंकडाऊन करण्यात आले आहे. पलूस, नागठाणे येथेही कोरोनाचे स्थानिक रुग्ण सापडले आहेत. एकूण रुग्णांची संख्या 47 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.70 पेक्षा जास्त स्वॅंब टेस्ट बाकी पलूस तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अजूनही 70 पेक्षा जास्त स्वॅंब टेस्टचे अहवाल बाकी आहेत. सदर अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ता.०९-०७-२०२० आटपाडी प्रतिनिधी : शेटफळे (ता.आटपाडी) आणि परिसरातील पन्नासवर शेतकरी गेली तीन वर्षे एकत्र येऊ शेवग्याचे मोठे उत्पादन घेत आहेत. या शेतकऱ्यांनी शेवगा उत्पादनात हातखंडाच मिळवला आहे. त्यामुळे त्यांना शेवगा शेतीचा लळाच लागला आहे.शेवगा दुष्काळी भागात कमी पाण्यावर येणारे पिक आहे.पण याबाबत शेतकऱ्यांच्या अनेक गैरसमज आहेत. शेतकरी शेवग्याला ज्यादा पाणी सोडतात परिणामी यश येत नाही. झाडाच्या गरजेनुसार माफक पाणी,छाटणी, ताण देणे या गोष्टी सांभाळल्या तर शेवग्यापासून बारा महिने उत्पादन मिळते ते शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. शेटफळे येथील संजय गायकवाड गेल्या तीन वर्षापासून शेवग्याची शेती करतात. त्यानी सांगोला तालुक्यातील एका डॉक्टर शेतकऱ्याकडून प्रेरणा आणि मार्गदर्शन घेतले. शेटफळे, कोळा, तळेवाडी, नागज या गावासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील पन्नासवर शेतकऱ्यांचा शेवगा शेतीचा ग्रुप बनला आहे. ते तीन वर्षे शेवग्याचे नियमित उत्पादन घेतात. स्वतः संजय गायकवाड यांचा चार एकर शेवगा तीन वर्षापासून आहे. त्यांनी स्वतः वसंत वाण विकसित केला आहे. शेवग्याचे अवघ्या चार महिन्यात उत्पादन सुरू होते. दीड फुटावर शेंडा खुडणे, त्यानंतर येणाऱ्या फुटांची योग्य छाटणी, गरजेनुसार पाणी, फवारणी हे शेवगा शेतीचे गमक ठरले आहे. या शेतकऱ्यांचा शेवगा कोल्हापूर, सोलापूर,सातारा, पुणे या भागात एकत्र वाहनातून विक्रीसाठी पाठवला जातो. सर्वांचा माल एकाच वेळी जास्त असल्यामुळे भावही चांगला मिळतो. तसेच वाहतुकीचा खर्च कमी होतो. पन्नास शेतकऱ्याची शंभर एकर क्षेत्रावर बारमाही शेवग्याची लागवड असते. दर दोन दिवसाला शेवग्याची तोडणी करून बाजारपेठेत पाठवला जातो. एकावेळी तीन ते सहा टन माल एकत्र जातो. कमीत कमी दहा रुपयापासून ते साठ रुपयापर्यंत प्रति किलो भाव मिळाला आहे. सरासरी पंचवीस ते तीस रुपये प्रति किलोने शेवग्याची विक्री होते. विशेष म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी एकाच वसंत वाणाची लागवड केली आहे. याची शेंग मध्यम लांब, आणि जाड, आकर्षक रंग असल्यामुळे बाजारपेठेत उठाव होतो. एक वर्षानंतर शेवग्याची विशिष्ट पद्धतीने छाटणी केली जाते. दर कोसळलेल्या काळात शेंगाची विक्री न करता बियाण्यासाठी ठेवले जाते. त्याचीही प्रतिकिलो दोन हजार रुपये दराने विक्री केली जाते. शिवाय शेवग्याच्या बिया पासून तेलाची निर्मिती केली जाते. त्यासाठी ही मोठी मागणी आहे.शेवगा शेती मध्ये पाण्याचे आणि शेंडा खोडणे याचे काटेकोर नियोजन महत्त्वाचे आहे. यामुळेच आम्ही पन्नास शेतकरी यशस्वी झालो आहोत. अनेक शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शनही केले. - संजय गायकवाड (शेवगा उत्पादक शेतकरी शेटफळे)
ता.०८-०७-२०२० कडेगाव प्रतिनिधी : सह्याद्री पर्वत रांगेच्या कुशीत संपूर्ण कडेगाव तालुका विसावला आहे. साहजिकच त्यामुळे कडेगाव तालुक्याला डोंगराळ तालुका म्हणून ओळखले जाते. आता पाऊस होऊ लागल्याने या ठिकाणी निसर्ग सौंदर्यात वाढ झाली आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील निसर्ग व पर्यटनस्थळे ओस पडली आहेत. कोरोनामुळे शासनाने धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे बंद ठेवली आहेत. तर जिल्हाबंदीचाही मोठा परिणाम या पर्यटन स्थळांवर झाला आहे.तालुक्यातील मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्य, चौरंगीनाथ मंदिर, कडेपूर येथील डोंगराई देवीचे मंदिर या ठिकाणांना शासनाचा पर्यटनस्थळांचा दर्जा आहे. प्रतिवर्षी पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने भाविक व पर्यटक येतात. परंतु यावर्षी कोरोनाचा या पर्यटन स्थळावर मोठा परिणाम झाला असूनही स्थळे पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत.मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्य जगप्रसिद्ध आहे. येथे सागरेश्वर देवस्थानही आहे. त्याचबरोबर चौरंगीनाथ मंदिर, लिंगेश्वर मंदिर, महादेव मंदिर अशी मंदिरे येथे पाहायला मिळतात. कडेगावच्या दक्षिणेला उंच डोंगरावर डोंगराई देवीचे मंदिर आहे. येथून संपूर्ण कडेगाव तालुक्याचे विलोभनीय दृश्य पाहावयाला मिळते.पौराणिक काळापासून हे देवस्थान भाविकांचे श्रद्धास्थान आहे. वर्षातून तीन वेळा येथे यात्रा भरते. कर्नाटकातील भाविक येथे नव्याच्या पौर्णिमेला येऊन यात्रा करतात. तर श्रावणात सोमवार, मंगळवार आणि शुक्रवारी यात्रा असते. येथे विविध प्रकारचे पौराणिक काळातील देवालये येथे आढळतात.त्याचप्रमाणे येथील वाघझरा , तरस गुहा प्रसिद्ध आहे.या ठिकाणी विविध जातीचे पक्षी, वन्यप्राणी आणि औषधी वनस्पती आढळतात. याचे वैशिष्ट्ये म्हणजे समुद्र सपाटीपासून सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात उंच असे हे ठिकाण असल्याचे सांगण्यात येते.या डोंगराच्या पायथ्याला कडेगाव येथील थोर संत श्री गोविंदगिरी महाराज यांची समाधी आहे. कडेगाव येथे जुनी मशीद, पुरातन हनुमान मंदिर, भैरवनाथ मंदिर त्याबरोबर बारा कमानी साखर विहीर आदी ठिकाणे पर्यटकांना भुरळ घालतात. मात्र, लॉकडाऊनमुळे या सार्याच ठिकाणी पर्यटक येणे बंद झाले आहे. पर्यटकांची प्रतीक्षा... कडेगावपासून जवळ नेर्ली येथे ऐतिहासिक पीर बेबानी साहेब यांची दर्गाह आहे. कडेपूर-पुसेसावळी रोडवर हिंगणगाव बुद्रुक येथे हजार वर्षांपूर्वीची श्री नारायणस्वामी महाराज यांची समाधी आहे. याशिवाय सोनसळ येथील प्रसिद्ध चौरंगीनाथ मंदिर आहे. येथून निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येतो. परंतु सध्या कोरोना महामारीचे संकट राज्यात, जिल्ह्यात व तालुक्यात पसरले आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळे ओस पडली असल्याचे चित्र अडीच-तीन महिन्यांपासून दिसत आहे.
ता.०८-०७-२०२० आळसंद प्रतिनिधी : बलवडी भा. (ता.खानापूर ) येथील एस. टी. स्टॅंड समोर पालकमंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. श्री. पाटील यांचे स्वागत केल्याने तब्बल 27 वर्षांपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या स्वागत व आठवणींना उजाळा मिळाला.सन 1995 मध्ये राज्यात सत्तांतर होऊन भाजप शिवसेना युतीचे शासन सत्तेवर आले. सन 1997 मध्ये विटा शहराला मुबलक पाणी मिळावे, यासाठी लोकनेते हणमंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालिन नगराध्यक्ष सदाशिवराव पाटील यांच्या पुढाकाराने घोगाव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली होती. उद्घाटनप्रसंगी तत्कालीन उपमुख्यमंत्री मुंढे, तत्कालिन पाणी पुरवठा मंत्री अण्णासाहेब डांगे , सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री शिवाजीराव नाईक होते. मुंढे विट्याला जाताना बलवडीत थांबले. चंद्रकांत महादेव पवार, संपतराव गायकवाड, तारानाथ कुलकर्णी यांनी जंगी स्वागत केले होते. सदाशिव पाटील यांनी बलवडीत थांबण्याची विनंती केली. त्याला आज सत्तावीस वर्षांचा काळ लोटला. पालकमंत्री पाटील यांच्या भेटीमागे माजी आमदार सदाशिव पाटील यांनी केलेल्या विनंतीमुळे पालकमंत्री श्री. पाटील हेही बलवडी येथे थांबले. मध्यंतरी, माजी मंत्री पतंगराव कदम राष्ट्रीय पेयजल योजनेच्या भूमीपूजनास आले होते. मात्र कदम हे एस. टी . स्टॅंडकडे न येता सरळ कार्यक्रम स्थळी आले होते. पालकमंत्री श्री. पाटील यांचे स्वागत केले. या घटनेमुळे तब्बल सत्तावीस वर्षांपूर्वी मुंढे यांच्या केलेल्या स्वागताला उजाळा मिळाला.
ता.०८-०७-२०२० म्हसवड प्रतिनिधी : देशात सर्वोतम चव,दर्जा आणि प्रचंड प्रमाणात उपलब्ध होवू शकणारे बोकड, बकरी या लहान जनावरांच्या माणदेशी मटणाला आणि शेतीच्या कामासाठी, दुधासाठी सर्वोतम असणार्या माणदेशी मोठ्या पाळीव खिलार जनावरांना जी आय मानांकन देवून लहान- मोठ्या जनावरांसाठी विविध उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी राष्ट्रीय नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.या निवेदनात सादिक खाटीक यांनी म्हटले आहे, की पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी तालुक्यांचा भाग. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, सांगली जिल्ह्यातील आटपाडी, खानापूर, जत, कवठेमहंकाळ, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा हे पूर्ण तालुके आणि माळशिरस, पंढरपूर तालुक्यातील लगतचा भाग असा मिळून माणदेश प्रदेश म्हणून ओळखला जातो.दुष्काळी भागातील या तालुक्यांची संपूर्ण देशात उत्कृष्ट, चपळ, देखणे ,मजबूत, भारदस्त, मोठी खिलार जनावरे आणि सर्वोत्तम चव, दर्जा, मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार्या मटणासाठी उपयुक्त असे बोकड, बकरे (बालंगे), शेळ्या, मेंढ्या या लहान जनावरांचे क्षेत्र म्हणून ख्याती आहे. आसपासच्या जिल्ह्यांमध्ये माणदेशी लहान जनावरांच्या मटणाची बाजारपेठ पिढ्यान पिढ्या निर्माण झाली आहे. त्याचवेळी मेहनतीच्या, शेतीकामासाठी, दूध उत्पादनासाठी उत्कृष्ट देशी वाण म्हणून खिलार गाई, बैल, खोंडांना संपूर्ण देशात मोठी मागणी आहे. महाराष्ट्र शासनाने कोकणातील शेतकर्यांसाठी काजू आणि आंब्याला, विदर्भात नागपुरी संत्र्याला, महाराष्ट्राबाहेर मोठ्या प्रमाणावर पिकणार्या पण केवळ बाजारपेठ असलेल्या सांगली आणि नांदेडच्या हळदीला, उत्तर महाराष्ट्रातील केळी, द्राक्षांना जी आय मानांकन दिले आहे. माणदेशी लहान जनावरांच्या मटणाला आणि माणदेशी मोठ्या खिलार जनावरांना अशी मानांकने का मिळत नाही असा सवाल येथील शेतकरी पशुपालकांना गेली अनेक वर्षे प्रश्न पडला आहे. महाराष्ट्र शासनाने या बाबतीत गांभीर्याने घेऊन कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयाने माणदेशी लहान जनावरांच्या मटणाला आणि माणदेशी खिलार जनावरांना जी आय मानांकन मिळवून देण्याची गरज आहे. जगातल्या 12 राष्ट्रांशी औद्योगिक करार करून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने एक चांगला पाया रचला आहे तसेच हा एक पर्याय महाराष्ट्राला जगात लौकिक मिळवून देणारा ठरेल आणि दुष्काळी माणदेशी शेतकरी समृद्ध होईल याचा गांभीर्याने विचार करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
ता.०७-०७-२०२० तासगाव प्रतिनिधी : तालुक्यातील मणेराजुरी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी 4 वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी आपत्ती व्यवस्थापन समितीने दिली आहे. मात्र या समितीचा आदेश झुगारून सायंकाळी 4 नंतरही दुकाने उघडी ठेवल्याप्रकरणी 20 दुकान मालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांना मिळून 7 हजार 500 रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती सरपंच सदाशिव कलढोणे यांनी दिली. ते म्हणाले, जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर मणेराजुरी येथे कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. गावात अनावश्यक गर्दी होऊ नये. सोशल डिस्टन्स पाळला जावा. नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, याची खबरदारी ही समिती घेत आहे.ते म्हणाले, गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन समिती गेल्या अनेक महिन्यांपासून कष्ट घेत आहे. गावात औषध फवारणी यासह आरोग्याच्या अन्य उपाययोजना काटेकोरपणे करण्यात आल्या आहेत. त्याचेच फलित म्हणून अद्याप गावात कोरोनाचा शिरकाव झाला नाही.कलढोणे म्हणाले, गावातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंतच उघडी ठेवण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन समितीने घेतला आहे. सायंकाळी 4 नंतर सौजण्याचा भाग म्हणून 15 मिनिटे दुकाने बंद करण्यासाठी वेळ दिला जातो. मात्र त्यांनातरही दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातो.आज (मंगळवार) सायंकाळी 4 नंतर गावात अनेक दुकाने उघडी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समितीने या दुकानांवर कारवाई करावी, असे आदेश दिले होते. त्यानुसार ग्रामसेवक महादेव जाधव, तलाठी सागर चव्हाण, लिपिक विशाल जमदाडे व बाळासो भिसे यांच्या समितीने गावातील सायंकाळी 4 नंतर उघडी असणाऱ्या 20 दुकानांवर कारवाई केली. सर्वांना मिळून 7 हजार 500 रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीचे निर्णय झुगारून जे गावात चुकीच्या पद्धतीने वागत असतील तर त्यांच्यावर यापुढेही कारवाई केली जाईल. कोणाचीही गय करणार नाही, असा इशाराही कलढोणे यांनी दिला आहे
ता.०७-०७-२०२० तासगाव प्रतिनिधी : येथील ग्रामीण रुग्णालयातून एका रुग्णाला एक्सपायर झालेले औषध दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळण्यातला हा प्रकार असल्याचा आरोप करून याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्याकडे तक्रार करणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे यांनी दिली.याबाबत शिंदे यांनी दिलेली माहिती अशी, काही दिवसांपूर्वी मी माझ्या आईला (सरस्वती आनंदराव शिंदे, वय 67, रा. खाडेवाडी) पित्ताचा त्रास होत असल्याने उपचारासाठी तासगावातील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेलो होतो. त्याठिकाणी केसपेपर काढल्यानंतर संबंधित डॉक्टरांनी आईची तपासणी केली. त्यानंतर त्यांनी केसपेपरवरच औषधे लिहून दिली. तेथील कर्मचाऱ्यांकडून औषधे घ्यायला सांगितली हे औषध घेऊन मी घरी गेलो. मात्र त्या दिवशी आईने हे औषध घेतले नाही. दुसऱ्या दिवशीही थोडे बरे वाटत असल्याने तिने औषध घेतले नाही. त्यानंतर हे औषध तसेच घरात पडून राहिले. आज सकाळी आईला थोडा पित्ताचा त्रास होऊ लागल्याने ग्रामीण रुग्णालयात दिलेले 'ते' औषध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र या औषधाची एक्सपायरी तारीख बघितल्यानंतर ते फेब्रुवारी 2020 मध्ये संपल्याचे निदर्शनास आले. याबाबत जाब विचारण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात गेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी अरेरावी व उद्धटपणाची भाषा वापरली. 'आता काम सुरू आहे. ओपीडीची वेळ आहे. बाहेर रुग्ण आहेत. तुम्ही नंतर या', अशी बेजबाबदारपणाची उत्तरे दिली. वास्तविक एक्सपायरी झालेल्या औषधाच्या बाबतीत विचारणा केल्यानंतर संबंधित डॉक्टरांनी या गंभीर प्रकारची तातडीने दखल घ्यायला पाहिजे हाती. मात्र त्यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने बघितले नाही. शिंदे म्हणाले, ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या नेहमीच तक्रारी आहेत. रुग्णांशी त्यांचे असभ्य वर्तन असते. रुग्णांना कसेही बोलले जाते. तेथील कर्मचारी तर रुग्णांना हिडीसपीडिस करतात. याबाबत ग्रामीण रुग्णालयातील वरिष्ठांकडे बऱ्याचवेळा तोंडी तक्रार केली आहे. मात्र तेथील स्टाफच्या वर्तनात सुधारणा होत नाही. आता तर चक्क एक्सपायरी झालेले औषध रुग्णांच्या गळ्यात मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या सर्व प्रकाराबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्याकडे तक्रार करणार आहे. शिवाय रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात चार दिवसांत रुग्णालयासमोरच आंदोलनास बसणार आहे
ता.०६-०७-२०२० सांगली प्रतिनिधी : तब्बल तीन आठवड्यांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरिपाचा आगाप पेरा वाया जाण्याचे संकट निर्माण झाले आहे. आता जुलैचा आठवडा संपतो आहे. अद्यापही पावसाने हजेरी लावली नाही. पावसाच्या मनमानीपणामुळे उर्वरित क्षेत्रातील पेरणी थांबली आहे. तर आगाप पेरणी वाया जाण्याची तसेच दुबार पेरणीची धास्ती निर्माण झाली आहे.जिल्ह्यात खरीप हंगामासाठी साधारणपणे 3 लाख 40 हजारांच्या घरात हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. मात्र, आजअखेर जेमतेम 45 टक्क्यांच्या घरात कशीबशी पेरणी झाली आहे. जवळपास एक ते सव्वा लाख हेक्टर क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेत आहे.सालाबादप्रमाणे यावेळी देखील पावसाचे आगमन लांबले आहे. मात्र, चांगल्या पावसाचे वर्तवलेले अंदाज यामुळे शेतकरीवर्गांसह अवघ्या समाजमनाला पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा होती. मात्र, आज अखेर दमदार पावसाने हजेरी लावलीच नाही. जून संपला तरी अद्यापी पावसाची समाधानकारक हजेरी लागलेली नाही. त्यामुळे तीन आठवड्यांपूर्वी पेरा झालेले क्षेत्र धोक्यात आले आहे. साधारणपणे जूनच्या दुसर्या तिसर्या आठवड्यात पेरणी बर्यापैकी होते. जिल्ह्यात सोयाबीन, भुईमूग, बाजरी, मका, तूर, उडीद, मूग आदी पिकांची आतापर्यंत जेमतेम पेरणी झाली आहे. शिराळा तालुक्यात मात्र भाताची धूळवाफ पेरणी बर्यापैकी झाली आहे. मात्र, खरिपासाठी उपलब्ध क्षेत्र पाहता आतापर्यंत जिल्ह्यात जेमतेम 40 ते 45 टक्क्यांच्या घरात पेरणी झाली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. प्रामुख्याने शिराळा तालुक्यात यावेळी भाताचे क्षेत्र वाढले आहे. पावसाने जरी विलंब केला असला तरी या तालुक्यात भाताची पेरणी 18 हजार हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. वाळवा, पलूस तालुक्यासह मिरज पश्चिम भागात मात्र केवळ सोयाबीन टोकणीचे धाडस काही शेतकरी करू लागले आहेत.कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूर तालुक्यातील शेतकरी मात्र शेतीमशागती करून पेरणीसाठी सज्ज राहिले आहे. मात्र, पावसाने जोर धरला नसल्याने पेरणीस गती नाही. पांढरे सोने अशी ख्याती मिळविलेल्या कापूस पिकाचे क्षेत्र आटपाडी तालुक्यासह कवठेमहांकाळ तालुक्यात घटले आहे. आठवडाभरात पावसाने हजेरी लावली नाही तर केलेला पेरा वाया तर जाणार आहेच, शिवाय खरीप हंगामच लांबण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर आता जुलैचा पहिला आठवडा संपतो आहे. मात्र, अजून पावसाने हजेरी लावलेली नाही. जरी एक दोन दिवसांत पावसाने सुरुवात केली तरी देखील वेळेत पेरणी होणार नाही, हे स्पष्टच आहे. त्यामुळे आता खरीप हंगाम देखील लांबल्यातच जमा आहे. एकीकडे उन्हाळी पाऊस दमदार झाल्याने शेतकरीवर्ग खुशीत होता. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर आहे. जून संपला तरी देखील बहुतांशी क्षेत्रातील पावसाअभावी पेरणी खोळंबली होती. मात्र, आता शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या हंगामात पावसाने दडी मारल्याने खरिपाचे नुकसान झाले होते.
ता.०५-७-२०२० तासगाव प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील तासगाव पूर्व भागातील मोठी बाजारपेठ असलेल्या सावळज गावामध्ये रविवार (ता.५) कोरोनाने शिरकाव केला. दोन पुरुष आणि एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याची स्पष्ट झाले. तसेच आमदार सुमन पाटील यांच्या अंजनी गावातही एक कोरोना बाधित रुग्ण सापडला. सावळजचे तिघेजण मुंबईहून तर अंजनीचा एकजण पनवेल येथून आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल सुर्यवंशी यांनी दिली आहे.सांगली जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे नवे १३ रुग्ण आढळले.महापालिका क्षेत्रात सांगलीत ६, मिरजेतील २ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या. धामणी (ता. मिरज) येथील १, दुधोंडी (ता. पलूस) येथील २, बोरगाव (ता.तासगाव) व कानकात्रेवाडी (ता. आटपाडी) येथील प्रत्येकी १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली. जयसिंगपूर येथील ७४ वर्षीय वृद्धाचा शनिवारी मृत्यू झाला. मिरज येथील शासकीय कोविड रुग्णालयात ९ व्यक्तींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
ता.०५-०७-२०२० तासगाव प्रतिनिधी : तासगाव शहरात कोरोनाचे एका वेळी पाच रुग्ण सापडल्याने तासगाव शहर पूर्णपणे लॉक डाऊन झाले आहे. परिणामी आज दुसऱ्या दिवशी शहर अक्षरशः चिडीचूप झाल्याचे चित्र दिसत होते. शहराच्या वेगवेगळ्या भागातील हे रुग्ण असल्याने संपूर्ण शहर कंटेंमनमेंट झोन बनल आहे. तालुक्यातीत आतापर्यंत 20 कोरोना रुग्ण सापडले आहेत.तासगाव शहरातील दोन हॉस्पिटलममधील पाच कर्मचाऱ्यांना कोरोना लागण झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. हे पाच ही कोरोना रुग्ण शहरातील वेगवेगळ्या भागातील मध्यवस्ती बाजारपेठेतील आहेत परिणामी पाच कंटनमेंट झोन मध्ये 80 टक्के शहराचा समावेश झाला आहे. त्यामुळे तासगावच कंटेंमनमेंट झोन बनले आहे.ज्या भागात रुग्ण रहातात तो 100 मीटर चा परिसर सील करण्यात आला आहे. या भागात जाणारे रस्ते पत्रे मारून बंद करण्यात आले आहेत.सोमवार पेठ गुरुवार पेठ सराफ कट्टा जोशी गल्ली सिद्धेश्वर रोड त्याचबरोबर वरचे गल्ली चा उत्तर भाग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सर्व रस्ते बंद असल्याने सध्या शहरात केवळ पायी ये जा करणे नागरिकांना भाग पडले आहे. औषध दुकाने दुग्धजन्य पदार्थ विक्री करणारी दुकाने किराणामाल दुकाने वगळता कोणतेही दुकान दोन दिवसात उघडलेले नाही. कंटेनमेंट झोन वगळता बफर झोन मधील व्यवहार 14 दिवसानंतर सुरू होतील. कंटेनमेंट झोन मधील मात्र दुकाने 28 दिवसानंतर सुरू होतील अशी चिन्हे आहेत. आज बंद च्या दुसऱ्या दिवशी शहरातील रस्ते सुनसान आणि चिडीचूप झाले होते शहरातील सांगली विटा रस्ता हा एकच प्रमुख रस्ता वाहतुकीसाठी साठी खुला ठेवण्यात आला आहे
ता.०५-०७-२०२० लेंगरे प्रतिनिधी : वेजेगाव (ता. खानापूर ) येथे बिहारमधून आलेल्या 27 वर्षीय युवतीला कोरोनाची लागण झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.वेजेगाव देवकर मळ्यानजीकच्या वस्तीवर मंगळवारी (ता. 30) या तरुणीसह कुटुंबातील चार व्यक्तींना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांची वेजेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली होती. युवतीला घशात त्रास जाणवू लागल्याने मिरज येथील कोव्हीड रुग्णालयात हलविण्यात आले. या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिच्या संपर्कातील चौघांना विटा येथील कोव्हीड केअर केंद्रात क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांनी दिली.पंधरा दिवसांपासून येथे रुग्ण सापडला नव्हता. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यवहार सुरळीत होत असतानाच वेजेगाव येथे रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून तत्काळ निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषीकेश शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लोखंडे, गावकामगार तलाठी अमृता कदम, कोतवाल सुनील मंडले यांनी त्या भागाची पाहणी केली. कोरोनाबाधित व्यक्ती सापडलेल्या संबंधित भागाचा नकाशानुसार कन्टेन्मेंट, बफर झोनच्या मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. त्या युवतीच्या संपर्कातील चौघांचे स्वॅब तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले आहेत.गावात पहिलाच रुग्ण सापडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. लोकांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क व सॅनिटायझर वापरावे, सामाजिक अंतर राखावे, कोरोनाचा संसर्ग टाळावा, प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून लोकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार शेळके यांनी केले आहे.
ता.०४-०७-२०२० सांगली प्रतिनिधी : कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याच्या अफवा काही समाज विघातक प्रवृत्तींकडून पसरविल्या जात आहेत. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा सध्या कोणताही विचार नसून याबद्दल प्रशासन स्तरावर कोणतीही चर्चा नाही. प्रशासन सर्व परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. विनाकारण पॅनिक होऊ नये. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा अनावश्यक साठा करू नये, असे सांगितले आहे. लॉकडाऊन वाढविण्याच्या पसरविण्यात येत असणाऱ्या चर्चांवर अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये तर स्वयंशिस्त मात्र पाळावी सोशल डिस्टंसिंगचे नियम काटेकोरपणे पाळावेत, वैयक्तिक स्वच्छता राखावी असे आवाहनही त्यांनी केले आहे . अनलॉकच्या काळात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे . त्याच वेळी कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत. वारंवार आपले हात धुवावेत. डोळे ,नाक, तोंड यांना स्पर्श करू नये. मास्कचा वापर अनिवार्यपणे करावा. विनाकारण घराबाहेर पडू नये. ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, श्वसनाचा त्रास, मळमळ आदी कोणतीही लक्षणे जाणवल्यास तात्काळ फिवर केंद्रांशी, आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. मधुमेह, रक्तदाब, हृदयाशी संबंधित, श्वसनाची संबंधित विकार असणाऱ्यांनी, 65 वर्षावरील नागरिक , दहा वर्षाखालील मुले , गरोदर स्त्रिया यांची अधिक काळजी घ्यावी. असे आवाहनही डॉ. चौधरी यांनी केले आहे.
ता.०३-०७-२०२० सातारा प्रतिनिधी : साताऱ्यात रेल्वेचा मोठा प्रोजेक्ट आणण्याचा आपला मानस असून संपूर्ण जिल्ह्याला नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे. रेल्वेच्या बोगी बनविण्याचा प्रकल्प असणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शासनाची उपलब्ध असलेल्या जागेचा वापर केला जाणार आहे. हा प्रकल्पाचा आराखडा आम्ही केंद्राकडे सादर केला आहे, अशी माहिती साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.कऱ्हाड चिपळूण रेल्वे मार्गासह व सातारा-पुणे डबल ट्रॅकचे काम भूसंपादनात रखडले आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी येत्या आठ जुलैला पुण्यात बैठक होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सातारा पालिकेशी संबंधित काही प्रश्न, औद्योगिक वसाहत, रेल्वे आणि कोरोनाच्या प्रश्नासंदर्भात आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी त्याच्यासमवेत सुनील काटकर, दत्तात्रेय बनकर, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना जिल्हा प्रशासन सर्व काही अटोक्यात आणू शकणार नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. कोरोनाचा उद्रेक झाल्यास काय करणार अशी भिती व्यक्त करून उदयनराजे म्हणाले, कोरोना रोकण्यासाठी देशातील संशोधक व शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे औषधोपचार करायला हवेत. त्यासाठी मी पंतप्रधानांना ही ईमेलव्दारे कळविले आहे. साताऱ्यातील विविध प्रश्नांचे मुद्दे मुख्यमंत्र्यांपुढे ही मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुरेश प्रभु रेल्वेमंत्री असताना कऱ्हाड चिपळूण रेल्वे मार्ग आणि सातारा- पुणे डबल ट्रॅकच्या कामाची आम्ही मागणी केली होती. पण हे काम भूसंपादनात अडकल्याने रखडले आहे. यासंदर्भात येत्या आठ जुलैला पुण्यात बैठक होणार आहे. त्यामध्ये सर्व मार्ग निघेल, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात रेल्वेचाएक मोठा प्रोजेक्ट आणण्याचा माझा मानस असल्याचे सांगून उदयनराजे म्हणाले, संपूर्ण जिल्ह्यालाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे. साताऱ्यात रेल्वेच्या बोगी बनविण्याचा प्रकल्प आहे. यासाठी जिल्ह्यातील शासनाच्या उपलब्ध जागेचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पाचा आराखडा आम्ही केंद्राकडे सादर केला आहे. लवकरच त्याबाबतचा निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले. मंत्र्यांच्या दौऱ्याची कल्पनाच दिली जात नाही... उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसांपूर्वी साताऱ्याच्या दौऱ्यावर आले होते. तुम्ही त्यांना का भेटला नाही, असे विचारले असता उदयनराजे म्हणाले, याची मला कोणी कल्पना दिली नव्हती. लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या दौऱ्याबाबत कळवायला हवे होते. माझ्या ऑफिसला त्यांच्या दौऱ्याचे पत्र यायला हवे होते. त्यांना वाटते आम्हालच दौरे पडतात. त्यामुळे आम्हाला कोणी दौरे कळवत नाही. मुळात अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
ता.०२-०७-२०२० आटपाडी प्रतिनिधी : राष्ट्रवादीच्या कार्याची गती बघून महाराष्ट्रातील अनेक लोक पक्षात येण्यास इच्छुक आहेत. याचाच एक भाग म्हणून आज आटपाडी तालुक्यात काही प्रमुख कार्यकर्ते पदभार स्विकारत आहेत. या सर्वांच्या माध्यमातून तालुका राष्ट्रवादीमय केला जाईल असे जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रतिपादन केले.आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी माजी आमदार सदाशिवराव पाटील,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख, युवा नेते वैभव पाटील, ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील उपस्थित होते .यावेळी आटपाडी तालुक्यातील माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना पद व जबाबदारी पत्राचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले . यावेळी आटपाडी तालुक्यातील माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना पद व जबाबदारी पत्राचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले . प्रास्ताविक व स्वागत हणमंतराव देशमुख यांनी केले. वैभव पाटील म्हणाले,' इथून पुढे मी कुणाच्या ओंजळीने पाणी पिणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून तालुक्यात घराघरात माझा कार्यकर्ता तयार करणार. त्याचीच सुरुवात म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात 140 लोकांना वेगळ्या सेलच्या माध्यमातून निवड केली.' माजी आमदार श्री. पाटील म्हणाले ,'मी आमदार असताना दहा वर्षांच्या कारकिर्दीत तालुक्यातील एकाही व्यक्तीला कधीच आडवले नाही तर त्याचे काम पूर्ण करण्याची भूमिका ठेवली.' याप्रसंगी उमेश पाटील, नारायण खरजे,सचिन राजमाने, प्रभाकर पाटील यांची जिल्हास्तरावर निवड केली तसेच अनेक युवा कार्यकर्त्यांचे तालुकास्तरीय निवड केली. यावेळी राष्ट्रवादीचे सादिक खाटीक, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष करण पवार, सेवादल जिल्हाध्यक्ष निलेश पवार, महिला तालुका अध्यक्ष अश्विनी कासार, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष जालिंदर कटरे, युवक तालुका सेलचे अध्यक्ष सुरज पाटील उपस्थित होते.
ता.०२-०७-२०२० सातारा प्रतिनिधी : दवाखान्यात जाण्यासाठी विटा (जि. सांगली) येथे निघालेल्या दोरगेवाडी (ता. माण) येथील एकाने कान्हरवाडी (ता. खटाव) येथील पाहुण्यांकडे एक दिवस मुक्काम करून तो दवाखान्यात गेला होता. मात्र, उपचारादम्यान तो करोना पॉझिटिव्ह आल्याने कान्हरवाडीकरांना धडकी भरली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, दोरगेवाडी येथील एका वृध्दाला श्वसनाचा त्रास असल्याने सांगली जिल्ह्यातील विटा येथे त्याला उपचारासाठी तो कुुंटुंबासमवेत निघाला होता. मात्र, दवाखान्यात वेळेत जाण्यासाठी त्यांनी वाटेत पाहुण्यांचे गाव असलेल्या कान्हरवाडीत एक दिवस मुक्काम केला.अन् दुसऱ्या दिवशी विट्याला एका दवाखान्यात गेले. तेथील डॉक्टरांनी या रुग्णाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यास सांगितल्याने नातेवाईकांनी त्याला सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्या तपासण्या झाल्यानंतर तो प्रथम सारीचा अन् त्यानंतर करोनाचा पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर खबदारीचा उपाय म्हणून कान्हरवाडी येथील इनाम मळा नावाचे शिवार प्रशासनाने सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. दरम्यान, गावात तहसीलदार, पोलीस, आरोग्य विभागाच्या गाड्या धडकल्याने कान्हरवाडी येथील नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाधिताच्या जवळच्या संपर्कातील दहा लोकांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी दिली. घाबरण्याचे कारण नाही बाधित माण तालुक्यातील असून त्याची गणनाही माण तालुक्यात करणे अपेक्षित होते. मात्र, तो विटा येथे उपचारासाठी गेल्यानंतर जवळचा पत्ता म्हणून त्यांनी कान्हरवाडीचा पत्ता दिल्याने प्रशासनाच्या नोंदीत कान्हरवाडी असा उल्लेख आला आहे. तसेच हा रुग्ण एक रात्र कान्हरवाडीत वास्तव्य करून गेला असला तरी त्याचा संपर्क घरातील व्यक्ती सोडल्या तर बाहेर कोणाशी सपर्क आलेला नसल्याने कान्हरवाडीतील लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, काही दिवस काळजी घेण्याची गरज आहे. - शैलेंद्र वाघमारे (माजी सरपंच, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष)
ता.०१-०७-२०२० सातारा प्रतिनिधी : सातारा शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सध्या काम सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामाची काल (सोमवारी) पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासोबत पहाणी केली. या पहाणीवेळी साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेही सोबत होते. मात्र, ज्यांनी ग्रेड सेपरेटरचे काम मंजूर करून आणले ते भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांना मात्र, साधे निमंत्रणही दिले नाही. त्यामुळे उदयनराजेंच्या समर्थकांत प्रचंड नाराजी पसरली आहे. यानिमित्ताने ग्रेड सेपरेटरच्या कामाचे नेमके श्रेय कोणाला.. असा प्रश्न उपस्थित होत आहे.सातारा शहराचे मुख्य ठिकाण असलेल्या पोवईनाका परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत होती.यावर उपाय म्हणून बांधकाम विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी येथे उड्डाण पुल करावा, असे सूचविले होते. मात्र, आगामी 40 वर्षाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी ग्रेड सेपरेटर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी या कामाचा प्रस्ताव करून तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशजांनी मागणी केलेल्या कामाला श्री. फडणवीस यांनी तात्काळ मंजूरी दिली. त्यामुळे पोवईनाक्यावर ग्रेड सेपरेटर म्हणजेच भुयारी मार्गाला हिरवा कंदील मिळाला. लोकसभा निवडणुकीपूर्वी या कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भुमिपूजन झाले. प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. 60 कोटी रूपयांचे हे काम 2020 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे टेंडरही झाले. हे टेंडर टी ऍण्ड टी कंपनीला मिळाले. प्रत्यक्ष कामही धडाक्यात सुरू झाले. पण मध्यंतरी कामाच्या आराखड्यात थोडा बदल केल्याने त्याची किंमत वाढली. त्यानुसार 15 कोटी वाढवून 75 कोटींचे हे काम सुरू झाले. या कामासाठीचे सर्व श्रेय खासदार उदयनराजे भोसले यांना जाते. आतापर्यंत 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. अंतिम टप्प्यात सातारा ते कराडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे साधारण ऑगस्ट महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. दिलेल्या मुदतीत हे काम टी ऍण्ड टी कंपनीने पूर्ण केले आहे. कोरोनाच्या काळात मजूरांची टंचाई निर्माण झाली तरी या कंपनीने काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार केलेला आहे. या कामाची पहाणी काल (सोमवारी) सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शरद राजभोज, तसेच भाजपचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपअभियंता राहूल अहिरे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यात येऊन आढावा बैठक घेऊन गेले. जाताना त्यांनी सर्वच कामांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सध्या अपूर्ण असलेल्या व पूर्ण होत आलेल्या कामांची पहाणी करण्याची सूचना पालकमंत्र्यांना केली होती. त्यानुसार बाळासाहेब पाटील यांनी ग्रेड सेपरेटरची पहाणी केली. तसेच 15 ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्याची सूचना केली. त्यांच्यासोबत साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ही उपस्थित होते. पण ग्रेड सेपरेटर ज्यांनी साताऱ्यात आणला त्या खासदार उदयनराजे भोसले यांना मात्र, कोणीही या कामाच्या पहाणीसाठी बोलावले नाही. शिवेंद्रसिंहराजेंना सोबत घेऊन पालकमंत्र्यांनी केलेली ग्रेड सेपरेटरची पहाणी उदयनराजेंच्या समर्थकांना चांगलीच लागली आहे. सर्व समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत. मुळात राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांना पहाणी करण्यासाठी बोलवायला हवे होते. मात्र, पालकमंत्र्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना सोबत घेऊन उदयनराजेंना का टाळले, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
ता.०१-०७-२०२० पंढरपूर प्रतिनिधी :- महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, श्री. तेजस ठाकरे उपस्थित होते. श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे दोन वाजता सुरू झाली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि सौ. अनुसया बढे (मु.चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे जग, देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचे हे संकट लवकरात-लवकर दूर करून महाराष्ट्र आणि अवघा देश कोरोनामुक्त होऊ दे. राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठल भक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला माऊलींच्या दर्शनाला आलो. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. त्यासाठी विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे, असे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी आणि जनतेने आरोग्याच्या दृष्टीने पंढरपुरात येऊ नये. घरातूनच श्री विठ्ठलाचे नामस्मरण व पूजा करावी, असे आवाहन श्री. ठाकरे यांनी भाविकांना केले. वारकरी सांप्रदायाने शासनाच्या वतीने वेळोवळी करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेस शासनाच्यावतीने पाच कोटी रुपयांचा अनुदानाचा धनादेश नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष साधना भोसले, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, शिवाजीराव मोरे, माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र भोसले, पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.
ता.३०-०६-२०२० विटा प्रतिनिधी : विटा शहरात आलेल्या कालच्या पुराला विटा नगरपालिका जबाबदार आहे. विटा नगरपालिकेला 25 तारखेला पत्र दिले होते,परंतु पालिकेने याबाबत कोणतीच उपाययोजना केली नाही,या पुराच्या पाण्यात जे नागरिकांचे नुकसान झाले.ते तातडीने भरून दयावे.अंतर्गत रस्ते व ओढ्यावरील जे अतिक्रमण झाले आहे याबाबत विटा नगरपालिकेने आपली भूमिका जाहीर करावी अन्यथा आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा विटा नगरपालिकेचे नगरसेवक अमोल बाबर,नगरसेवक अमर शितोळे,यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला. यावेळी बोलताना नगरसेवक अमोल बाबर म्हणाले,आम्ही 25 तारखेला विटा नगरपालिकेला पुराच्या पाण्याचे व अंतर्गत रस्ते याबाबत पत्र दिले होते.मात्र या बाबत विटा नगरपालिका प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही.पालिका केवळ पत्र घेऊन पोहच देण्याची प्रक्रिया पार पाडत आहे.या पुरामुळे झालेल्या नुकसानीला विटा नगरपालिका जबाबदार आहे.विटा साळशिंगे रस्त्यावर 150 फूट गटर काढून ठेवली आहे,ते पण अर्धवट ठेवली आहे.मुख्याधिकारी केवळ आश्वासने देत आहेत,प्रशासन म्हणून ते काय काम करणार याचे उत्तर द्यावे अन्यथा याचा जाब आम्ही नगरपालिकेला विचारणार आहे. विटा शहरात आलेल्या कालच्या पुराला विटा नगरपालिका जबाबदार आहे. विटा नगरपालिकेला 25 तारखेला पत्र दिले होते,परंतु पालिकेने याबाबत कोणतीच उपाययोजना केली नाही,या पुराच्या पाण्यात जे नागरिकांचे नुकसान झाले.ते तातडीने भरून दयावे.अंतर्गत रस्ते व ओढ्यावरील जे अतिक्रमण झाले आहे याबाबत विटा नगरपालिकेने आपली भूमिका जाहीर करावी अन्यथा आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल,असाही इशारा दिला आहे.
ता.२९-०६-२०२० मायणी प्रतिनिधी : तारळी योजनेचे पाणी मायणी येथील पडळकर तलावात व माळीनगर तलाव व खडकाचा मळा तलाव येथे पोहोचले असून या प्रश्नी सातत्याने लढा देत पाठपुरावा करून पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवारातील शेतकर्यांनी डॉ. दिलीप येळगावकर यांचा सन्मान केला. या पाण्याचे पूजन डॉ. दिलीप येळगावकर, डॉ. सौ.उर्मिला येळगावकर, युवानेते सचिन गुदगे, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, उपसरपंच आनंदराव शेवाळे, महादेव ढवळे, नितीन पडळकर, अभिजित काबुगडे, महिला व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.स्व.भाऊसाहेब गुदगे यांचे स्वप्न डॉ. येळगावकरांच्या प्रयत्नातून साकार झाल्याबद्दल युवानेते व मायणीचे सरपंच सचिनभाऊ गुदगे यांनी आनंद व्यक्त केला.पत्रकारांशी बोलताना डॉ. येळगावकर म्हणाले, आ. चंद्रकांतदादा पाटील, ना. गिरीश महाजन, सुभाष देशमुख यांच्याशी पाणी योजनांसंबंधी चर्चा झाली होती.धोंडेवाडी उड्डाणपुलाचे काम बंद होते. पुन्हा पाठपुरावा केला.त्यामध्ये रणजित देशमुखांचाही वाटा आहे. तारळीसाठी प्रयत्न केला. अनफळे व माळीनगर या ठिकाणी पाणी नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.गुंडेवाडी, यलमरवस्ती, चितळी येथे पाणी नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भाऊसाहेबांना हे पाणी आणायचे होते. उरमोडीतून तारळीत पाणी येत आहे. टेंभूचे पाणी लवकरच मायणीच्या धरणात येईल. मायणीतील पंढरपूर- मल्हारपेठ महामार्गाचेही काम 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. यशवंतबाबा मंदिराजवळचा रस्ता रुंदीकरणातील अडचणी दूर करू. पूर्ण इमारत ढासळू नये म्हणून काहीना सवलत दिली. अभेद्य संघटनेच्या जोरावर विकासकामे गतीने पूर्ण होत आहेत असे डॉ. येळगावकर म्हणाले. मोहन दगडे यांनी आभार मानले. राजू कचरे यांनी सूत्रसंचालन केले.
ता.२८-०६-२०२० विटा प्रतिनिधी : खानापूर तालुक्यात बांधकामांची संख्या जवळपास दोन हजारांच्या पुढे गेली आहे. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असणारा हा एकमेव व्यवसाय अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारा असतानाच करोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सध्या या व्यवसायाला घरघर लागली आहे. या व्यवसायाशी निगडित इतर व्यवसायांमध्ये गुंतवणूक करणारे लोक, बांधकाम व्यवसायाशी निगडित असणारे व्यवसाय तसेच कामगार कारखानदार मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. या व्यवसायावर आधारित सुमारे एक लाख कामगार आणि पूरक व्यवसायांना झळ बसली आहे.गेल्या पंधरा वर्षांत खानापूर तालुक्यातील भाग मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. तसेच विटा शहरालगतचा काही परिसर विकसित झाला आहे. येथील परिसरात लाखो सदनिका तयार झाल्या आहेत. आजही या भागात प्रधानमंत्री आवास योजना,रमाई आवास योजना असे अनेक गृहप्रकल्पाचे विस्तार सुरू आहे. लाखोंची संख्या या परिसरात आहे. तसेच पूरक घटकांना रोजगारांच्या संधी मिळाल्या आहेत. सुमारे एक लाख लोकांच्या हाताला काम मिळाले आहे. मात्र, गेल्या चार ते पाच वर्षांत बांधकाम क्षेत्राला मरगळ आली आहे. संथगतीने सुरू असलेले हे क्षेत्र लॉकडाऊनच्या चक्रव्यूहात पुरते अडकले आहे. काळात कामे रखडली आहेत. अनेकांनी घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नामांकित गृहप्रकल्पामध्ये बॅंकांची कर्ज घेऊन गुंतवणूक करून आपल्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यानुसार अनेकांनी बॅंकांचे हप्ते देखील भरले आहेत. मात्र, सध्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे ही बांधकामे कधी पूर्णत्वास येणार आणि नागरिक कधी या घरांमध्ये राहण्यास येणार, हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. बॅंकांची हप्ते नागरिकांना चुकणार नाहीत. मात्र घरांमध्ये राहण्यास आणि घर पूर्ण होण्यास मात्र दिरंगाई होणार आहे. कामगारांची संख्या घटली खानापूर तालुक्यात विटा,खानापूर, आळसंद, लेंगरे, भाळवणी,गार्डी, नागेवाडी,सांगोला आदी परिसरात गृहप्रकल्पांची संख्या जास्त आहे. ग्रह प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या मजुरांची संख्या देखील याच प्रमाणात आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कामगार या भागातून पायी चालत आपापल्या भागाकडे निघून गेले आहेत. काही मजूर मिळेल त्या साधनाने आपल्या गावी पोहोचले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हे व्यवसाय उभे राहण्यास मजुरांची गरज भासणार आहे. पण मजूरच नसल्याने हा व्यवसाय पुन्हा कसा उभारी घेणार, हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. बांधकामाशी निगडित व्यवसाय संकटात बांधकाम क्षेत्राला लागणाऱ्या कच्चा मालाचा पुरवठा करणारी यंत्रणा ही तालुक्यातील याच भागात आहे. सध्या कच्चामालाचे पुरवठा करणारे तसेच इतर बांधकामाशी निगडीत साहित्य पुरवणाऱ्या अनेक लघुउद्योग तसेच मोठे उद्योग तसेच त्याच्याशी निगडित असणाऱ्या साहित्य साधने व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांवर सध्या उपासमारीची वेळ आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हाताला काम नसल्याने तसेच आपल्या कामाच्या कोणतेही रकमा संबंधित बांधकाम व्यावसायिकाला देता येत नसल्याचे चित्र असल्याने अशा नागरिकांना कामापासून व उत्पन्नापासून वंचित राहण्याशिवाय पर्याय उरला नाही. सामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यास वेळ लागणार आहेत. बॅंकांची देणी बांधकाम व्यावसायिक व सामान्य नागरिकांना द्यावीच लागणार आहेत. बांधकाम व्यवसायाशी निगडित असणारे इतर व्यावसायिक मात्र, या व्यवसायामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन शासनाच्या पूर्वपरवानगीने अटी आणि नियम यांना अधीन राहून अशा व्यवसायांना उभारी देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
ता.२७-०६-२०२० कडेगाव प्रतिनिधी : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील.त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे असं पडळकर म्हणाले आहेत.शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेनंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. ठिकठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांचं कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जात आहे. इतकंच नाही तर पंढरपुरात गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. तर सांगलीत 100 गाड्यांच्या ताफ्यासह पडळकरांची 'ग्रँड एण्ट्री' झाली. धनगर समाजाकडून पडाळकर यांच्या समर्थनार्थ चंद्रभागेच्या वाळवंटात दुग्धाभिषेक करण्यात आला. गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दूध आणि चंद्रभागेच्या पाण्याने अभिषेक घालून त्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला. पडळकर यांच्या विधानावर आंदोलन करताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे भ्रष्ट हात आमच्या नेत्यांच्या प्रतिमेला लागल्याने, प्रतिमेला अभिषेक घालून शुद्ध केले, असं यावेळी पडळकर समर्थकांनी नमूद केलं. पडळकरांच्या समर्थनात एकच छंद गोपीचंद, अशा घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या. सांगलीमध्ये देखील गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुधाने अभिषेक घालण्यात आला आहे.दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील जतमध्ये धडाकेबाज एण्ट्री केली. जतमध्ये 100 पेक्षा जास्त गाड्यांच्या ताफ्यासोबत गोपीचंद पडळकर यांची एण्ट्री झाली. जतमध्ये पडळकर यांचा सत्कार झाला. गाड्यांच्या ताफ्यासहित शेकडो कार्यकर्ते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील आरोपानंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. काही ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांचं कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जात आहे. फटाक्यांची आतषबाजी, पडळकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, एकच छंद गोपीचंद. अशी घोषणाबाजी करत उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जात आहे.
ता.२७-०६-२०२० विटा प्रतिनिधी : आमदार गोपीचंद पडळकर यांचे व्यक्तीमत्व आणि त्यांनी आजवर केलेले पक्षबदल पाहता आणि अनेक नेत्यांबद्दल केलेली बेताल आणि आक्षेपार्ह वक्तव्ये पाहता त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा करणे गैर आहे. "आमदार गोपीचंद पडळकरांच्या वयाच्या दुप्पट वयाची पवारसाहेबांची कारकीर्द आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाल्याप्रमाणे त्यांनी आमचे नेते शरद पवार यांच्यावर केलेली टीका आम्ही कदापी सहन करणार नाही. त्यांनी बेताल व संतापजनक वक्तव्याबद्दल बिनशर्त जाहीर माफी मागावी, अन्यथा पडळकरांना जशास तसे उत्तर देवू," असा इशारा माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अॅड.बाबासाहेब मुळीक, खानापूर तालुकाध्यक्ष किसन जानकर, खानापूर विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर, माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गजानन निकम, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र कांबळे, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष हरी माने यांची प्रमुख उपस्थिती होती. अॅड. सदाशिवराव पाटील म्हणाले, " पडळकरांनी वापरलेल्या भाषेचा आणि वक्तव्याचा खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने जाहीर निषेध करत आहोत. आमदार गोपीचंद पडळकर यांचे व्यक्तीमत्व आणि त्यांनी आजवर केलेले पक्षबदल पाहता आणि अनेक नेत्यांबद्दल केलेली बेताल आणि आक्षेपार्ह वक्तव्ये पाहता त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा करणे गैर आहे. आमदार गोपीचंद पडळकरांच्या वयाच्या दुप्पट वयाची पवारसाहेबांची कारकीर्द आहे. पडळकरांना बेताल आणि आक्षेपार्ह वक्तव्ये करण्याची सवयच आहे. विधानपरिषदेतील 78 आमदारांपैकी ते एक आहेत. अजून त्यांच्या आमदारकीला एक महिना पुर्ण व्हायचा आहे. आमदारकीची ओळख व्हायची आहे. आमदार झाल्यानंतर पडळकरांच्याकडून जबाबदारीचे आणि पोक्तपणाचे लक्षण अपेक्षित आहे. परंतु त्यांनी बेताल वक्तव्य केले. याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर देवू. जर त्यांचे वर्तन सुधरले नाही तर भविष्यात प्रसंगी रस्त्यावर उतरून त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देवू."असे पाटील म्हणाले. अॅड. बाबासाहेब मुळीक म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर यांनी बेताल व संतापजनक वक्तव्याबद्दल बिनशर्त जाहीर माफी मागावी. यावेळी माजी सभापती अविनाश चोथे, राष्ट्रवादीचे विटा शहराध्यक्ष नितीन दिवटे, विटा शहर मुस्लिम ओबीसीचे अध्यक्ष इजाज मुल्ला, विटा शहर युवकचे अध्यक्ष सिध्दार्थ शितोळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ता.२६-०६-२०२० मुंबई प्रतिनिधी : कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन झाल्यापासून बंद असलेली महाराष्ट्रातील सर्व केश कर्तनालये येत्या रविवारपासून (२८ उघडण्यास राज्य सरकारने अखेर परवानगी दिली आहे. मात्र, फक्त डोक्यावरील केस कापता येतील. दाढी, फेशियल करण्यास मनाई करण्यात आली आहे. ती सुरू करण्यास परवानगी देताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालक कारागीर व ग्राहक यांनी करावे, अशी अटही घालण्यात आली आहे. केश कर्तनालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी राज्यातील ब्युटी पार्लर्स, स्पा, जीम मात्र सुरू करण्यात येणार नाहीत. ती कधी सुरू होतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अर्थात हातावर पोट असलेल्या केश कर्तनालयातील काही लाख कारागिरांना या निर्णयाचा मोठा दिलासा मिळाला आहे.शिवाय सलून मालकांनाही नियमित उत्पन्न मिळू शकेल. आर्थिक संकटात सापडलेल्या नाभिक समाजाच्या काही तरुणांनी आत्महत्या केली. तसेच केश कर्तनालये सुरू करण्यास परवानगी द्या, यासाठी आंदोलनेही केली. नाभिक सामाजाच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून राज्यभरातील केश कर्तनालये उघडण्यास परवानगी दिल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. ।ही काळजी घ्यावी लागेल सलूनमध्ये फक्त कटिंग करता येईल. ग्राहक व कारागिराना मास्क अनिवार्य सलूनमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी जीम, स्पा सुरू करता येणार नाही दाढी, फेसियल करता येणार नाही.
ता.२६-०६-२०२० आटपाडी प्रतिनिधी : सांगली : लॉकडाऊन काळात आटपाडी निर्यात सुविधा केंद्रातून पहिल्यांदाच द्राक्ष 200 टन व डाळींबाची 50 टन निर्यात झाल्यामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला. यामुळे स्थानिक बाजारभाव वाढण्यास मदत झाली आहे. अशी माहिती पणन विभागाचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी दिली. त्यांनी सांगितले की, कृषि पणन मंडळाने सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि उत्पन्न बाजार समिती, आटपाडी येथे उभारलेल्या निर्यात सुविधा केंद्रातून प्रांजली प्रशांत नारकर, मे सदगुरु एंटरप्रायजेस ठाणे यांच्या माध्यमातून द्राक्ष व डाळिंब निर्यात सुरु करण्याबाबत प्रयत्न करण्यात आले. लॉकडाऊन कालावधीत निर्यात सुविधा केंद्र, आटपाडी येथून तासगांव, कवठेमहांकाळ, पलुस, सांगोला, आटपाडी, दिघंची व पंढरपुर या परिसरातील द्राक्ष व डाळींब उत्पादकांची 200 मेट्रिक टन द्राक्ष मलेशिया, दुबई, बांग्लादेश या देशात व 50 मेट्रिक टन डाळिंब दुबई येथे निर्यात करण्यात आली. निर्यातीमुळे द्राक्ष उत्पादकांना सरासरी दर 40 ते 50 रूपये प्रति किलो तर डाळिंब उत्पादकांना 60 ते 70 रुपये प्रति किलो दर मिळाला. स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून पणन संचालक सुनिल पवार, सरव्यवस्थापक दीपक शिंदे, उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड यांच्या प्रयत्नाने प्राजंली नारकर यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातून आटपाडी निर्यात सुविधा केंद्रातून पहिल्यांदाच द्राक्ष, डाळींबाची निर्यात झाली. जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदा अतिवृष्टीमुळे महापुराचा तडाखा बसला होता. त्यामधुन सावरुन शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करुन द्राक्ष, डाळिंबाचे चांगले उत्पादन घेतलेले होते. हंगामाच्या जगभरात कोरोना विषाणूने हातपाय पसरण्यास सुरुवात केली. कोरोना विषाणुमुळे संपुर्ण देशभर लॉकडाऊन केल्यामुळे ऐन हंगामात स्थानिक बाजार पेठात द्राक्षाचे दर 15 ते 20 रुपये प्रति किलो व डाळिंबाचे दर 25 ते 30 रुपये प्रति किलो पर्यंत खाली आलेले होते. तसेच वाहतुक निर्बंध व मजुर स्थलातंरामुळे निर्यातीवरती सुध्दा मर्यादा आलेल्या होत्या.
ता.२६-०६-२०२० सांगली प्रतिनिधी : राष्ट्रवादी नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल गोपीचंद पडळकर यांच्या आमदारकीचा भाजपने राजीनामा घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. दोन दिवसात पडळकरांनी माफी मागितली नाही, तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.ते म्हणाले की, शरद पवारांना कोरोना संबोधून पडळकरांनी महाराष्ट्रच्या राजकीय परंपरेला काळीमा फासला आहे. त्यांच्या वक्तव्याबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगीरी व्यक्त केली. भाजपचे अन्य नेतेसुद्धा या वक्तव्याशी सहमत नाहीत. त्यामुळे भाजपने केवळ दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी पडळकरांची आमदारकी काढून घेऊन त्यांची हकालपट्टी करावी. अशी कारवाई न झाल्यास भाजपसुद्धा या कटकारस्थानाचा भाग असल्याची महाराष्ट्राला खात्री पटेल. पडळकरांवर कारवाई झाल्यास खरोखर भाजप शिस्तप्रिय पक्ष आहे, हे आम्ही जाहीरपणे कबूल करू. शरद पवारांबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंढरपुरात न येण्याचा सल्ला देऊन मुंबईतील कोरोनाबाधितांच्या प्रमाणाचा उल्लेख पडळकरांनी करून त्यांचाही अवमान केला आहे. तेसुद्धा मुंबईतूनच आमदारकीची शपथ घेऊन पंढरपुरात आले होते. मागील दाराने आमदार होऊन समाजाची, विविध पक्षांशी गद्दारी करणाऱ्या पडळकरांची कोणाला सल्ला देण्याची लायकी नाही. ज्या भाजपच्या नेत्यांना शिव्यांची लाखोली पडळकरांनी वाहिली त्याच पक्षाच्या वळचणीला ते गेले आहेत. भाजपच महाराष्ट्राला आणि देशाला लागलेला कोरोना असून सत्तेच्या मोहापायी हा पक्ष कोणत्याही थराला जात आहे. मानसिक रोगी बनून कोणतीही वक्तव्य भाजप नेते करीत आहेत, असे विभुते म्हणाले. यावेळी उपजिल्हाप्रमुख शंभोराज काटकर, महेंद्र चंडाळे, मयुर घोडके, अमोल पाटील आदी उपस्थित होते. विठ्ठलाचे नाव घेऊ नका! ज्या पडळकरांनी बिरोबाची खोटी शपथ घेऊन एका देवाला फसविले त्यांनी आता विठ्ठलाचे नाव घेऊन दुसऱ्या देवाला फसवू नये. पंढरपुरात मुख्यमंत्र्यांनी यायचे की नाही ते पंढरीचा विठ्ठल व भक्त ठरवतील. त्यामुळे पडळकरांनी आता विठ्ठलाच्या नावावर कोणाला सल्ले देऊ नयेत, असे विभुते व शंभोराज काटकर म्हणाले.
ता.२६-०६-२०२० सांगली प्रतिनिधी : विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केटमधील वादग्रस्त बांधकामावरून गुरूवारी व्यापारी संघटनांनी लाक्षणिक बंद पाळला. बंदला मोठा प्रतिसाद मिळाल्याने फळे व कांदा, बटाटा विभागाकडील सुमारे 50 लाखांची उलाढाल ठप्प झाली. बेकायदा बांधकाम सुरूच ठेवल्यास बेमुदत बंदचा इशारा दिला. कायदेशीर परवानगी काढून गाळे बांधकाम करण्याची मागणी संघटनांनी केली.विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये कोल्डस्टोअरेज व पार्किंगसाठी 40 गुंठे जागा आहे. त्यातील अडीच गुंठे जागेवर आठ अडत्यांना अडत दुकानांच्या शेड बांधकामासाठी भूईभाड्याने जागा दिली जात आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निर्णयाला विष्णूअण्णा फ्रूट असोसिएशनचा विरोध आहे. विष्णूअण्णा फ्रूट असोसिएशन व कांदा, बटाटा व्यापारी असोसिएशन यांनी गुरूवारी मार्केटमध्ये लाक्षणिक बंद पाळून पवित्रा स्पष्ट केला. सुमारे 50 लाखांची उलाढाल ठप्प झाली. व्यापार्यांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादीचे प्रदेश सुरेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक राष्ट्रवादीचे राहूल पवार यांनी भेट दिली. व्यापार्यांचे म्हणणे ऐकून घेतले. महापालिकेकडून परवानगी घेऊन कायदेशीर बांधकाम व्हावे यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक तसेच बाजार समितीचे सभापती यांना विनंती करणार आहे. बाजार समितीने शेजारील जमीन खरेदी करून गाळे बांधण्याबाबत विचार करावा, असेही पाटील व बजाज यांनी सांगितले. फ्रूट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल आलदर, उपाध्यक्ष समीर बागवान, अस्लम बागवान, सागर मदने, पांडुरंग आलदर, राजू यमगर, सिद्धेश्वर तोडकर, आप्पासाहेब तोडकर, सुनील वाघमोडे तसेच कांदा व बटाटा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विलास शिंदे, उपाध्यक्ष आरिफ बागवान, माजी अध्यक्ष राजेश पोपटानी, गजानन आलदर, अभिनंदन निलाखे, मोहन माने, जब्बार बागवान उपस्थित होते. बेकायदा बांधकाम सुरू ठेवल्यास बेमुदत बंद : आलदर फ्रूटस् असोसिएशनचे अध्यक्ष अनिल आलदर म्हणाले, मार्केट यार्डात बेकायदा बांधकाम करू नये. परवानगी न घेता बेकायदा काम सुरू ठेवल्यास मार्केटमध्ये बेमुदत बंद आंदोलन केले जाईल. आंदोलनाची पुढील दिशा सोमवारी स्पष्ट होईल. मार्केट शेजारी आरक्षण पडलेली जागा बाजार समितीने खरेदी करावी व महापालिकेची परवानगी घेऊन दुकानगाळे बांधून द्यावेत.
ता.२५-०६-२०२०सांगली प्रतिनिधी : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन दरम्यान गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टसिंग चे पालन करून लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी महाराष्ट्र शासनाच्या दि. 31 मे रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेली आहे. तथापि हे लग्न समारंभ कोणकोणत्या ठिकाणी पार पाडता येतील याबाबतचा उल्लेख आदेशामध्ये नाही. 50 लोकांच्या मर्यादेत घराच्या परिसरात लग्न समारंभ साजरे करणे अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे विविध सूचना व मागण्या विचारात घेता तसेच आता पावसाळा सुरू झाला असल्यामुळे खुले लॉन, विना वातानुकुलित मंगल कार्यालय / हॉल/सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टसिंग तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभ पार पाडण्यास नागरिकांकडून मागणी प्राप्त झाल्यास परवानगी देण्यात यावी, असे राज्य शासनाकडून दि. 22 जून रोजीच्या आदेशान्वये कळविले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिलीे. त्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत खुले लॉन, विना वातानुकुलित मंगल कार्यालय / हॉल / सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टसिंग तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्देशांचे पालन करण्याच्या अटींवर लग्न समारंभ पार पाडण्यास परवानगी दिली असून तसे आदेश जारी केले आहेत. तथापि लग्न समारंभ पार पाडत असताना पुढील बाबी करणे बंधनकारक राहील. भविष्यात लग्न समारंभात सामील व्यक्तीपैकी एखादा व्यक्ती कोविड-19 चा रूग्ण आढळल्यास सदर रूग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सहजरीत्या होण्याकरीता लग्न समारंभास उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींची (व्यवस्थापक कर्मचारी सहित) यादी संबंधित मंगल कार्यालय / हॉल / सभागृह तसेच घर मालक यांनी त्यांच्याकडे जतन करून ठेवणे बंधनकारक राहील. लग्न समारंभाच्या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्क्रिनिंग मशिन ने थर्मल स्क्रिनिंग करणे व त्याची नोंद ठेवणे संबंधित मंगल कार्यालय / हॉल / सभागृह यांच्यावर बंधनकारक राहील. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरूध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करण्याकामी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना या आदेशाव्दारे प्राधिकृत करण्यात आले आहे.
ता.२४-०६-२०२० सांगली प्रतिनिधी : गेल्यावर्षीच्या महापुराने ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे उसाचे वजन घटून शेतकर्यांना फटका बसला; पण आता साखर कारखान्यांचा उताराही घटला आहे. त्याचा परिणाम यंदाच्या ऊस दरावर होणार आहे.गेल्या वर्षी महापुरातील बुडित ऊस कारखान्यांनी नेला. पण त्यामुळे अनेक कारखान्यांचा सरासरी साखर उतारा घसरली. त्याचा परिणाम पुढील हंगामातील ऊस दरावर होणार आहे. कारण मागील हंगामातील सरासरी उतार्यावर पुढील हंगामाची एफआरपी ठरते.बहुसंख्य कारखान्यांचा सरासरी उतारा अर्धा ते एक टक्का घसरला आहे. यामुळे गेल्या वर्षीपेक्षा प्रतिटन 140 ते 300 रुपयांपर्यंत एफआरपी कमी होणार आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील उतारा कमी झालेल्या कारखान्यांचे एकूण गाळप हे 120 लाख टन होते.या वर्षी वाढलेल्या ऊस क्षेत्राचा विचार झाल्यास येत्या हंगामात या कारखान्यांचे गाळप 160 लाख टन होईल, असा अंदाज आहे. एकूण गाळप आणि उतारा घटल्याने कमी होणारा दर यांचा विचार केल्यास कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकर्यांचे जवळपास 225 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.ऊस उत्पादकांच्यादृष्टीने विचार केल्यास ही फार मोठी रक्कम आहे. शासनाच्या चुकीमुळे मागील वर्षी महापूर आला त्यामुळे या नुकसानीची भरपाईही शासनाने केली पाहिजे, अशी शेतकरी संघटनांची मागणी आहे. अनेक कारखान्यांनी आर्थिक अडचणीचे कारण सांगत एफआरपी थकवली आहे. काहींनी तीन तुकडे पाडले आहेत. थकीत एफआरपीचे 15 टक्के व्याज अजून दिलेले नाही. त्यातच हा फटका बसणार आहे. यामुळे शेतकर्यांत नाराजीचे वातावरण आहे. सरकार कारखानदारांना हजारो कोटी रुपयांच्या पॅकेजची खिरापत वाटते. त्यामुळे सरकारने कमी झालेल्या दराची भरपाई करण्याची गरज आहे. शेतकर्यांनीही याचा विचार करून आपल्या लोकप्रतिनिधींमार्फत शासनाने मदत मिळावी, यासाठी रेटा वाढवावा. अनेक कारखान्यांचे अध्यक्ष हे मंत्री, खासदार, आमदार आहेत. त्यांनी या नुकसानीची भरपाई शेतकर्यांना मिळाली पाहिजे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. - धनाजी चुडमुंगे, पदाधिकारी, आंदोलन अंकुश
ता.२४-०६-२०२० विटा प्रतिनिधी : शिवसेनेत जात पात मानली जात नाही असे सांगितले जाते. त्यामुळे प्रकाश शेंडगे यांना जातीच्या आधारावर संधी दिली जाईल का, यासंबंधीही शंका आहे.धनगर समाजाचे नेते, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी गेल्या दीड वर्षांत तीन राजकीय पक्षांचा प्रवास केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत ते शिवसेनेचा प्रचार करत होते. त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होत आहे. शिवसेना पक्षाने प्रकाश शेंडगे यांच्या माध्यमातून पहिला धनगर आमदार विधान परिषदेत पाठवावा, यासाठी शेंडगे समर्थकांनी जोर लावला आहे.राज्यपाल नियुक्त आमदारपदांसाठी काही दिवसांत राज्य मंत्रीमंडळ शिफारस पाठवणार आहे. त्यासंबंधाने विविध सामाजिक घटक प्रतिनिधित्वासाठी धडपडत आहेत. प्रकाश शेंडगे यांना धनगर समाजाचे प्रतिनिधी म्हणून आमदारकी हवी आहे. प्रकाश शेंडगे हे माजी मंत्री शिवाजीराव शेंडगे यांचे पुत्र. सांगली जिल्ह्यातील केरेवाडीचे हे शेंडगे कुटूंब शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर हे कुटुंब काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आले, मात्र शिवाजीराव शेंडगे यांच्या पश्चात प्रकाश शेंडगे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांना भाजपने लगेचच विधान परिषद सदस्य केले. पुढे 2009 मध्ये सांगली जिल्ह्यातील जत मतदारसंघातून ते भाजपचे आमदार झाले. 2014 च्या विधानसभेला त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आमदारकी लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीअगोदर त्यांनी राष्ट्रवादी सोडली. राष्ट्रवादीत राहून ओबीसींच्या मुद्यावर काम करता येत नसल्याचे कारण त्यांनी राष्ट्रवादी सोडताना दिले होते. राष्ट्रवादी सोडल्यानंतर ते ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीच्या माध्यमातून काम करू लागले. लोकसभेला त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा प्रचार केला. सांगली, सोलापूर जिल्ह्यात त्यांनी सभा घेतल्या होत्या. विधानसभा निवडणुकीवेळी ते शिवसेनेसोबत गेले. धनगर आरक्षण, ओबीसींच्या मुद्यावर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला साथ द्यायचा निर्णय घेवून राज्यभर प्रचार केला. विशेषत: धनगर बहुल मतदारसंघात प्रकाश शेंडगे हे उद्धव ठाकरेंबरोबर सभांना उपस्थित होते. या सभांमुळे शिवसेनेला मोठा फायदा झाल्याचा दावा प्रकाश शेंडगे समर्थकांचा आहे आणि त्यांनी आता विधान परिषद आमदारकीची मागणी लावून धरली आहे.राज्यपालनियुक्त 12 आमदार नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यात 2 आमदार धनगर समाजाचे होते. गेल्यावेळीप्रमाणे काँग्रेस- राष्ट्रवादीने प्रत्येकी 1 आमदार करावा व शिवसेनेने पहिल्यांदा धनगर समाजाला संधी द्यावी, अशी मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे. या तिन्ही पक्षाकडे अनेक इच्छुक प्रयत्नशील आहेत. शिवसेनेकडून मात्र प्रकाश शेंडगे यांना अधिक संधी आहे. शेंडगेंच्या बाबतीत उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे आता महत्वाचे आहे. 12 जागा पैकी काँग्रेसला अधिकच्या जागा हव्या आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्य़ाला कमी जागा येवू शकतात. ही बाब प्रकाश शेंडगे यांना मारक ठरू शकते. शिवसेनेने जरी शेंडगेंचे नाव ठरवले तरी त्या नावाला राष्ट्रवादीचे प्रमुख आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांची संमती मिळणे आवश्यक आहे. कारण धनगर समाजाचे प्रतिनिधी म्हणून कोणाला घ्यायचे आणि कोणत्या पक्षातून घ्यायचे हे तिन्ही पक्ष आपसात ठरवणार आहेत. राष्ट्रवादीकडे दोन धनगर नेते आहेत की त्यापैकी एकाला विधान परिषदेवर घेतले जावू शकते. जर राष्ट्रवादीने धनगर नेत्याला संधी दिली तर शिवसेनेकडून प्रकाश शेंडगे यांना संधी मिळणे अवघड आहे. दुसरी बाब म्हणजे प्रकाश शेंडगे हे गेल्याच वर्षी राष्टवादी सोडून गेले आहेत. आतापर्यत त्यांनी दोनदा राष्ट्रवादी सोडली आहे. हा घटनाक्रम पाहता शरद पवार हे प्रकाश शेंडगे यांच्या नावाला प्राधान्यक्रम देतात की नाही, हे पाहावे लागणार आहे.शिवसेनेत जात पात मानली जात नाही असे सांगितले जाते. त्यामुळे प्रकाश शेंडगे यांना जातीच्या आधारावर संधी दिली जाईल का, यासंबंधीही शंका आहे. त्यातच विधानसभेवेळी धनगर समाजाला शिवसेनेचा एक वाईट अनुभव आला आहे. 2014 ला करमाळा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे नारायण पाटील निवडून आले होते. पाटील धनगर समाजातून येतात. त्यांचे काम चांगले होते. मात्र 2019 ला उद्धव ठाकरे यांनी त्यांचे तिकीट कापले. त्यामुळे शिवसेनेला आता धनगर समाजाला प्रतिनिधीत्व देवून समाजाला योग्य संदेश देणार कां, ते पहावे लागणार आहे.
ता.२३-०६-२०२० मायणी प्रतिनिधी : दुष्काळी भागामध्ये शासनामार्फत बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्यांमध्ये तसेच लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या माती बांधमध्ये बाराही महिने पाणीसाठा होत आहे. यामुळे हे सिमेंट बंधारे व माती बांध दुष्काळी भागातील शेतकरी व ग्रामस्थांसाठी वरदान ठरत आहेत. पाणी शिल्लक असल्याने पिके चांगले घेता येत आहेत. खटाव तालुक्याच्या पूर्व-उत्तर भागामध्ये कोणतीही पाणी योजना नाही. पावसाचे प्रमाणही खूप कमी आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी व ग्रामस्थांना वर्षभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. शासनामार्फत काही वर्षांपासून या ठिकाणी प्रत्येक नैसर्गिक ओढे नाल्यांवर साखळी पद्धतीने सिमेंट बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता.या उपक्रमाअंतर्गत या दुष्काळी पट्ट्यातील अनेक गावांमध्ये शेकडो सिमेंट बंधारे तयार झाले आहेत.शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या जलसंधारण, रोजगार हमी योजना तसेच पाणी फाउंडेशन उपक्रमांतर्गत येथील माळराण, डोंगर उतार व मोकळ्या जागेमध्ये लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या माती बांध तयार करण्यात आले आहेत.सिमेंट बंधारे व माती बांधामध्ये गतवर्षी अवकाळी पावसामुळे पाणी साठले होते. साठलेले पाणी मोठ्या प्रमाणात मुरल्यामुळे भूगर्भातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे विहिरी, कूपनलिकांना बाराही महिने पुरेसे पाणी मिळाले. या भागातील बहुतांशी सिमेंट बंधाऱ्यात आठ ते दहा महिन्यांपासून पाणीसाठा दिसत होता. यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे सिमेंट बंधाऱ्यामध्ये पुन्हा पाणीसाठा निर्माण झाला आहे. तसेच माती बांध व तयार केलेले नालाबांध, पाझर तलाव यामध्ये ही पाणीसाठा निर्माण होऊ लागला आहे. डोंगर कपारीत वसलेल्या पाचवडसारख्या गावामध्ये २०१८ मध्ये शासनामार्फत पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या पाण्यासाठी सलग अठरा महिने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत लागला होता. मात्र, गतवर्षी मार्च-एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये लोकसहभागातून व शासनाच्या सहकार्यातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. यात जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने मोठा पाणीसाठा निर्माण झाला. लाखो लिटर पाणी मुरले. त्यामुळे यंदा टँकर लागला नाही. पन्नास वर्षांमध्ये पहिल्यांदाच या भागातील नैसर्गिक ओढे नाल्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसातच वाहू लागले आहे. - माणिक महाराज घाडगे, पाचवड जलसंधारणाची कामे प्रेरणादायी शासनाच्या सहकार्यातून बांधण्यात आलेले सिमेंट बंधारे तसेच लोकसहभागातून झालेल्या विविध जलसंधारणाच्या कामामुळे दुष्काळी भागातील हे बदललेले चित्र खरोखरच एक प्रेरणादायी व आशावादी असले तरी शासनाने या भागात कायमस्वरूपी व पाण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. केवळ एकाच गावात टँकर यावर्षी भागामध्ये शासनाला यावर्षी अनफळे गावाचा अपवाद वगळता कोणत्याही गावात टँकरची गरज भासली नाही. त्यामुळे दुष्काळी भागातील हे सिमेंट बंधारे, मातीबांध, पाझर तलावांमध्ये बाराही महिने पाणीसाठा राहिल्याने हे उपक्रम दुष्काळी भागातील शेतकरी व ग्रामस्थांसाठी फायदेशीर ठरत आहेत.
ता.२३-०६-२०२० विटा प्रतिनिधी : सेवा निवृत्त पोलीस उपअधीक्षक श्री.अनिल भगवान कोळी (व्यव ६०) सध्या रा. बुधगाव मुळगाव विटा यांचे सोमवारी अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी,तीन मुले,भाऊ,भावजय,नातवंडे,असा परिवार आहे. राक्षाविसर्जन बुधवार सकाळी १० वाजता विटा येथे होणार आहे.
ता.२३-०६-२०२० सांगली प्रतिनिधी : मा. सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो रिट पिटीशन (सिव्हील) क्र. (एस) 6/2020 मध्ये स्थलांतरीत कामगारांकरीता करावयाच्या कार्यवाहीबाबत केंद्र शासन, राज्य शासन, केंद्रशासीत प्रदेश यांना निर्देश दिले आहेत. निर्देशांचे अनुपालन करण्याच्या दृष्टीने स्थलांतरीत कामगारांना मार्गदर्शन करणे, त्यांच्यासाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देणे, त्यांचे विविध प्रश्न, अडचणी व समुपदेशनासाठी सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, उद्योग भवन सांगली येथे सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त ए. डी. गुरव यांनी दिली. सरकारी कामगार अधिकारी एम. व्ही. सोनार यांची केंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सुविधा केंद्राचा संपर्क क्रमांक 0233-2672046 असून संबंधितांनी www.mahabocw.in या संकेतस्थळावर अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. गुरव यांनी केले आहे.
ता.२२-०६-२०२० सातारा प्रतिनिधी : जिल्ह्यामध्ये आणखी 18 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. दिवसात 130 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या 20 जणांना दहा दिवसांनंतर घरी सोडण्यात आले. खटाव तालुक्यातील वाकळवाडी येथील 61 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.कऱ्हाड तालुक्यातील हिंगनोळे येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता आणखी 17 बाधितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. कऱ्हाड तालुक्यातील वडगाव (उंब्रज) येथील 59 वर्षीय पुरुष, तारुख येथील 22 वर्षीय पुरुष, येळगावातील 65 वर्षीय पुरुष, गोवारे येथील 39 वर्षीय पुरुष, सैदापुरातील 29 वर्षीय पुरुष, सुपनेमधील 37 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील कराटे येथील 59 वर्षीय पुरुष, कोरेगावमधील 39 वर्षीय महिला, फलटण तालुक्यातील शेऱ्याचीवाडीतील (हिंगणगाव) 10 वर्षीय मुलगा, माण तालुक्यातील दहिवडीमधील 39 वर्षीय पुरुष, 21 व 17 वर्षीय तरुण, खटाव तालुक्यातील शिरसवाडीमधील 4 वर्षाची बालिका व 32 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील आरे तर्फ परळीतील 55 वर्षीय पुरुष, वाई तालुक्यातील कडेगाव येथील 74 वर्षीय महिलेला बाधा झाली. वाकळवाडी (ता. खटाव) येथील 61 वर्षीय पुरुष हा 14 जून रोजी मुंबईहून आला. वाकळवाडीत घरीच विलगीकरणात होता. ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी 11 वाजता त्यांचा मृत्यू झाला. उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्यांमध्ये माण तालुक्यातील पिंपरी येथील 28 वर्षीय महिला, 58 व 70 वर्षीय पुरुष, वडजल येथील 56 व 38 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवक, 55 वर्षीय पुरुष, भालवडी येथील 25 वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील वडगाव येथील 68 वर्षीय पुरुष, जावळी तालुक्यातील प्रभुचीवाडी येथील 52, 28 व 26 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, कळकोशी येथील 39 वर्षीय महिला, जावळी येथील 43 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील पाचवड येथील 30 वर्षीय पुरुष, पळसगाव येथील 41 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील वावदरे येथील 45 वर्षीय महिला, माणगाव (अतित) येथील 35 वर्षीय पुरुष, कारंडवाडी येथील 65 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. जिल्ह्यामधील विविध ठिकाणी दाखल असलेल्या 134 जणांचे नमुने आज तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील 21, कृष्णा हॉस्पिटलमधील 28, कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालयातील 19, कोरेगाव ग्रामीण रुग्णालयातील 4, वाई ग्रामीण रुग्णालयातील 7, शिरवळ येथील 5, रायगाव येथील 7, पानमळेवाडी येथील 6, मायणी येथील 11, महाबळेश्वर येथील 1, पाटण येथील 25 जणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे 130 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. साताऱ्यात नवीन कंटेनमेंट झोन शहरातील केसरकर पेठेतील हरिजन-गिरीजन सोसायटीमध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे या परिसरात कंटेनमेंट झोन जाहीर करण्याबाबत मुख्याधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर मिनाज मुल्ला यांना पत्र दिले होते. त्यानुसार त्यांनी आज हरिजन- गिरीजन सोसायटीमधील संपूर्ण सी विंग कंटेनमेंट झोन जाहीर केली आहे. दरम्यान, वावदरे (ता.सातारा) येथील कंटेनमेंट झोनमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
ता.२१-०६-२०२० सांगली प्रतिनिधी : गुडेवार यांचा लौकिक अत्यंत कडक शिस्तीचे अधिकारी असा राहिला आहे. "बाप दाखव, नाहीतर श्राद्ध घाल', ही त्यांची सरळ कार्यशैली राहिली. त्यामुळे आता मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पदभार आल्याने अनेकांचे धाबे दणाणलेत."कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे, ही माझी ओरिजनल प्रायोरिटी आहे', असे सांगत चंद्रकांत गुडेवार यांनी जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊत यांची जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून बुधवारी रात्री बदली झाली. त्यांनी पदभार सोडण्यापूर्वी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याशी चर्चा करून प्रभारी पदभार सोपवावा, अशी विनंती केली होती. त्यानुसार काल रात्री चर्चा झाली. श्री. राऊत यांनी श्री. गुडेवार यांच्याकडे पदभार सोपवण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर लागलीच ते जळगावसाठी रवाना झाले. श्री. गुडेवार यांनी सकाळी पदभार स्वीकारत त्याच जोमाने काम सुरु केले. त्यांनी महापूर नियंत्रणासाठीच्या यंत्रणा आधी हाती घेतल्या. सांगलीवाडी येथील जामदार यांच्या बोट निर्मिती कारखान्याला त्यांनी भेट दिली. तेथे किती बोटी उपलब्ध आहेत. पुढील काळात किती तयार होतील, यावर चर्चा केली. त्याआधी मिरज पंचायत समितीत अचानक भेट देऊन दप्तर तपासणी केली आणि तेथील एकाला निलंबित केले. पदभार स्विकारल्यानंतर चंद्रकांत गुडेवार म्हणाले,"कृष्णा, वारणाकाठच्या गावांना महापुरापासून वाचवण्यासाठीचे संपूर्ण नियोजन करणे, हे आताचे मुख्य प्राधान्याचे काम असेल. सोबत कोरोना संकटात सुरु असलेली लढाई अशीच नेटाने सुरु राहणार आहे. विकास यंत्रणा अधिक गतीमान करण्यावरही भर राहिली. शिवाय, कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे, ही माझी ओरिजनल प्रायोरिटी आहेच.'' 'शिक्षण'चा वरिष्ठ सहायक निलंबित वारंवार संधी देऊनही कामात कमालीची हयगय केल्याप्रकरणी मिरज पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक अजित वडर यांना आज निलंबित करण्यात आले. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर काही तासातच चंद्रकांत गुडेवार यांनी हा दणका दिला. श्री. गुडेवार यांनी अचानक मिरज पंचायत समितीला भेट देऊन पाहणी केली. शिक्षण विभागाच्या कारभाराविषयी नेहमीच कुरबुरी सुरू असतात. वडर यांच्या कारभाराविषयी याआधी अनेक तक्रारी होत्या. त्यांच्यावर कारवाई करत विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानंतरही त्यांच्याकामात सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांचे दप्तर तपासण्यात आले. ग्रामविकास अधिकारी निलंबित आर्थिक अनियमितता प्रकरणी जत तालुक्यातील एका ग्रामविकास अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी ही कारवाई केली. सदर ग्रामसेवकाकडून सातत्याने आर्थिक अनियमितता होत असल्याने ही कारवाई झाल्याचे सांगण्यात आले. श्री. गुडेवार यांनी पदभार घेतल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी निलंबनाची कारवाई केली आहे.
ता.२१-०६-२०२० सांगली : जिल्ह्यातील 35 गावांना बोटींची आवश्यकता आहे. सध्या 15 बोटी खरेदीसाठी निविदा काढण्यात आली आहे. येत्या 10-15 दिवसांत पूर आल्यास काय करणार असा प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित करीत जलसंपदा मंत्र्यासमोर नाराजी व्यक्त केली. येत्या काही दिवसांत पूर आला तर काय नियोजन आहे, याचे उत्तर जलसपंदा मंत्री जयंत पाटील यांना देता आले नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.जलसंपदा मंत्री व पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पूर नियंत्रण आढावा बैठक झाली. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी बैठकीस उपस्थित होते.सभागृहात वडनेरे समितीच्या अहवालावर चर्चा सुरु असताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपाययोजनाबाबत चर्चेस सुरवात केली. जिल्ह्यातील 35 गावांना बोटींची आवश्यकता आहे. सद्या 15 बोटी खरेदीसाठी निवीदा काढण्यात आली आहे. येत्या 10-15 दिवसांत पूर आल्यास काय करणार असा प्रश्न पडळकर यांनी उपस्थित केला. यावरुन मंत्री जयंत पाटील व त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. आमदार पडळकर म्हणाले, गेल्यावर्षी बोटी नसल्याने ब्रम्हनाळ सारखी दुर्घटना घडली. सध्या पावसाचा जोर वाढला आहे. येत्या दहा- पंधरा दिवसात पूर आला तर काय करायचे असा प्रश्न मंत्री पाटील यांना विचारला असता, त्यांनी सभाच थांबवतो असे उत्तर दिले. निवीदा काढलेल्या बोटी कधी मिळणार याचे उत्तर त्यांच्याकडे नाही, त्या बोटींचे इंजिन जपानमधून येणार असल्याचे सांगतात. पण ते कधी येणार हे त्यांना माहित नाही. त्यामुळे आजची बैठक म्हणजे केवळ फार्स केला असल्याची टीकाही त्यांनी केली.
ता.१९-०६-२०२० विटा प्रतिनिधी : "सगळ्यांचे नुकसान मोजता येईल, पण शेतकऱ्यांचे नुकसान मोजता येत नाही. शेतकऱ्यांचे नुकसान मोजणारी यंत्रणा अजून निर्माण झालेली नाही," असे मत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी व्यक्त केले.खानापूर तालुक्यातील बलवडी येथील बलवडी ग्रामीण पतसंस्थेच्या वतीने आर्सेर्नीक अल्बम कोरोना प्रतिबंधसाठी व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गोळयांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार बाबर बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण खरमाटे, माजी सरपंच मारुती पवार उपस्थित होते."कोरोनाच्या काळात प्रत्येक घटकांचे नुकसान झाले आहे. सगळया घटकांचे नुकसान मोजता येईल, मात्र शेतकऱ्यांचे नुकसान मोजता येत नाही..." असे बाबर म्हणाले. सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांनी कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत बाबर यांच्याकडे कैफियत मांडली. तेव्हा बाबर म्हणाले, "शेतकऱ्यांचे याकाळात प्रचंड नुकसान झाले आहे. ते मोजता येणार नाही," यावेळी बाबर यांनी सांगितले. माझ्याकडे मयूर जगताप नावाचे शेतकरी रोज येऊन 'आज किती टन मिरची फेकून दिली'हे सांगायचे तेव्हा मला खूप त्रास होत होता. मला माहित असलेले हे एक उदाहरण आहे, असे किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल ? " "आर्सेर्नीक अल्बम कोरोना गोळ्या मीसुद्धा खातो. या गोळ्यांचा चांगला परिणाम होतोय का नाही माहिती नाही, पण वाईट परिणाम होत नाही. जोवर लस निघत नाही. तोवर लोकांनी आपली काळजी घेतली पाहिजे," असे बाबर म्हणाले. आशा सेविकांचे कौतुक करत आमदार बाबर म्हणाले, "आशा सेविकांनी या काळात जे काम केले, जी धडपड केली त्याचे कौतुक करण्याची गरज आहे. अतिशय कमी मानधनात त्या काम करत आहेत. मी त्यांच्या प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठवणार आहे." यावेळी आशा सेविकांनी आपल्या मागण्याचे निवेदन आमदार बाबर यांना दिले.
ता.१९-०६-२०२० सांगली/ कडेगाव प्रतिनिधी : रायगाव (ता. कडेगाव) येथे मुंबईहून आलेल्या 72 वर्षीय वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये गुरूवारी सायंकाळी कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनामुळे झालेला तालुक्यातील तिसरा बळी आहे. आता जिल्ह्यातील मृतांची संख्या 10 झाली आहे. दरम्यान, गुरूवारी जिल्ह्यात आणखी तीन रुग्ण आढळले. मौजे डिग्रज (ता. मिरज) येथील दाम्पत्य पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच कुटुंबातील आलेल्या 56 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल काल रात्री उशिरा आला. मालगाव (ता. मिरज) येथील 72 वर्षीय वृद्धेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ही वृद्धा मौजे डिग्रज येथील बाधित महिलेची नातेवाईक आहे.वशी (ता. वाळवा) येथील एक व्यक्ती बाधित आढळली. या दोन्ही बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन केले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. रायगाव येथील महिला व त्यांचे वृद्ध पती मुंबई येथे राहत होते. महिला घरात चालत असताना पडल्याने डोक्याला इजा झाली होती. त्यानंतर त्या 16 जून रोजी मुंबई येथून रायगावला गावी पती सोबत आल्या. मुंबईहून येताना त्यांच्या स्वॅबचा नमुना घेण्यात आला होता. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. दरम्यान, बुधवारी (ता. 17) त्यांची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी रायगाव येथून कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे आज सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांच्या स्वॅबचा नमुना घेण्यात आला. त्याचा अहवाल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला.दरम्यान, या महिलेच्या मृत्यूनंतर रात्री उशिरापर्यंत प्रशासनाने महिलेच्या संपर्कातील कुटुंबातील व अन्य लोकांना संस्थांत्मक विलगीकरण करण्याचे काम सुरू होते. रायगाव गाव सील केले. पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्ह्यात उपचार घेणारे 111 रुग्ण जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 272 झाली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 111 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मौजे डिग्रजमध्ये दोन दिवसांपूर्वी पती-पत्नी बाधित असल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक बाब म्हणजे पुरुष हा शासकीय कार्यालयात सेवक आहे. नोकरीनिमित्त निम्म्या गावाशी त्याचा संपर्क आला आहे. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी संपूर्ण गाव कंटेन्मेट झोनमध्ये आणण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, रात्री उशिरा 56 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला. पहिल्या टप्प्यात कोरोनाची लागण झालेल्या महिलेच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यात मालगाव येथील एका वृद्धेस कोरोनाची लागण झाल्याचे आज सकाळी स्पष्ट झाले. ती वृद्धा मौजे डिग्रजमधील महिलेची जवळची नातेवाईक आहे. सद्यस्थितीत मौजे डिग्रज गावच क्वारंटाईन केले आहे. सात चिंताजनक; दोघे कोरोनामुक्त साळसिंगे (ता. खानापूर) येथील 60 वर्षीय व्यक्ती, कदमवाडी (कवठेमहांकाळ) येथील 50 वर्षीय महिला, विटा (हनुमंतनगर) येथील 34 वर्षीय पुरुष, वांगी (कडेगाव) येथील 69 वर्षीय पुरुष, अंकले (जत) येथील 66 वर्षीय पुरुष, रिळे (शिराळा) येथील सत्तर वर्षीय वृद्ध, मालगाव (मिरज) येथील 72 वर्षीय वृद्धा अशा सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जतमधील 50 वर्षीय महिला आणि येलूर (वाळवा) 65 वर्षीय पुरूष असे दोघेजण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका क्षेत्रात शंभर फुटी रस्त्यावरील कुदळे प्लॉटमधील रमामाता कॉलनीत मुंबईहून आलेल्या 54 वर्षीय महिलेचा अहवाल काल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने कंटेन्मेंट झोन तयार केला. महापालिकेच्या पथकाने आज 61 कुटुंबातील 264 तर बफर झोनमधील 278 कुटुंबांतील 2106 लोकांची तपासणी केल्याचे महापालिका आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी सांगितले.
ता.१९-०६-२०२० सांगली प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. यापावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वारणा नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीला पूर आला आहे. दरम्यान, धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी या पावसाचा फटका शेतीला बसला आहे.सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीवरील कोकरुड-रेठारे पुल, आणि मेणी ओढ्यावरील येळापूर-समतानगर पुल पाण्याखाली गेला आहे. वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.पावसामुळे कोकरुड, बिळाशी, शेडगेवाडी,येळापुर, मेणी,गुढे- पाचगणी सह परिसरात पाऊस सुरु असल्याने सर्व ओढे भरुन वाहत आहेत. तर खरीपाची पेरणी केलेली भात शेती पाण्याने भरली आहे. यासाठी शेतातील पाणी काढण्या साठी शेतकऱ्यांची दिवसभर धावपळ सुरु आहे. भात, भुईमूग, मका, आदी पिकांना हा पाऊस फार उपयोगी आहे.
ता.१९-०६-२०२० जत प्रतिनिधी : जत शहरातील मेंढपाळनगर येथील राहुल दत्तात्रय काळे (वय २९) या तरूणाचा कंपाऊंड वरून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली असून याबाबतची नोंद जत पोलिसांत झाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, राहुल काळे व त्याचे दोघे मित्र बुधवारी रात्री उशिरा रस्त्याने जात होते. यावेळी हे तिघे आशीर्वाद क्लासच्या समोरील रस्त्यालगत असणाऱ्या कंपाऊंड मधील आंब्याचे झाडाचे आंबे तोडण्यास गेले होते. यावेळी संबंधित घर मालकाने कोण आहे असे ओरडल्याने राहुल खाली उतरत असताना खाली पडला.यावेळी याचा पाठीतील व मानेतील मनका मोडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नगरसेवकाच्या माहितीवरून सदरची घटना जत पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. दरम्यान राहुल याचा कोणीतरी घातपात केला आहे असा संशय व्यक्त करत मृत्यूदेह घेण्यास नकार दिला होता. या घटनेची शहरात दबक्या आवाजात संशयास्पदरीत्या चर्चा सुरू होती. याबाबत पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी आर. आर. शेळके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले ही अफवा असून राहुल याचा मृत्यू हा झाडावरून पडल्याने झाला असल्याचे दिसून येत आहे. तरूणाच्या अंगावर कोणतेही प्रकारचे वण दिसून येत नाहीत. तर राहुलच्या नातेवाईकांच्या तक्रारी अर्जानुसार चौकशी सुरू आहे. सद्यस्थितीत तपासाअंती घातपात नसल्याचे दिसून येत आहे.
ता.१८-०६-२०२० झरे प्रतिनिधी : खायचं वादं आणि म्हणे घ्या ऑनलाईन शिक्षण अशी सध्या आटपाडी तालुक्याची स्थिती आहे. आश्चर्य म्हणजे शासन म्हणते की राज्यात 23 टक्के विद्यार्थ्यांकडे ऍड्रॉईड मोबाईल आहेत. मात्र दुष्काळी आटपाडी तालुक्यात तब्बल 54 टक्के विद्यार्थ्यांकडे असे मोबाईल असल्याचे प्रशासनाचे मत आहे. मात्र तालुक्यात मोबाईल नेटवर्क ही सर्वात मोठी अडचण असेल.शाळांमेध्य शिक्षक हजर झाले आहेत. आधी मुलांना घरोघरी जाऊन पुस्तक वाटप पुर्ण झाले आहे. दुष्काळी आटपाडी तालुक्यात बहुतांशी कुटुंबाची भिस्त शेळी-मेंढीपालन, मोलमजुरी, शेतीवरच आहे. आता या शेतमजूर कष्टकऱ्यांच्या मुलांना ऑनलाईन शिक्षण द्यायचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर असेल. अनेक कुटुंबांकडे साधेच फोन आहेत. मात्र ते विद्यार्थ्यांकडे आहेत असे नाहीत. शिवाय स्मार्टफोन ही दूरची गोष्ट. स्मार्टफोन घेऊन वडील मजुरीला गेले की रात्री परतनार. मग मुलांना तो कसा उपलब्ध होणार? सध्या शिक्षक व्हिडिओ तयार करून विद्यार्थ्यांना पाठवत आहेत. काही ठिकाणी झूम ऍपद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचा प्रयत्न सुरु केला आहे. टीव्ही- रेडिओवरील अध्यापनाचीही चर्चा सुरु आहे. आधीच शाळांमध्ये विद्यार्थी समोर असताना शिकायचे वांदे आता घरी बसून मुले कशी शिकणार? ते समजणार कितपत हे कळत नाही. "" पहिली दुसरी साठी टीव्ही-रेडिओद्वारे अध्यापन होईल. तिसरीपुढील इयत्तांसाठी व्हॉट्सऍप ग्रुप तयार अध्यापन केले जाईल. आमच्या सर्व्हेक्षणानुसार तालुक्यातील 54 टक्के विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन आहेत. त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा आम्ही प्रयत्न करु.'' अनिस नायकवडी, गट शिक्षण अधिकारी. आटपाडी "" दिवसभर आम्ही मेंढ्यामागे असतो. घरी टीव्ही रेडिओ किंवा स्मार्टफोनच नाही. त्यामुळे शाळा सुरु झाल्या तरच आमच्या मुलांना शिक्षण मिळू शकेल. माझ्याकडे नाही. शाळा सुरू झाल्यानंतरच माझ्या मुलाला व दोन मुलींना शिक्षण मिळू शकते.'' प्रकाश वामन मोटे, मेंढपाळ "" आधी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा असे सांगितले जायचे आता उलट परिस्थिती आहे. सर्वात मोठी अडचण प्रत्येकाकडे स्मार्ट फोन असणे आणि घरी नेटवर्क मिळणे ही आहे. मेंढपाळ-शेतमजुरांच्या मुलांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहचवणे हेच मोठे दिव्य असेल.'' यु. टी. जाधव, शिक्षक नेते.
ता.१८-०६-२०२० कोल्हापूर प्रतिनिधी : सांगली, सातारा जिल्ह्यात ये-जा करण्यासाठी पास कामासाठी प्राधिकृत्त अधिकारी म्हणून नेमलेल्या तहसीलदार, उद्योग भवनमध्येच मिळणार आहेत, त्यासाठी संबंधितांना योग्य त्या कागदत्रांसह लेखी अर्ज करावा लागेल. त्यावर या कार्यालयाकडून तत्काळ कार्यवाही केली जाणार आहे. सद्यस्थितीत रोजच्याऐवजी 30 जूनपर्यंतचा एकच पास दिला जाणार आहे.शासकीय, सर्व बॅंक कर्मचारी आणि अधिकारी, औद्योगिक कर्मचारी, शिक्षण, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सांगली, सातारा जिल्ह्यात काम करण्यासाठी दैनंदिन पास दिला जात आहे. हा पास दररोज नाही तर एकदाच काढावा लागणार आहे. लॉकडाऊनची मुदत असेपर्यंत म्हणजे 30 जूनपर्यंत हा पास दाखवून कोल्हापूरमध्ये सांगली व सातारा जिल्ह्यात ये-जा करता येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात कोल्हापुरातून सांगलीत व सातारा येथे जाण्यासाठी लोकांना पास मिळत नव्हता. दरम्यान, आता पास देवून लोकांनाच्या हाताला काम मिळवून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्हा प्रशासनाकडून पास दिले जात आहेत. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडूनही असे पास दिले जात आहेत. या ठिकाणी प्रत्यक्ष पास मिळतील करवीर, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा व शाहुवाडी तहसीलदार कार्यालयात, सर्व शासकीय व सर्व बॅंक कर्मचारी, अधिकारी यांना - करवीर, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, शाहुवाडी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयात : खासगी, प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयांचे शिक्षण, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना जिल्हा उद्योग केंद्राकडून ऑनलाईन पास. कोल्हापूर जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यस्थापक कार्यालयामध्ये : औद्योगिक क्षेत्रातील विविध उद्योग व इतर खाजगी कार्यालयाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांना [email protected] या संकेतस्थळावर पाससाठी अर्ज करावा लागणार आहे. हा पास ऑनलाईन दिला जाणार असून यासाठी ज्या-त्या उद्योजकांनी आपल्या कंपनीच्या लेडरहेडवर विनंती अर्ज करावा. काम करणाऱ्या व्यक्तिचे प्रमाणपत्र, संबंधीत व्यक्त ज्या-त्या जिल्ह्यातील व तालुक्यातील असल्याचे पुरावा म्हणून आधारकार्ड किंवा रहिवासी पुरावा. कामगारांचे ओळखपत्र. औद्योगिक कामगाराचे आधार नोंदणी व कंपनी नोंदणी प्रमाणपत्र किंवा जीएसटी प्रमाणपत्र, शॉप ऍक्ट नोंदणी, केंद्र किंवा राज्याकडून दिलेले नोंदणी पत्र जोडावे लागणार आहे. आवश्यक कागदपत्रे : - ज्या ठिकाणी काम करत आहे त्या कंपनीचे प्रमाणपत्र - आधारकार्ड किंवा इतर रहिवासी दाखला - व्यक्तिचे ओळखपत्र
ता.१७-०६-२०२० सांगली प्रतिनिधी : जिल्ह्यात आज नवे 9 रुग्ण मिळून आले आहेत. महापालिका क्षेत्रातील शंभरफुटी रस्त्यावरील पाकिजा मशीद समोरील कुदळे प्लॅट येथे 55 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. महापालिका क्षेत्रात रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तसेच शिराळा तालुक्यातील मणदुर, किरनरेवाडी, शिराळा येथे चार रुग्ण मिळून आले आहेत. तासगाव तालुक्यातील शिरगाव येथे एकास लागण झाली आहे. निंबवडे (आटपाडी) येथे दोघांना, तर जत तालुक्यातील निगडी खुर्द येथे एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 268 झाली. सद्यस्थितीत 124 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर मिरजेतील कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. पाच चिंताजनक साळसिंगे (ता. खानापूर) येथील 60 वर्षीय व्यक्ती, कदमवाडी (कवठेमहांकाळ) येथील 50 वर्षीय महिला, विटा (हनुमंतनगर) येथील 34 वर्षीय पुरुष, वांगी (कडेगाव) येथील 69 वर्षीय पुरुष, अंकले (जत) येथील 66 वर्षीय पुरुष अशा पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्ह्याची स्थिती (दुपारी 2 पर्यंत) बुधवार आढळलेले बाधित - 9 एकूण रुग्ण - 268 उपचार घेणारे रुग्ण - 124 बरे झालेले रुग्ण - 135 आजवर मृत्यू झालेले - 9 पॉझिटिव्ह पण चिंताजनक - 5 ग्रामीणमधील बाधित - 208 शहरी भागातील बाधित - 48 महापालिका क्षेत्र- 12
ता.१७-०६-२०२० मायणी प्रतिनिधी : मायणीसह तारळी कालव्याच्या ओलिताखाली येणार्या भागातील शेतकर्यांसाठी आजचा सोन्याचा दिवस म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण तारळीचे पाणी मायणी परिसरात आले, हे स्व. भाऊसाहेब गुदगे यांचे दूरदृष्टीचे फलित असून त्यांचे स्वप्न साकार झाल्याचे प्रतिपादन मायणी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केले. वर्षानुवर्षे दुष्काळग्रस्त म्हणवून घेणार्या खटाव-माण भागातील शेतकर्यांना आज तारळी, उरमोडी, टेंभू, जिहे कटापूरचे पाणी उपलब्ध होत आहे. हा शेतकरी आज आपल्या कोरड्या माळावर या सिंचन योजनांच्या जीवावर बागायती पिके घेऊ लागला आहे. धोंडेवाडी, ता. खटाव येथील जलसेतूचे काम पूर्ण झाले. मायणीच्या शिवारात येण्याचा मार्ग मोकळा झाला. मायणीच्या माळीनगर येथे तारळीच्या पाण्याचे आगमन झाले व गावकर्यांनी एकच जल्लोष केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त रामराजे नाईक-निंबाळकर,जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सहकार्यातून मिळालेली ही अमूल्य भेटच म्हणावी लागेल. ते म्हणाले भाऊसाहेब गुदगे यांनी 1985 ते 2004 या वीस वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये खटाव तालुक्याच्या दुष्काळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाणी योजनांचा पाया घातला. उरमोडी, टेंभू, तारळी जिहे कटापूर या योजनांची प्रशासकीय मान्यता त्यांच्या कारकिर्दीमध्ये झाली. त्याच वेळेस पाठपुरावा करून त्यांनी या सर्व योजनेत खटाव तालुक्याचा समावेश करून घेतला. 1992 मध्ये 212 कोटीची प्रशासकीय मान्यता घेतलेल्या उरमोडीमधून तीन टीएमसी पाणी खटावसाठी व तीन टीएमसी पाणी माणसाठी राखून ठेवले. त्यामुळे खटावमधील जवळपास तीस हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आले. 1996 मध्ये 194 कोटीची मूळ प्रशासकीय मान्यता घेतलेल्या तारळीमध्ये त्यांनी कातरखटाव-मायणी परिसराचा समावेश करून घेतला. त्यामध्ये खटावमधील 4438 हेक्टर व माण तालुक्यातील 4438 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे. या योजनेची चौथी सुधारित मान्यता 1610.32 कोटीची आहे. गतवर्षी कातरखटाव परिसरात सूर्याचीवाडी,, धोंडेवाडीपर्यंत हे पाणी पोहचले होते. यावर्षी ते मायणी परिसरात पोहचले आहे. स्व. भाऊसाहेबांनी या योजनेत खटावचा समावेश केल्यानेच पाणी पाटांमध्ये वाहत आहे. त्यामुळे शेतकर्यांचे चेहरे समाधानाने फुलले असून ते स्व. भाऊसाहेबांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. मायणीच्या शिवारात आलेल्या पाण्याचे महिलांनी पूजन केले व साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.
ता.१६-०६-२०२० सांगली प्रतिनिधी : बोगस पदोन्नती घेऊन शासनाच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या संजय पवार यांना आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दणका दिला. त्यांची पदावणती करत आटपाडीतून तत्काळ शिराळ्याला बदली करण्यात आली. आटपाडी आणि मिरज येथून त्यांना आज दुपारीच कार्यमुक्त करण्याचे आदेश निघाले.संजय पवार पदोन्नती घोटाळ्यासह बुर्ली (ता. पलूस) येथील पाणीपुरवठा घोटाळ्यात अडकले आहेत. त्याविरुद्ध पलूस पोलिसांत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी याबाबतची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर केला आहे. संजय पवार हे मेस्त्री श्रेणी-1 म्हणून सेवेत होते. तेथून त्यांनी 2000 साली कनिष्ठ अभियंता पदावर पदोन्नती घेतली. पुढील चार वर्षात म्हणजे 2004 पर्यंत त्यांनी तांत्रिक परीक्षा उत्तीर्ण करावी, या अटीसह ही पदोन्नती दिली होती. ते परीक्षा उत्तीण झाले नाहीत. तरीही त्यांची पदोन्नती आजअखेर कायम राहिली होती. ही सपशेल फसवणूक होती. या प्रकरणी त्यांच्यासह त्यांच्या पदोन्नती घोटाळ्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरु आहे. आता पहिल्या टप्प्यात पवार यांना दणका देण्यात आला आहे. त्यांना आता स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदावर पदावनत करण्यात आले आहे. त्यांचा 2004 ते 2011 हा कालावधी मेस्त्री श्रेणी-1 असा गृहित धरला जाणार आहे. त्यानुसार त्यांचे वेतन निश्चित होईल. सन 2011 नंतर त्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट शिथिल होते. त्यामुळे तेथून पुढे कनिष्ठ अभियंता पदानुसार पेतनश्रेणी निश्चित होते. याशिवाय त्यांच्या नेमणुकीविषयी आणखी सविस्तर आदेश काढले आहेत. या आदेशानंतर आटपाडी पंचायत समितीच्या उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्यांनी संजय पवार यांना कार्यमुक्त केले आहे. त्यांना शिराळा पंचायत समितीत स्थापत्य अभियांत्रिकी सहायकपदी नेमणूक देण्यात आली आहे.
ता.१६-०६-२०२० कडेगाव प्रतिनिधी : अमरापूर (ता. कडेगाव) येथील कॉंग्रेसचे सरपंच सुनिल पाटील यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव तीन विरुद्ध सहा मतांनी नामंजूर करण्यात आला. एक मत बाद ठरले.ग्रामपंचायतीत तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शैलजा पाटील यांच्या उपस्थितीत गुप्त मतदान पार पडले. सरपंच सुनिल पाटील सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कामकाज करीत आहेत. गावातील रस्त्यांवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा आरोप ठेवत उपसरपंचासह सहा सदस्यांनी नऊ जून रोजी तहसिलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला. आज तहसिलदार डॉ. पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया झाली. सरपंचांविरोधात अविश्वास ठराव दाखल करताना दोन तृतीयांश सदस्यांची आवश्यकता आहे. सरपंचाच्या बाजूने तीन व अविश्वासच्या बाजूने सहा मते पडली. एक मत बाद झाल्याने अविश्वास नामंजूर झाला. सरपंचपदी पाटील कायम राहिले. गावांत पोलीस बंदोबस्त तैनात होता. सरपंच सुनिल पाटील, उपसरपंच रुक्मिणी जानकर, सदस्य जयवंत रुपनर, रंजना पवार, दिपाली मोरे, सचिन पवार, विजय मोरे, बबन आंबवडे, मंडल अधिकारी एम. एस. कारंडे, ग्रामसेविका लिना देशमुख, तलाठी एच. डी. बांडे उपस्थित होत्या. दाद मागणार- उपसरपंच रुक्मिणी जानकर म्हणाल्या,""निवडणूक प्रक्रियेवेळी सात सदस्यांनी तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शैलजा पाटील यांच्याकडे हात उंचावून मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी केली होती. तहसिलदारांनी हात उंचावून मतदान न घेता गुप्त मतदान प्रक्रिया राबवली. आम्हांला कशा पध्दतीने मतदान प्रक्रिया राबविणार याची एक दिवस माहिती देणे आवश्यक होते. या संदर्भात त्यांनी माहिती सदस्यांना दिली नाही. ठरावाच्या बाजूचे एक मत बाद झाल्याने अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आला. ही प्रक्रिया संशयास्पद आहे. निवड प्रक्रिया पुन्हा राबवण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहे.
ता.१५-०६-२०२० झरे प्रतिनिधी: पावसाळा सुरू झाला की लोणच्याचा आंबा बाजारात येतो. परंतू यंदा लोणच्याचा आंबा महाग झाल्याने लोणचे करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.दरवर्षी ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यात म्हणजेच मार्च एप्रिल व मे या महिन्यात विविध वाळवणीचे पदार्थ बनविण्यासाठी गृहिणीची लगबग सुरू असते. वर्षभर लागणारे विविध खाद्यपदार्थ या दिवसात बनवून ठेवले जातात. त्यानुसारच पहिला पाऊस पडल्यावर वर्षभर टिकणारे आंब्याचे लोणचेही बनवले जाते. अवकाळी पावसाचा तडाख्याने आंब्याचा मोहोर कमी प्रमाणात लागला. त्यामुळे आंबा उत्पादनामध्ये घट झाली. जे काय आंब्याचे उत्पादन निघाले ते उत्पादन मार्केट पर्यंत पोहोचू शकले नाही.कोरोनच्या पार्श्वभूमीवरती व लॉक डाऊन असल्याने दळणवळण बंद झाले. त्यामुळे आंबा ग्राहकापर्यंत पोहोचण्यास अडचण झाली. तसेच उत्पादनही कमी निघाले होते. त्यामुळे आंबा महाग झाला. ग्रामीण भागात जेवणाच्या ताटात अंबट-गोड-तिखट असे चवदार लोणचे असल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. जेवणाचे ताटही लोणच्याशिवाय अपूर्ण दिसते. पण आंब्याच्या लोणच्यासाठीचे चांगल्या आंब्याचे उत्पादन कमी झाले आहे. तसेच हा आंबा महाग झाला आहे. त्यामुळे यावर्षी चवदार स्वादिष्ट लोणचे महाग होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. मुंबई-पुणे येथे नोकरीसाठी असणारी मंडळी शाळेला सुट्ट्या पडल्या नंतर गावाकडे येत असतात. शाळा सुरू झाली की पुन्हा ते मुंबई पुणे किंवा जिथे कामधंद्याला आहेत, तिथे जात असतात. गावी आल्यानंतर वाळवणीचे पदार्थाबरोबर वर्षभर पुरेल इतके आंब्याचे लोणचे घेऊन जातात. परंतु यंदा अवकाळी पावसाने आंब्याचे मोहर झडल्याने आंब्याचे उत्पादन कमी प्रमाणात निघालेले आहे. त्यामुळे यावर्षी आंबट लोणचे तिखट होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
ता.१५-०६-२०२० सांगली प्रतिनिधी : जिल्ह्यात आज नव्याने 20 रुग्ण मिळून आले आहेत. त्यात शिराळा तालुक्यातील मणदूर येथे 8, भाळवणी (खानापूर) येथे 2, मांजर्डे (तासगाव) 2, गव्हाण (तासगाव) 1, कवठेमहांकाळ शहरात 1, अंकले (जत) येथे 1, तर पलूस तालुक्यातील दुधोंडी येथे कोरोनाचा प्रवेश झाला असून दोन रुग्ण मिळून आले आहेत. तसेच वाळवा तालुक्यातील वाटेगाव, येलूर आणि इस्लामपूर शहरात प्रत्येकी एक रुग्ण मिळून आले. रुग्णांची संख्या 242 झाली असून, सद्यस्थितीत 114 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यावर मिरजेतील कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. चार चिंताजनक; चार कोरोनामुक्त साळसिंगे (ता. खानापूर) येथील 60 वर्षीय व्यक्ती, कदमवाडी (कवठेमहांकाळ) येथील 50 वर्षीय महिला, विटा (हनुमंतनगर) येथील 34 वर्षीय पुरुष, वांगी (कडेगाव) येथील 69 वर्षीय पुरुष अशा चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रिळे (शिराळा), शेटफळे (आटपाडी), मालेवाडी (शिराळा), विटा रोड (तासगाव) असे एकूण चार जण कोरोनामुक्त झाले आहेत. नवे बाधित - 20 एकूण रुग्ण - 242 उपचार घेणारे रुग्ण - 114 बरे झालेले रुग्ण - 121 मृत्यू - 8 पॉझिटिव्ह चिंताजनक - 4 ग्रामीणमधील बाधित - 185 शहरी भागातील बाधित - 46 महापालिका क्षेत्र- 11
ता.१४-०६-२०२० खानापूर प्रतिनिधी : विलगीकरणकक्षात ठेवलेल्यांना भरपूर मोकळा वेळ मिळत आहे.काही जण सोशल मीडिया समाज माध्यमांवर हा वेळ खर्च करत आहे, तर काही जण गाणी,चित्रपट पाहण्यात वेळ घालवत आहे,तर काही जण त्याला शिक्षा समजत आहे. मात्र श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील जानकीबाई वामनराव अादिक येथील शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवलेल्या सात व्यक्तींनी या वेळेचा सदुपयोग करून शाळेचे रूपच बदलून टाकले आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शाळा बंद असल्याने खानापूर येथील शाळेत सर्वत्र कचरा आणि धूळ साचली होती.खानापुरचे पोलीस पाटील संजय आदिक,ग्रामसेवक सुधीर उंडे,बाळासाहेब भालेराव यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गणेश भालेराव,महेश भालेराव,सविता भालेराव,अर्जुन मोरे,लक्ष्मीबाई मोरे,कार्तिक मोरे,रवी मोरे या सात जणांनी दोन ते तीन दिवसात शाळा परिसर स्वच्छ करून या ज्ञानमंदिराची चमक वाढवली, तसेच हा उपक्रम त्यांनी पुढे सुरू ठेवला. दररोज सकाळी आठ वाजल्यापासून ही मंडळी शाळेच्या स्वच्छतेला सुरुवात करतात, सध्या ते शाळेच्या प्रांगणातील झाडांना आळे करुन पाणी देणे,शाळेतील भिंतींची स्वच्छता करणे अशा प्रकारची कामे करत आहे.सध्या उन्हाच्या तीव्र झळा बसत असताना, जी झाडे जळून जाण्याच्या मार्गावर होती, ती आता नियमित पाणी मिळत असल्याने चांगली चालली आहे.गावात आल्यानंतर विलगीकरणकक्षात ठेवले जाणार या विचाराने ज्यांना भीती वाटते त्यांना या सात जनांनी आपल्या कार्यातून चांगलीच चपराक लगावली आहे. या कुटुंबियांच्या चांगल्या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.यावेळी पोलीस पाटील संजय आदिक,काकासाहेब चौधरी,बाळासाहेब भालेराव,मच्छिंद्र गायकवाड,नवनाथ बर्डे,सादिक शेख यासह आदींनी या कामाची पाहणी केली. 【- बाळासाहेब भालेराव हे स्वत: उच्चशिक्षित असल्याने त्यांनी पुणे येथून आलेल्या त्यांच्या कुटुंबियांना स्वतः च विलगीकरणकक्षात ठेवण्याचा निर्णय घेऊन याबाबत ग्राम कोरोना समितीला माहीती दिली.】
ता.१४-०६-२०२० विटा प्रतिनिधी : मुंबईतून खानापूर तालुक्यात आलेल्या दोघांना कोरोनाची लागन झाल्याचे समोर आले आहे. मुंबईतून खानापूर आलेल्या आत्तापर्यंत जवळपास १०९ लोकांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यातील भाळवणी आणि भिकवडी गावात प्रत्येकी एक रूग्णाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.खानापूर तालुक्यात मुंबईहून आलेल्या १० वर्षाखालील आणि ५० वर्षावरील लोकांचे स्वॅब घेण्याची मोहीम सध्या सुरू आहे. गावोगावी यासाठीचे नमुने घेतले जात आहेत. या मोहिमेत आत्तापर्यंत जवळपास १०९ लोकांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. यात भाळवणी आणि भिकवडी गावात एकेक रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. याबाबत माहिती मिळताच प्रांताधिकारी संतोष भोर, तहसिलदार ऋषीकेत शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांच्यासह आरोग्य पथकाने भाळवणी आणि भिकवडी गावांना भेट दिली. त्याठिकाणी कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आला आहे. भाळवणी आणि भिकवडी येथील रूग्णांशी संबंधीत एकूण नऊ लोकांना विट्यातील संस्थात्मक विलगिकरण केंद्रात दाखल करण्यात आले आहे, असे तहसिलदार शेळके यांनी सांगितले. दरम्यान या मोहिमेत घेतलेल्या १०९ पैकी ४४ लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप ६३ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. तर भाळवणी आणि भिकवडीत येथे प्रत्येकी एक अशा दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. तालुक्यात आणखी काही गावात अशा प्रकारच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. खानापूर तालुक्यात साळशिंगे, बलवडी, गोरेवाडी, सुलतानगादे, करंजे, विटा आणि आता भाळवणी तसेच भिकवडी या गावात कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यातील काही रुग्ण बरे झाले आहेत. तर काही उपचारार्थ मिरज येथे दाखल आहेत. यात विट्यातील रुग्ण अत्यवस्थ आहे. येथील संस्थात्मक विलगिकरण केंद्रात ४९ लोक आहेत. लोकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, मास्क वापरा आणि आवश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका, असे आवाहनही तहसिलदार शेळके यांनी केले आहे.
ता.१४-०६-२०२० सांगली प्रतिनिधी : शहरातील कॉलेज कॉर्नर ते वखार भागातील महाराजा चौक परिसरातील दहा ते पंधरा चारचाकी गाड्या फोडण्यात आल्या. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. मद्यधुंद युवकाने फावड्याच्या सहाय्याने ही तोडफोड केली. परिसरातील नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. रात्री उशीरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात याची नोंद करण्याचे काम सुरू होते.अखिलेश महेश दरूरमठ (वय २७ रा. चांदणी चौक, सांगली) असे त्या युवकाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी अचानक मद्यधुंद अवस्थेत हा युवक कॉलेज कॉर्नर परिसरात आला.त्याच्या हातात फावडे होते. त्याने अचानक रस्त्याकडेला उभ्या केलेल्या वाहनांच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. कॉलेज कॉर्नरपासून आमराई , वखार भागातील महाराजा चौकापर्यंत रस्त्याकडेला उभ्या केलेल्या गाड्यांचा काचा त्याने फोडल्या. यामध्ये हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे बघ्यांची गर्दी जमली होती.
ता.१३-०६-२०२० तासगाव प्रतिनिधी : सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या होमपीचवर तासगाव तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तासगाव तालुक्यातील मणेराजुरीसारख्या महत्त्वाच्या गावात खासदार पाटील यांच्या गटातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आहेत. माजी उपमुख्यमंत्री आर आर. पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये गेले होते. पण त्यांचा फारसा परिणाम जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीत जाणवला नाही. उलट आर. आर. पाटील यांचा गट दिवसेंदिवस बळकट होत गेला. आता भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत यायला लागल्याने नेमकं काय घडलं आणि बिघडलं याची चर्चा सुरू आहे. मणेराजूरी गावातील बाळासो पवार, वसंतदादा कारखान्याचे माजी संचालक शिवाजी पाटील, ज्येष्ठ नेते संभाजी पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मणेराजूरी गावातील या प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच सावळज येथील ग्रामपंचायतीत खासदार गटाच्या नऊ ग्रामपंचायत सदस्यांनी आपले राजीनामे सरपंच योगेश पाटील यांच्याकडे दिले. ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आकाराम शिंदे, हेमंत उर्फ अरुण सखाराम पाटील, काशीनाथ रामचंद्र भडके, अमित कांबळे, अभिजीत थोरात, शहाजी तुकाराम बुधवले, व सदस्या. किरण बाळासाहेब थोरात, पमाताई भिसे, वैशाली सुनील कांबळे यांनी राजीनामे दिलेले आहेत. मणेराजूरीत अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्ते पक्ष सोडून गेले असतानाच सावळज येथील सदस्यांनी राजीनामे दिल्याने त्यांची आगामी भूमिका काय असेल याचीही चर्चा सुरू आहे "आर. आर. आबांनी विकासकामे करताना पक्ष पार्टी बघितली नव्हती. तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी करत आहे. काम घेऊन येणारा माणूस कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार कधीच केला नाही. त्यामुळे मतदारसंघातील जनता ठामपणे पाठिशी उभी आहे. आमच्याकडे आलेल्या गटाला निश्चित न्याय देऊ. कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. कोणत्याही संकटात त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू,``असे राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील यांनी सांगितले.
ता.१३-०६-२०२० खटाव प्रतिनिधी : खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मागील दहा दिवसापूर्वी मुंबई वरून आलेल्या एका व्यक्तीच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्यात आले होते. तरी आज उशिरा त्याचे रिपोर्ट कोरोना बाधित आल्याने गावामध्ये सायंकाळी वडुज तहसीलदार अर्चना पाटील,गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी युनूस शेख,निमसोड आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्रियांका पाटील यांनी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली.यावेळी सरपंच सचिन माने, उपसरपंच सुहास माने, ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,विठ्ठल माने,सिकंदर मुल्ला,गुलाब वायदंडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.तरी गावचा संपूर्ण सर्व्हे करण्याच्या सूचनाआरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.तरी या पेशंटच्या संपर्कातील हाय रिस्क असणार्या चार जणांना मायणी येथील कोरोना केअर सेंटर मध्ये विलगीकरणं कक्षात दाखल करण्यात आले असुन लो रिस्क असणार्या सहा जणांना होम काॅरटाईन करण्यात आले आहे. तसेच गावातील प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहे.
ता.१३-०६-२०२० विटा प्रतिनिधी : विटा येथील कराड रस्त्यावर असलेल्या भव्य श्वेता स्टील फर्निचर शोरुम दुकानाला शॉर्टसर्किटने भीषण आग लागून सुमारे दोन ते अडीच कोटींचे नुकसान झाले. या आगीत फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्यासह शोरुममधील किमती साहित्य जळून खाक झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास विटा येथे घडली.विटा येथील सुप्रसिद्ध उद्योजक कुमार पवार यांचे कराड रस्त्यालगत श्वेता स्टील फर्निचर नावाचे भव्य शोरुम आहे.गेल्या चार महिन्यापूर्वी त्यांनी या शोरुमचे नूतनीकरण करून घेतले होते. विटा शहरातील प्रसिद्ध फर्निचर दुकान म्हणून या शोरुमचा नावलौकिक होता. पवार यांच्या शोरुमच्या पाठीमागे त्यांचा स्वतःचा फर्निचर तयार करण्याचाही कारखाना होता. शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पहिल्यांदा फर्निचर तयार करणाऱ्या कारखान्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीने क्षणार्धात रुद्र रूप धारण केले. मध्यरात्री वारा असल्याने ही आग बाजूलाच असलेल्या फर्निचर शोरूममध्ये गेली. त्यावेळी या भीषण आगीने संपूर्ण शोरुमला वेढा टाकला. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर सांगली महानगरपालिका, विटा, तासगाव, आष्टा नगरपालिका, सोनहीरा, क्रांती साखर कारखाना यासह सुमारे आठ ते दहा अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग इतकी भीषण होती की, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाला समारे सहा ते सात तासाचा प्रयत्न करावा लागला. त्यानंतर आग काही अंशी आटोक्यात आली. तोपर्यंत या आगीत शोरुममधील सोफासेट, खुर्च्या, डायनिंग टेबल, बेड, लोखंडी व लाकडी कपाट यासह अन्य किमती साहित्य व नूतनीकरण केलेले भव्य शोरूम जळून खाक झाले. त्याच्या बाजूला भांडी दुकान आहे. हे दुकानही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
ता.१२-०६-२०२० सांगली प्रतिनिधी : पत्र्याच्या खोल्याची थकीत घरपट्टी कमी करण्यासाठी 40 हजार रुपये लाच घेणाऱ्या दोन कनिष्ठ लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कुपवाड येथील सांगली महापालिकेच्या कार्यालयात ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तासगाव येथील वरचे गल्ली येथील राजरतन लक्ष्मण चव्हाण यांच्यासह कुपवाड येथील शशिकांत शिवराम गायकवाड यांच्या समावेश आहे. याबाबत माहिती अशी, तक्रारदार यांचे कुपवाड येथे वडिलोपार्जित साडेपाच गुंठे जागेत सात पत्र्याची खोकी आहेत. हे खोकी भाड्याने दिली आहेत. या खोक्यांची घरपट्टी गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत आहे. ही थकीत घरपट्टी कमी करून देण्यासाठी चव्हाण व गायकवाड या दोन्ही कनिष्ठ लिपिकांनी तक्रारदार यांना 40 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने 4 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने 11 जून रोजी या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. आज दोघांना या विभागाने सापळा लावला. त्यावेळी तक्रारदार यांच्याकडून चव्हाण व गायकवाड हे 40 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ सापडले. दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये तासगाव येथील वरचे गल्लीतील राजरतन चव्हाण यांचा समावेश असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, प्रशांत चौगुले, हवालदार अविनाश सागर, संजय संकपाळ, संजय कलकुटगी, रवींद्र धुमाळ, भास्कर भोरे, धनंजय खाडे, सलीम मकानदार, प्रीतम चौगुले, सोहेल मुल्ला, राधिका माने, सीमा माने, चालक बाळासाहेब पवार यांनी केली.
ता.१२-०६-२०२० झरे प्रतिनिधी : झरे (ता.आटपाडी) परिसरामध्ये मक्याची पडेल भावाने व्यापाऱ्यांकडून खरेदी होत आहे. रब्बी हंगामातील मका विक्रीसाठी बाजारात येत आहे. त्याला 1250 ते 1350 रुपये दर मिळत आहे. तर मार्केट कमिटीमध्ये रब्बी हंगामातील मक्यासाठी 1760 रुपये हमीभावाने खरेदी सुरू आहे. रब्बी हंगामातील मक्याचे उत्पन्न अवकाळी पावसामुळे कमी प्रमाणात निघाले आहे. तसेच व्यापाऱ्यांकडून दर मिळत नाही. चार आणि पाच क्विंटल मका घेऊन मार्केट कमिटीला जाणे परवडत नाही. तर दुसरीकडे व्यापारी दर देत नाहीत. त्यामुळे दर मिळणार तरी कसा? हा गंभीर प्रश्न आहे. मार्केट कमिटीमध्ये मका विक्रीसाठी द्यायचा तर सातबारा वर रब्बी हंगामातील मका किंवा खरिपातील मका अशी नोंद करावी लागते.त्यानंतर मार्केट कमिटीमध्ये नोंदणी करून नंबर आल्यानंतर मका घेऊन जायचे. ग्रामीण भागात तलाठी जागेवर नसतात. एका तलाठ्याकडे दोन सजा आहेत. त्यामुळे हेलपाटे मारायचे कोणी? तसेच मार्केट कमिटीमध्ये जाऊन नोंदणीसाठी हेलपाटा मारावा लागतो. त्यामुळे अनेक शेतकरी हेलपाटे टाळत आहेत. याचा फायदा व्यापारी घेत असून हमीभावापेक्षा कमी दराने मका खरेदी करून नफा मिळवत आहेत. सध्या रब्बी हंगामातील मका शेतकऱ्याकडे उपलब्ध आहे. त्याला 1760 रुपयेचा दर आहे. परंतु खरीप हंगामातील मका बाजारात येईल तेव्हा 1850 रुपयांचा दर असेल. रब्बी हंगामातील मका पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी सातबारावर रब्बी मका अशी नोंद करावी. सातबारा, बॅंक पुस्तक, आधार कार्ड घेऊन मार्केट कमिटीमध्ये नोंदणी आवश्यक असल्याचे मार्केट कमिटीच सचिव शशिकांत जाधव यांनी सांगितले. जागेवर मका उचलण्याची मागणी- छोट्या शेतकऱ्यांना मका मार्केट कमिटीपर्यंत नेण्यास भाडे खर्च परवडत नाही. सातबारा वरती नोंद करा. रजिस्ट्रेशन करा. दोन-चार किंटल साठी शेतकरी या भानगडीत पडत नाही. मार्केट कमिटीच्या दरापेक्षा पन्नास रुपये कमी दर मिळाला तरी चालेल. पण जागेवरच मका उचलण्याची व्यवस्था करावी,अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. ""माझा 35 क्विंटल मका होता. तलाठी, मार्केट कमिटीकडे हेलपाटे मारण्याऐवजी बाजारात प्रति क्विंटल 1300 रुपये दराने विकला. मार्केट कमिटीने गावोगावच्या विकास सोसायट्यांना मका खरेदीची परवानगी द्यावी. क्विंटल मागे विकास सोसायट्यांना काही टक्केवारी ठरवून द्यावी, म्हणजे शेतकऱ्यांचा वेळ वाचेल.'' -दिलीप खोत, (शेतकरी, कुरुंदवाडी)
ता.१२-०६-२०२० आटपाडी प्रतिनिधी : शेटफळे येथे कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या बावीस मुलांना कोरोनटाईन केले आहे. यातील बारा जण जिल्हा परिषद शाळा नंबर एक मध्ये असून याच शाळेत नाशिकहुन आलेला विनोद गायकवाड या फौजीलाही कोरोनटाइन केले असून तो "या" मुलांना मिलिटरी भरतीचे धडे देत आहे. तसेच कोरोणटाईन केलेली मुले आपला वेळ स्वच्छता सह विविध विधायक कामात गुंतवत आहेत.शेटफळे येथे मुंबईला जावून आलेल्या एसटी चालकाला कोरोनाची बाधा झाली होती. त्याच्या दोन्ही मुलांचा पॉझिटिव्ह अहवाल आला होता. ही दोन्ही मुले व्यायामासाठी बाहेर जात होती. तसेच एका विहिरीवर पोहण्यासाठी जात होती. त्यांच्यासोबत गावातील 16 ते 19 या वयोगटातील 22 मुले आली होती.यातील अनेक मुले मिलिटरी आणि पोलीस भरतीचा सराव करत आहेत. या बावीस मुलांना कोरोणटाईन केले आहे. यातील अकरा मुले जिल्हा परिषद शाळा नंबर एक मध्ये आहेत. या शाळेवर मुंबईहून आलेला एक मुलगा आणि नुकताच नाशिकहून आलेला फौजी विनोद गायकवाड यांनाही कोरोणटाईन केले आहे. या मुलांचा वेळ जात नव्हता. त्यामुळे या मुलांनी सोशल डिस्टन्स ठेवून संपूर्ण शाळा, शाळेचा परिसर पूर्ण स्वच्छ केला. शाळेच्या आवारातील झाडांना नवीन आळी करून पाणी घालण्याचे काम केले जाते. फौजी विनोद गायकवाड याने मुलांची सारी माहिती घेतली आणि मुलांनाही मिलिट्री भरती होण्याची इच्छा असल्याची माहिती मिळाली. त्याने मुलांना एकत्र आणलं. सोशल डिस्टन्स ठेवून मिलिट्री आणि पोलीस भरतीसाठी घेतली जाणारी लेखी परीक्षा आणि इतर विविध प्रकारचे धडे देणे सुरू केले आहे. कोणत्या प्रश्नाला किती गुण असतात, फिजिकली परीक्षेत कशाकशाला किती गुण असता याची सविस्तर माहिती अभ्यास पूर्ण देतो आहे. देशभक्तिचे वातावरण सर्वच सहभागी इच्छुकांकडून व्यायामाचा सराव करुन घेतला जातो. याठिकाणी कोरोण्टाईन केलेल्या मुलांच्यात एक वेगळेच देशभक्तिचे वातावरण निर्माण केले असून त्यांना पोलीस आणि मिलिटरी भरतीसाठी चांगले प्रोत्साहित केले आहे.
ता.१०-०६-२०२० देवराष्ट्रे प्रतिनिधी : अनैतिक संबंधाच्या संशयावरून देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे जयसिंग शामराव जमदाडे (वय 45) यांचा शिर धडावेगळे करून निर्घृण खून करून पसार झालेल्या लक्ष्मण निवृत्ती मुंढे (वय 52) याला अटक करण्यात आली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत जयसिंग जमदाडे यांचे संशयित मुंढेच्या घरी येणे-जाणे होते. त्यातून जयसिंग यांचे पत्नीबरोबर अनैतिक संबंध असावेत असा संशय मुंढे याला होता. त्यामुळे तो जयसिंगचा काटा काढण्याची संधी शोधत होता. 4 जून रोजी जयसिंग सकाळी शेतात गेले होते. त्यानंतर गाडीवरून वैरण घेऊन ते घराकडे परतत होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या मुंढे याने कुऱ्हाडीने त्यांच्यावर हल्ला केला. त्वेषाने कुऱ्हाडीने हल्ला करून जयसिंग यांचे शिर धडावेगळे केले. हल्ल्यानंतर घटनास्थळी नागरिक गोळा झाल्यानंतर मुंढे तेथून पसार झाला. चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.खुनानंतर पसार झालेल्या मुंढे याला पकडण्यासाठी चिंचणी-वांगी पोलिसांचे तसेच एलसीबीचे पथक रवाना झाले होते. मात्र पाच दिवस तो पोलिसांना चकवा देत होता. चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी हे संशयित मुंढेला पकडण्यासाठी चार दिवसापासून कसून शोध घेत होते. शिरगाव येथील शिवारात तो लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक गोसावी यांच्या पथकाने सापळा रचून आज त्याला अटक केली.
ता.१०-०६-२०२० विटा प्रतिनिधी : निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने खटाव परिसरातील शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. त्यामुळे करोनाचे संकट बाजूला ठेवून येथील बळीराजा मशागतीकडे वळला आहे.सध्या नांगरट, फणणी, कुळवणे, शेतातील गवत, काडी-कचरा, दगडगोटे वेचणे, खते, बी-बियाणांची तजबीज करणे आदी कामात बळीराजा मश्गुल आहे. करोनाचे संकट आणि शेतीमालास हमीभाव नसला तरी जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा आपल्या शेतात अहोरात्र काबाडकष्ट करत आहे.
ता.०९-०६-२०२० मायणी प्रतिनिधी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत सर्वत्र लॉकडाऊन असल्याने येथील पेरू बागांना मोठा फटका बसला आहे. बागायतदारांचे लाखो रुपयांचे पेरू विक्रीविना बागेतच पडून राहिले आहेत.सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात मागणी प्रतिवर्षी मायणीच्या पेरूंची असते. परिसरामध्ये शेकडो हेक्टर क्षेत्रांमध्ये पेरूची लागण केली जाते. विविध पेरूंच्या जाती या भागामध्ये आहेत.या पेरूंना मोठी मागणी असल्यामुळे अनेक शेतकरी पेरू उत्पादन घेत असतात.साधारणपणे एका हेक्टरमध्ये दीड ते दोन हजार पेरू रोपांची लागण केली जात असते. प्रत्येक गावात साधारण एक ते तीन लाखांपर्यंत उत्पादन या भागातील बागायतदार बाराही महिने पेरूचे उत्पादन घेतले जाते. मात्र, यावर्षी संपूर्ण जगभरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनामार्फत संपूर्ण भागांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे पेरू खरेदी-विक्री करण्यासाठी ग्राहक वर्ग नसल्यामुळे व्यापारी वर्गांनी पाठ फिरवली आहे. याचा फटका पेरू बागांना बसला आहे.परिसरामध्ये असलेले पेरू उत्पादक मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. विक्रीयोग्य पेरू असतानाही केवळ बाजारपेठ बंद असून, नागरिकांना व ग्राहकांनाही संचारबंदी करण्यात आल्यामुळे तसेच दळणवळण ही मोठ्या प्रमाणात चालू नसल्यामुळे सर्व क्षेत्रात याचा फटका बसत असलेले चित्र दिसत आहे. शासनाने या परिसरामध्ये झालेल्या बागांचे खऱ्या अर्थाने पंचनामे करून बागायतदारांना नुकसान भरपाई देणेही गरजेचे असल्याचे बागातदार याकडून बोलले जात आहे. मायणीच्या पेरूला राज्यात मागणी... मायणी परिसर हा पेरू उत्पादनासाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. या पेरूची राज्यांमध्ये मोठी मागणी असते. विशेष करून पश्चिम महाराष्ट्रसह कोकण किनारपट्टीवर त्या प्रमाणात मायणीचा पेरू विकला जात असतो. मात्र, यावर्षी या पेरूला मोठा फटका बसला आहे. एक एकर क्षेत्रामध्ये सुमारे ७०० पेरूंची झाडे असतात. या प्रत्येक एकरामध्ये प्रतिदिनी पाच ते दहा हजार रुपयांचा पेरू विक्रीयोग्य होत असतो. मात्र, यावर्षी लॉकडाऊन असल्यामुळे ही विक्री बंद असल्यामुळे पेरू बागेतच सडून जात आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून लाखोंचा तोटा झाला आहे. - संजय गुदगे, पेरू उत्पादक, मायणी
ता.०९-०६-२०२० सांगली प्रतिनिधी : जिल्ह्यात आणखी 4 नवे रुग्ण झाले असून आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथे दोन रुग्ण मिळून आले आहेत. तर किनरेवाडी (शिराळा), विहापूर (कडेगाव) येथे प्रत्येकी एक रुग्ण मिळून आले आहेत. रुग्णांची संख्या 182 झाली असून सध्यस्थितीत 75 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सहा जणांची प्रकृती चिंताजनक असून एक कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. सहा चिंताजनक, सहा कोरोनामुक्त साळसिंगे (खानापूर) येथील 60 वर्षीय व्यक्ती, कडेबिसरीतील 48 वर्षीय व्यक्ती, खिरवडे (ता. शिराळा) येथील 56 वर्षीय पुरुष, मणदूर (शिराळा) येथील 81 वर्षीय व्यक्ती, कदमवाडी (कवठेमहांकाळ) येथील 50 वर्षीय महिला, विटा (हनुमंतनगर) येथील 34 वर्षीय पुरूष अशा सहा यांची प्रकृती चिंताजनक आहे. झोळंबी वसाहत आष्टा (वाळवा) येथील एक रुग्ण कोरोनामुक्त झाले. नवे बाधित - 4 एकूण रुग्ण - 182 उपचार घेणारे रुग्ण - 75 बरे झालेले रुग्ण - 100 मृत्यू - 7 पॉझिटिव्ह चिंताजनक - 6 ग्रामीणमधील बाधित - 130 शहरी भागातील बाधित - 41 महापालिका क्षेत्र - 11
ता.०८-०६-२०२० कडेगाव प्रतिनिधी : तालुक्यातील एका गावामधील बारा वर्षीय अल्पवयीन मुलीस जीवे मारण्याची धमकी देऊन दोन वृद्ध नराधम भावांनी वारंवार बलात्कार केला ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिस कसून तपास करीत आहेत. या घटनेतील गुन्हेगारांना कायद्याने कठोर शिक्षा होईल. पीडित मुलीच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी भारती विद्यापीठाने घेतली आहे, अशी ग्वाही कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी कडेगाव येथे पत्रकारांशी बोलताना दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यशासन पीडित अल्पवयीन मुलीच्या व तिच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पीडित मुलीसह तिच्या कुटुंबियांवर जो आघात झाला आहे. यातून सावरून ते बाहेर पडावेत. अल्पवयीन मुलीवरील बलात्काराची घटना संतापजनक व चीड आणणारी आहे. या प्रकरणाची राज्य सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. योग्य दिशेने पोलिस तपास करीत आहेत. या गुन्ह्यातील आरोपींना कायद्याने कठोरात कठोर शिक्षा होईल व पीडित मुलीला न्याय मिळेल. शिवाय 'त्या' पीडितेला भविष्यात सन्मानाने जगता यावे यासाठी भारती विद्यापीठ 'तिच्या' शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेत आहे. तसेच पीडित मुलीला व तिच्या कुटुंबियांना सर्वोतोपरी मदत केली जाईल असे राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी यावेळी सांगितले.
ता.०८-०६-२०२० तासगाव प्रतिनिधी : कोरोनाला आळा घालण्यासाठी सांगली जिल्हा प्रशासन चांगली भूमिका पार पाडत आहे. त्यामुळे कोरोनाचा सांगलीतील वाढणारा आलेखावर नियंत्रण मिळत आहे. असे असताना देखील येथे नविन कोरोना बाधित सापडत आहेत. तासगाव तालुक्यातील कचरेवाडीनंतर पेड गावामध्ये कोरोना बाधित सापडल्यामुळे गावात खळबळ माजली असून जिल्हा पुन्हा हादरला.पेड गावात २७ मे रोजी मुंबई वरून आलेल्या तरूणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने गावातील लोकांची तारंबळ उडाली.तर याची माहिती मिळताच तालुका आरोग्य प्रशासनाने गावाला भेट देत मध्यरात्रीच गावचे रस्ते सील केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अनिल सूर्यवंशी यांनी दिली.हा तरुण मुंबई मधून २७ मे ला एकटाच आला होता. गावात येताच त्याला संस्थात्मक क्वारंटाईन केले होते. तर आरोग्य विभाग ही आपली योग्य भुमिका पार पाडत आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी क्वारंटाईन सेंटर सॅनिटायझ केले आहे.
ता.०७-०६-२०२० विटा प्रतिनिधी : संक्रमणाच्या काळात आत्तापर्यंत अस्पर्श राहिलेल्या विटा शहरात अखेर कोरोना घुसला आहे. शहरातील एका ३४ वर्षीय तरुण सलून व्यवसायिकालाच कोरोनाने गाठले आहे. तसेच प्राथमिक माहितीनुसार या व्यक्तीला कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विटा शहरवासीय हबकले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून संबंधित व्यक्तीला कोरोना सदृश लक्षणे आढळली होती. त्यानंतर सांगलीतील एका खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. काल शनिवारी त्याचा त्रास वाढल्याने त्याची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. ती कोरोना पॉजिटिव्ह आली आहे. विशेष म्हणजे खानापूर तालुक्यात आजाखेरीस ९ कोरोनाचे रुग्ण आढळले असले तरी विटेकरांनी कटाक्षाने शहरात कोरोना संसर्ग होऊ न देण्याची खबरदारी घेतली होती. विट्याजवळील साळशिंगे आणि कुर्ली या गावातील परराज्यातून आणि जिल्ह्यातून म्हणजे गुजरातमधील अहमदाबाद आणि मुंबई येथून आलेल्या व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला आहे. तसेच खानापूर घाटमाथ्यावरील करंजे, बलवडी, बेणापूर, सुलतानगादे या गावांत प्रत्येकी १ रुग्ण सापडल्याने त्याठिकाणी कोरोना पोहोचला होता. घाटमाथ्यावरील सर्व रुग्णांना बाहेरील प्रवासाची हिस्ट्री आहे.
ता.०७-०६-२०२० विटा प्रतिनिधी : "एक दिवस भविष्यासाठी"हा झाडे लावणेचा उपक्रम आयोजित केला आहे. सर्वांनी आपल्या घरी, शेतात किंवा जागा भेटेल तिथे एक झाड लावा व त्याच्यासोबत तुमचा एक फोटो काढून तुमचे नाव व गाव/शहर लिहून आमच्या वॉट्सएप् क्रमांकवर पाठवा. या उपक्रमामधे कोणतीही व्यक्ती भाग घेऊ शकते. फोटो पाठविणार्या प्रत्येक व्यक्तीस सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. सन्मानपत्र वाटप(ऑनलाईन) ता. 15 जून 2020 वॉट्सएप्प क्र. 9405575477 चला झाडे लावुया, सेल्फी काढ़ुया आम्ही विटेकर कल्चरल गृप विटा
ता.०६-०६-२०२० पलूस प्रतिनिधी : कोरोनाचा एकही रुग्ण न सापडलेला पलूस हा सांगली जिल्ह्यातील एकमेव तालुका होता. मात्र, शनिवारी पलूस येथील ५५ वर्षांच्या पुरुषाचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाने पलूस तालुक्यात ही शिरकाव केला असून जिल्ह्यात आजअखेर कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १४६ झाली आहे. त्यापैकी ८७ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. तर आजअखेर पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नवे रुग्ण शनिवारी दुपारपर्यंत आणखी दोन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. वाटेगाव (ता. वाळवा) येथील ५८ वर्षांची व्यक्ती आणि नेरली (ता. कडेगाव) येथील ५० वर्षे व्यक्तीचा चाचणी अहवाल शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पलूस याठिकाणी नवीन कंटेनमेंट झोन सुरू करण्यात येत आहे. शनिवारी जिल्ह्यात सहा व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. शिराळा तालुक्यातील निगडी येथील तीस वर्षे पुरुष, जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील ३५ वर्षीय पुरुष, शिराळा तालुक्यातील रेड येथील वीस वर्षे तरुण, आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील दहा वर्षीय मुलगी, शिराळा तालुक्यातील चिंचोली येथील ४३ वर्षे पुरुष, खानापूर तालुक्यातील गोरेवाडी येथील ४५ वर्षे पुरुष यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
ता.०६-०६-२०२० विटा प्रतिनिधी: राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या राजपथ इनफराकॉन कंपनीने प्रतिवर्षी ७ जून हा दिवस वृक्षारोपण दिन म्हणून मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणातील समतोल बिघडल्याने आज संपुर्ण जगाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, कोरोना विषाणू हा देखिल त्यातील एक जटिल प्रश्न निर्माण झाला आहे, पर्यावरणातील हे संतुलन साधण्यासाठी झाडे लावणे आणि झाडे जगविणे हा एकमेव पर्याय असुन त्यासाठी राजपथ ने एक पाऊल पुढे टाकले आहे ७ जून या दिवशी मृग नक्षत्र प्रारंभ होत आहे आणि पावसाळाही सुर होतो. याच मुहूर्तावर राजपथ परिवाराने दरवर्षी ७ जून हा दिवस वृक्षारोपण दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. यावर्षी या उपक्रमाचा शुभारंभ खानापूर तालुक्यातील रेवानगर येथे सकाळी 10 वाजता आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे, हे वृक्षारोपण कराड - विटा - नागज राष्ट्रीय महामार्ग ई १६६ या रस्त्याच्या दुतर्फा होणार होणार आहे. या सोहळ्यासाठी विट्याच्या नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील , खानापूर पंचायत समितीचे सभापती महावीर शिंदे, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके, मुख्याधिकारी अतुल पाटील , वनक्षेत्रपाल अरविंद कांबळे, कंपनी चे अध्यक्ष जगदीश कदम हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत, कोरोना च्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम सोशल डीस्टंनशिंग पाळून करण्यात येणार आहे कंपनीने पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन वृक्षारोपणचा निश्चिय केला आहे मागील वर्षी कंपनीच्या सर्व साइटस वर जवळ जवळ ३५ हजार झाडे लावली होती. वृक्षारोपण करताना कडुलिंब ,वड,पिंपळ ,अशोक, जारळू अशा प्रकारची देशी झादे लावण्याचे ठरवले आहे. जेणेकरुन सदर झाडामुळे त्या त्या भागातील पर्यावरणाला , प्राणी- पक्षी याना त्याचा फायदा होईल. कंपनीने यासाठी खास" WILD-CER " ह्या NGO च्या डॉ मनीषा भोसले यांचे मार्गदर्शन घेतले आहे . यापूर्वी ३५ हजार झाडापैकी राजपथ परिवाराने उनहाळ्यामध्ये जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते तेथेजवळ जवळ ३०, हजार झाडे जगवलेली आहेत. कंपनीने वृक्षारोपण हा एक सोहळा म्हणूनच साजरा करण्याचे व्रत घेतले आहे. त्या अनुषंगाने ह्या वर्षी देखील कंपनीच्या सगळयाच साइटस वर ३५ हजार झाड लावण्याचे ठरवले आहे.
ता.०६-०६-२०२० मायणी प्रतिनिधी : खटाव तालुक्यातील मायणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्यात आले असून जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांवर उपचारही सुरु करण्यात आले आहेत. आमदार जयकुमार गोरे यांच्या परिश्रमातून आणि संकल्पनेतून अद्ययावत हॉस्पिटलमध्ये सुसज्ज कोविड वॉर्ड तयार करुन मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफ सज्ज ठेवण्यात आला आहे. दुष्काळी खटाव तालुक्यात अद्यावत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरु झाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांच्या अडचणी दूर झाल्या आहेत. जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनावरील ताण वाढला आहे. सातारा व कराड येथे कोविड उपचार केंद्रात बेड उपलब्ध होणेही मुश्कील झाले आहे. जिल्ह्यातील विलगीकरण कक्षही हाऊसफुल्ल झाले आहेत. मायणी येथील छ. शिवाजी एज्यूकेशन सोसायटीच्या रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल तसेच इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरमध्ये सुरुवातीला कोविड संशयितांसाठी क्वारंटाईन वॉर्ड तयार करण्यात आला होता. आयसीयू वॉर्डही सज्ज ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि संस्थेचे अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांची सातारा येथे गेल्या आठवड्यात बैठक झाली. मायणी मेडिकल कॉलेजमध्ये कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्याचा निर्णय त्या बैठकीत घेण्यात आला. आ. जयकुमार गोरे, संस्थापक डॉ. एम. आर. देशमुख, सचिव सोनिया गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुसज्ज कोविड वॉर्ड तयार करण्यात आला. मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफही सज्ज ठेवण्यात आला. प्रांत अश्विनी जिरंगे, तहसीलदार अर्चना पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनुस शेख आणि प्रशासनाच्या सहकार्याने करोनाबाधित रुग्णांवर मायणी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु करण्यात आले. सध्या येथे करोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ग्रामीण भागातील जनतेला सर्व आरोग्य सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी मायणी मेडिकल कॉलेजमध्ये सीटीस्कॅन, डायलिसिस, एमआरआय, कॅथलॅब अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. माण, फलटण, खटावसह सातारा, सांगली जिल्ह्यातील जनतेला या हॉस्पिटलच्या सुविधेचा लाभ मिळणार आहे. सुसज्ज हॉस्पिटलचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले …. माझ्या मतदारसंघातील जनतेला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून माझे प्रयत्न सुरु होते. त्यासाठी 500 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचा माझा मानस होता. मायणी मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही मोठ्या परिश्रमाने अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. डायलिसिस, सीटीस्कॅन, एमआरआय तसेच ह्रदय रुग्णांसाठी कॅथलॅब अशा सर्व सुविधा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होत आहेत. एकाच वेळी 500 रुग्णांवर उपचार होणारे हॉस्पिटल साकारण्यात आले याचे समाधान आहे. - जयकुमार गोरे (आमदार, माण- खटाव)
ता.०६-०६-२०२०आटपाडी प्रतिनिधी : झरे येथील ५८ वर्षीय कोरोना बाधित महिलेचा रात्री मृत्यू झाला आहे. या महिलेवर १ जून पासून आयसोलेशन कक्षात उपचार सुरू होते. तसेच या महिलेला मधुमेह, थायरॉईड आणि हृदयविकाराचा त्रास होता अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले आहे.
ता.०४-०६-२०२० कराड/पाटण : करोनाचे संकट आ वासून उभे असताना निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कराड व पाटण तालुक्यालाही जोरदार पावसाचा तडाखा बसला. वादळी वारे आणि मुसळधार पावसाने अनेक महाकाय वृक्ष उन्मळून पडले तर अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेकांच्या घरांवरील पत्रेही उडून गेले.कराड व पाटण तालुक्यांना बुधवारी पहाटेपासून वादळी वारे व मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे कराड-पाटण तालुका हडबडून गेला आहे. पावसाळ्यापूर्वीच आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गच्या प्रभावामुळे पाटण तालुक्यात नुकसान होण्याची शक्यता असल्याने शासकीय विभागांनी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले होते. यात महाबळेश्वर, जावळी, वाई आणि पाटण या तालुक्यांचा समावेश होता. मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटेपासून जोरदार वारे, मुसळधार पावसाने कहर केला. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. पाटण तालुक्यात कोयना, तारळी, ढेबेवाडी, मल्हारपेठ, चाफळ परिसराला पावसाचा तडाखा बसला.अनेक ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक ठिकाणी वीज गायब झाली होती. कराड तालुक्यात उंब्रज, तांबवे, रेठरे, उंडाळे, कार्वे, मसूर या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. रेठरे खुर्द, उंब्रज भागात झाडे कोसळली व घरांचे पत्रे उडाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. कराड विमानतळ परिसरात कामगारांच्या झोपड्यांवर बाभळीचे झाड कोळल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे.
ता.०४-०६-२०२० सांगली प्रतिनिधी : राज्यातील हजारो शेतकर्यांना कोट्यवधी रुपयांना लुबाडणार्या कडकनाथ कुक्कुटपालन घोटाळ्याचा तपास सध्या थांबला आहे. तो का व कोणासाठी थांबला आहे, याचे उत्तर यंत्रणा देत नाही. पोलिस या घोटाळ्याच्या मुख्य सूत्रधारापर्यंत कधी पोहोचणार, आमचे गुंतविलेले घामाचे पैसे कधी मिळणार, की घोटाळा करणारा ते मुरवणार, असा सवाल शेतकरी करू लागले आहेत. 'कडकनाथ कोंबड्या पाळा, लाखो रुपये मिळवा', अशा भूलथापा देत राजकीय वरदहस्त मिळवून काही कार्यकर्त्यांनी इस्लामपूर येथे कडकनाथचे मुख्य कार्यालय थाटले होते. सांगली, कोल्हापूरसह राज्यातील सोलापूर, सातारा, नाशिक, नगर, पुणे या जिल्ह्यांतील हजारो शेतकर्यांनी लाखो रुपये यात गुंतविले होते. वर्षभर हा घोटाळा सुखनैवपणे सुरू होता. यातून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांवर घोटाळ्यातील बहाद्दरांनी गाड्या, जमिनी घेतल्या. शहरात रियल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली. कोट्यवधी माया जमवून कंपनीच्या प्रमुखांनी अक्षरश: ऐश केली. यामुळेच काही शेतकर्यांचे पैसे परत देण्यास उशीर झाला अन् या घोटाळ्याचे बिंग फुटले. त्यानंतर राज्यभरातून तक्रारींचा ओघ पोलिसांत सुरू झाला. पोलिसांनी पहिल्या टप्प्यात तपासाला गती दिली नाही. त्यामुळे संतप्त शेतकर्यांनी मोर्चे, आंदोलने केली. परंतु तरीही यंत्रणा दाद देत नव्हती. कोेल्हापूर व पाटण येथील शेतकर्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडविण्यात आला. नंतर यंत्रणा जागी झाली.त्यानंतर तपासाला काहीशी गती आली. पोलिसांनी या घोटाळ्यातील कळसूत्री बाहुल्यांना अटक केली, पण कंपनी चालविणारे दोन सूत्रधार फरार झाले. परिणामी शेतकरी संतापले. अनेक संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतल्याने पोलिसांवर दबाव वाढत गेला. त्यामुळे चार कंपनी चालकांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. परंतु मुख्य सूत्रधारापर्यंत पोलिस पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे शेतकर्यांचे गुंतविलेले पैसे मिळणे मुश्कील झाले आहे. शेतकर्यांच्या घामाचे, कष्टाचे पैसे घेऊन मुख्य सूत्रधार निवांत आहे. तपासाला गती देऊन मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. पण पोलिसांनी हा तपास का थांबविला आहे, कोणासाठी थांबविला आहे, असा सवाल शेतकरी करीत आहेत. मुख्य सूत्रधार मोकाट आहे. तो कोंबड्यांचे खाल्लेलेे पैसे मुरविणार काय, असे शेतकरी बोलत आहेत. पण हे आम्ही सहन करणार नाही. या घोटाळ्याच्या तपासासाठी पुन्हा एकदा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे
ता.०४-०६-२०२० आळसंद प्रतिनिधी : कुर्ली - घाडगेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी वादळीवाऱ्यासह गारांचा झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करुन पंचनामे केले. वादळी वाऱ्याचा 25 हेक्टर क्षेत्रातील पिकांना तडाखा बसला आहे. 12 घरांची पडझड झाली आहे. कोरोना मुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना वादळीवाऱ्याने मोठी चपराक दिली आहे. शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आहे. कुर्ली , घाडगेवाडी,पारे सह परिसरात रविवार (ता.31) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास वादळीवाऱ्यासह गारांचा जोराचा पाऊस झाला. त्यात भाजीपाल्यासह, टोमॅटो,डबू मिरची, ऊस ,कलिंगड, मेंथी, द्राक्ष , मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या पिकांचे वादळीवाऱ्यात सुपडासाप झाले. अनेकांचे घरांचे पडझड झाले. जनावरांच्या शेडचे पत्रे वादळीवाऱ्याने उडाले. यात हजारो रुपयांचे नुकसान झाले. जनावरांना इजा झाली. माजी आमदार सदाशिवराव पाटील, ऍड बाबासाहेब मुळीक , जिल्हा कृषिअधिक्षक बसवराज मास्तोळी, तालुका कृषिधिकारी प्रकाश कुंभार यांनी पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या सूचनांची दखल घेत तलाठी भाग्यश्री चव्हाण, ग्रामसेवक आर.एस.माळवे ,एस.एस. गाडेकर यांनी पंचनामे केले. " कुर्ली - घाडगेवाडी येथे झालेल्या वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केले आहेत. त्यांचा अहवाल तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्याकडे पाठविला आहे." भाग्यश्री चव्हाण तलाठी कुर्ली (ता.खानापूर) " वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यात भाजीपाल्याचे नुकसान झाले. टोमॅटो, डबू मिरची, ऊस , यासह अन्य पिकांचे नुकसान झाले. तलाठी कृषिपर्यवेक्षक यांनी पंचनामे केले आहेत. शासनाने तातडीने आर्थिक मदत कराव्." ईश्वर घाडगे, नुकसानग्रस्त शेतकरी कुर्ली( ता.खानापूर ) कुर्ली येथे झालेल्या वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान खालीलप्रमाणे : फळबाग : 12 हेक्टर फळभाज्या : 11.45 हेक्टर मका : 0.30 आर घर : 12 गुरांचे शेडपड : 4 घाडगेवाडी येथे झालेले पिकांचे नुकसान खालीलप्रमाणे फळबाग :1.70हेक्टर टॉमेटो : 0.60आर जनावरांच्या शेडपड : 2
ता.०४-०६-२०२० विटा प्रतिनिधी : कोरोनासह विविध संकटांमुळे शेतकरी अगोदरच हवालदिल झाला आहे आणि निसर्गानेही त्याच्यावर अवकृपा दाखवली आहे. कुर्ली गावात गारपीटीसह मोठा अवकाळी पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो, ढबू, द्राक्ष या पिकांचा समावेश आहे. कुर्ली हे गाव सांगली जिल्ह्यात माळव्यासाठी प्रसिद्ध आहे.अनेक लोक शेती आधारित व्यवसायावर अवलंबून आहेत.अशातच गावात मोठा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हानी पोहोचलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी केली. 'गेल्या दोन महिन्यापूर्वी लॉकडाउन मुळे हातातोंडाला आलेली पिके सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांच्या वर आली होती मात्र यानंतरही शेतकऱ्यांनी खचून न जाता नवीन पिकांची लागवड करून ती बाजारात येण्याची वेळ आली असता अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्याचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सदाशिवराव पाटील,जिल्हाध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.यावेळी सरपंच दादासाहेब पाटील,पोपटराव सदाशिव शिंदे,रवीशेठ पाटील,प्रा.दत्ता हेगडे,विठ्ठल सुतार,मारुती पिसाळ,विजय पिसाळ,दीपक पिसाळ,दिनकर पिसाळ,समाधान पाटील व परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
ता.०४-०६-२०२० विटा प्रतिनिधी : काल झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील कुर्ली येथील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे,घरे,जनावरांचे गोठे,यांचे अतोनात नुकसान झाले आहे तरी त्यांच्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा कृषी अधिकारी,व प्रशासनास दिल्या काल वादळी वारे आणि गारांसह अचानक पाऊस सुरू झाला आणि त्याचा फटका हातातोंडाशी आलेल्या द्राक्ष बागायत,भाजीपाला,आणि जनावरांना होऊन शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान झाले आहे आधीच कोरोना मुळे मागील दोन ते अडीच महिने संपूर्ण बाजारपेठ बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जात आहे आणि भरीस भर म्हणून निसर्गाने अजून अवकृपा केलेली आहे अशा कठीण प्रसंगी शेतकऱ्यांना आधार देणे व त्यांच्या मागे ठामपणे उभं राहणं हे लोकप्रतिनिधी म्हणून मी माझं कर्तव्य समजतो म्हणूनच कोरोना चे संकट टळल्यानंतर आपण शासन दरबारी यावर मुख्यमंत्री साहेबाना एक विशेष बैठक लावण्यासंदर्भात विनंती करणार आहे,व शेतकऱ्यांच्या समस्या मांडून त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात विनंती करणार आहे ,ज्या लोकांनी पीकविमा काढला आहे त्यांच्या नुकसान भरपाई ची जबाबदारी विमा कंपनी यांचे अधिकारी सोबत बैठक करून त्यावर मार्ग काढण्यासाठी पाठपुरावा करणार आहे शेतकऱ्यांनी खचून न जाता प्रशासनास सहकार्य करून आपल्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास मदत करावी आणि प्रशासनाने कोणीही नुकसानग्रस्त शेतकरी यापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी यावेळी जिल्हा कृषी अधिकारी मास्तोळी साहेब,तालुका कृषी अधिकारी प्रकाश कुंभार,कुर्ली गावचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य, मार्केट कमिटी सदस्य ,कृषी सहायक गाडेकर,सर्कल पाटोळे साहेब,तलाठी ,ग्रामसेवक माळवे आणि गावातील नुकसान ग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
ता.०२-०६-२०२० सांगली प्रतिनिधी : राज्य शासनाने कोरोनाच्या लढ्यासाठी "मिशन बिगेन अगेन,' जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात केली जाईल. आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवेश बंदी कायम आहे. यामुळे शेजारी जिल्ह्यात जाणारे नोकरदार, कामगार व शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आंतरजिल्हा बंदी उठवण्यासाठी सरकार आणि पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या 10-12 दिवसापासून सुरु झालेले सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसाय पुन्हा बंद ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, कोरोना पार्श्वभूमिवर लॉकडाऊन जाहीर केल्यापासून आंतरराज्य, आंतरजिल्हा वाहतुकीसाठी तसेच प्रवासासाठी बंदी कायम आहे. गेल्या 18 दिवसांपासून शासनाकडून काही सेवांना शिथिलता देण्यात आली आहे. मात्र आंतरराज्य, आंतर जिल्हा प्रवेश बंदी कायम आहे. सांगली जिल्ह्यातील बहुतांशी नोकरदार, कामगार कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात नोकरीला आहेत. दोन्ही जिल्ह्यातून अनेक लोक नोकरी आणि व्यवसायासाठी सांगली जिल्ह्यात येतात. सांगली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांची कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात शेतीही आहे. या ठिकाणी जाताना अडचणी निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नोकरदार कामगारांचे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून काम बंद आहे. त्या लोकांना कामावर रुजू होण्यासाठी आंतरजिल्हा बंदी उठवावी, याबाबतची मागणी शासनाकडे केली जाणार आहे. तसेच पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून लवकरच तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.' सलून, ब्युटी पार्लर बंद राहणार केंद्र, राज्य सरकारने चौथ्या लॉकडाऊनमध्ये सलुन ब्युटी पार्लर हे चालू करण्यास परवानगी दिली होती. मात्र मिशन बिगेन अगेन जाहीर केल्यानंतर सलुन, ब्युटी पार्लर आणि स्पा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाची कार्यवाही जिल्ह्यात केली जाणार असतो जिल्ह्यातील सलून, ब्युटीपार्लर बंद राहतील. जिल्ह्यातील शॉपिंग मॉल्स आणि हॉटेल्स बंद राहणार आहेत. याशिवाय रेस्टॉरंट मधून पार्सल सुविधा देता येईल. शाळा-महाविद्यालय तसे खासगी क्लासेस बंद राहणार आहेत, मात्र ऑनलाइन शिक्षण चालू ठेवता येईल. संचारबंदी रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत शासनाने संचारबंदीच्या वेळेत बदल केला आहे. यापुढे रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. सिनेमा हॉल, स्विमिंग पूल बंद राहणार असून राजकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमावर बंदी कायम आहे. सध्या जी दुकाने चालू आहेत त्यांच्यासाठी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच ही वेळ कायम आहे. जिल्हा प्रशासनाकडे 90 हजार अर्ज जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, जिल्हा प्रशासनाकडे जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी 89 हजार 512 प्रस्ताव आले आहेत. त्यापैकी 35 हजार 627 अर्ज मंजूर झाले. तर 40 हजार 871 अर्ज अपात्र ठरले आहेत 13800 प्रस्ताव प्रलंबित आहेत जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी खरच आवश्यकता असेल तरच अर्ज करावेत. अंत्यविधीसाठी 20, लग्नासाठी 50 लोकांना परवानगी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, अंत्यविधीसाठी यापुर्वी 50 लोकांना परवानगी देण्यात आली होती, परंतु त्यामध्ये बदल करीत आता अंत्यविधीसाठी वीसच लोकांना एकत्र येता येईल. लग्न समारंभासाठी पन्नास लोकांना एकत्र येता येईल, असे यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.
ता.०२-०६-२०२० तासगाव प्रतिनिधी : येथील स्वामी रामानंद भारती सुतगिरणीच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने आक्रमक पाऊल उचलले आहे. सुतगिरणीच्या 57 कोटींच्या कर्जाच्या वसुलीसाठी या संस्थेचा 6 जुलै रोजी लिलाव काढण्यात येणार आहे. स्व. आर. आर. पाटील यांच्या पश्चात अवघ्या पाच वर्षात सुतगिरणीला लिलाव प्रक्रियेला सामोरे जावे लागणार असल्याने राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांना हादरा बसला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी अत्यंत कष्टाने स्वामी रामानंद भारती सुतगिरणीची उभारणी केली. याठिकाणी तयार झालेले सूत अनेक देशांत निर्यात होत होते. सुतगिरणीची उभारणी झाल्याने तालुक्यातील अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला. सहकारी तत्वावर सुरू असणारी ही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू होती. स्व. पाटील यांचेही या संस्थेच्या कारभाराकडे कटाक्षाने लक्ष असायचे. त्यामुळे ही सूतगिरणी राज्यात नावारूपाला आली होती. स्व. पाटील यांच्या निधनानंतर अवघ्या काही महिन्यात सुतगिरणीची पंचवार्षिक निवडणूक लागली. स्व. पाटील यांच्या पश्चात ही पहिलीच निवडणूक असल्याने ती बिनविरोध करण्यासाठी पाटील कुटुंबियांना बरेच प्रयत्न करावे लागले. अनेकांच्या मनधरणी कराव्या लागल्या. त्यातूनही बिनविरोध प्रक्रियेला गालबोट लागले. गव्हाण (ता. तासगाव) येथील शरद पवार या उमेदवाराने माझी बोगस सही करून अर्ज माघारी घेतल्याची तक्रार सहकार न्यायालयात केली. नुकताच या तक्रारीवर न्यायालयाने सुतगिरणीच्या बाजूने निकाल दिला. ही निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आमदार सुमनताई पाटील यांना संस्थेचे अध्यक्ष करण्यात आले. मात्र ज्या ताकतीने व कौशल्याने स्व. पाटील यांनी सूतगिरणी चालवली त्या ताकतीने आमदार सुमनताई पाटील यांना ही सूतगिरणी चालवता आली नाही, हे कटू सत्य आहे. त्यांच्या काळात दिवसेंदिवस सूतगिरणी अडचणीत सापडत गेली. शासनाची धोरणेही त्याला कारणीभूत होतीच. मात्र अडचणींवर मात करीत कशीबशी सुतगिरणीचे मार्गक्रमण सुरू होते. दरम्यान, गेल्या 5 वर्षात सूतगिरणी अनेकवेळा आर्थिक संकटात सापडली. बऱ्याचवेळा सूतगिरणी बंद ठेवावी लागली. कामगारांनीही अनेकवेळा नियमित काम मिळावे, बंद काळातील पगार मिळावा, यासह अन्य मागण्यांसाठी आंदोलने केली. चक्क सुतगिरणीच्या प्रवेशद्वारासमोर ही आंदोलने झाली. त्यातूनही मार्ग काढून सूतगिरणी सुरू करण्यात आली. मात्र, सुतगिरणीसमोरील आर्थिक संकटे संपत नव्हती. स्व. पाटील यांच्या वारसांनाही सक्षमपणे ही संस्था चालवता आली नाही. अखेर ही संस्था चालवायला देण्याची नामुष्की आमदार पाटील यांच्यावर आली. गेल्या वर्षभरापासून ही सूतगिरणी चालवायला दिली आहे. मात्र तरीही सुतगिरणीच्या पाठीमागील आर्थिक संकटे पिच्छा सोडायला तयार नव्हती. दिवसेंदिवस संस्था कर्जाच्या डोहात बुडत चालली. संस्थेला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्जपुरवठा केला आहे. मात्र हे कर्ज गेल्या काही महिन्यांपासून थकीत आहे. थकीत कर्जाचा आकडा तब्बल 57 कोटींवर गेला आहे. कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने अनेक प्रयत्न करूनही कर्जाच्या रकमेचा भरणा सुतगिरणीने केला नाही. त्यामुळे बँकेला कायदेशीर मार्ग अवलंबायला भाग पडले आहे. बँकेने आता सुतगिरणीला कर्जाच्या वसुलीसाठी थेट लिलावाची नोटीस पाठवली आहे. तर लिलावासाठी 3 जुलैपर्यंत निविदा मागवण्यात आल्या आहेत. 6 जुलै रोजी दुपारी 2 वाजता बँकेच्या या निविदा उघडण्यात येणार आहेत. दरम्यान, आमदार पाटील यांना या निविदा प्रक्रियेमुळे हादरा बसला आहे. गेल्या 5 वर्षातील नियोजनशून्य कारभाराचे हे फलित असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे तासगाव सहकारी कारखाना लिलावात काढून त्याची विक्री करण्यात आली. आता दुसरीकडे सहकारी तत्वावर सुरू असणाऱ्या या सुतगिरणीचा लिलाव करण्याची वेळ आली आहे. तासगाव बाजार समितीतील कोट्यवधी रुपयांच्या गैरकारभाराचीही चौकशी सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील सहकार उध्वस्त होतोय की काय अशी शंका निर्माण झाली आहे. *सुतगिरणीच्या लिलावामागे राजकीय षडयंत्र?* खरं तर कर्जाचे हप्ते थकल्यानंतर संबंधित संस्थेच्या मालमत्तेचा लिलाव काढणे ही नियमित प्रक्रिया आहे. तासगाव सुतगिरणीप्रमाणे आमदार अनिल बाबर यांच्या स्पिनिंग मिल आणि आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या केन अँग्रो या संस्थांचाही लिलाव होणार आहे. ही सर्व कायदेशीर आणि नेहमीची प्रक्रिया आहे. मात्र तरीही तासगाव सुतगिरणीवरील कारवाईमागे राजकीय वास, षडयंत्र असल्याची चर्चा आहे. मध्यंतरी जिल्हा बँकेने भाजपच्या एका बड्या नेत्याला कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिल्याची चर्चा आहे. त्याला तासगाव तालुक्यातील एका संचालकाने विरोध केला होता. त्याचा राग मनात धरून संबंधित भाजपच्या नेत्याने सूडबुद्धीने ही कारवाई करायला भाग पडल्याची चर्चा रंगत आहे:@jantandav.com
ता.०१-०६-२०२०कडेगाव प्रतिनिधी : कडेगाव तालुक्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.गेल्या काही दिवसात भिकवडी पाठोपाठ सोहोली, खेराडे वांगी यानंतर आंबेगाव व नेर्ली येथे कोरोना रुग्ण आढळून आले .गुरुवारी रात्री नेर्ली येथील ५७ वर्षीय कोरोना बधित पुरुषाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी या मृत व्यक्तीचा २८ वर्षीय मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले .त्यानंतर आता आज सोमवारी या मृत व्यक्तीची ५१ वर्षीय पत्नी व २५ वर्षीय मुलगी यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत जाऊन कडेगाव तालुक्याभोवती कोरोनाचा विळखा आवळत आहे.यामुळे प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकही चिंता व्यक्त करत आहेत. मुंबई ,अहमदाबाद व अन्य मोठ्या शहरातून परतलेल्या नागरिकांमुळे हा धोका निर्माण होत आहे.कडेगाव तालुक्यात आतापर्यंत १५ लोकांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. पैकी सोहोली येथील एक ५४ वर्षय रुग्ण ठणठणीत बरा झाला आहे. त्यामुळे आता १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत . तर, कोरोनामुळे तालुक्यातील भकवडी (खुर्द ) येथील ६५ वर्षीय वृद्धाचा व नेर्ली येथील ५७ वर्षीय पुरुषाचा असा २ जणांचा मृत्यू झाला आहे,. दिवसेंदिवस कडेगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे .याशिवाय कडेगाव तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातही कोरोनाचा कहर सुरू आहे. यामुळे प्रशासनाने जिल्हा हद्दीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे .कडेगाव तालुक्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे .मात्र प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणे गरजेचे आहे आहे. *तालुक्यातील साध्यस्थीती* : एकूण बाधित रुग्ण :१५ उपचारात असलेले रुग्ण :१२ बरे झाले रुग्ण : १ कोरोनामुळे मृत्यू झालेले रुग्ण : २
ता.०१-०६-२०२० सांगली प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील मौजे मणदूर गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - शिराळा तालुक्यातील मौजे मणदूर येथील 1) शामराव ज्ञानू सावंत यांचे घर ते संपत गणपती पाटील यांचे घर 2) संपत गणपती पाटील यांचे घर ते मारूती श्रीपती चौगुले यांचे घर 3) मारूती श्रीपती चौगुले यांचे घर ते शामराव ज्ञानू पाटील यांचे घर 4) शामराव ज्ञानू पाटील यांचे घर ते शामराव ज्ञानू सावंत यांचे घर, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) रामचंद्र जर्नादन गुरव यांची जमीन ते ईश्वर रावजी नायकवडी यांची जमीन 2) ईश्वर रावजी नायकवडी यांची जमीन ते तानाजी विठू पाटील यांची जमीन 3) तानाजी विठू पाटील यांची जमीन ते केशव गणपती कांबळे यांची जमीन 4) केशव गणपती कांबळे यांची जमीन ते रामचंद्र जर्नादन गुरव यांची जमीन. या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
ता.३१-०५-२०२० विटा प्रतिनिधी : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तब्बल दोन महिन्यांपासून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला. संचारबंदी लागू केल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहतुकीलाही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालक मालकांवर मोठे संकट कोसळले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी या वाहनचालकांवर मजुरीने जाण्याची वेळ आली आहे. विट्यामध्ये जवळपास तीसहून अधिक खासगी वाहनांमार्फत विटा ते पलूस,विटा ते सांगली,विटा ते मायणी व विटा ते खानापूर मार्गावर प्रवासी वाहतूक केली जाते. शासकीय वाहनांपेक्षा अधिकच्या सुविधा असल्याने बहुसंख्य लोक या वाहनाने प्रवास करणे पसंत करतात. या व्यवसायाअंतर्गत परिसरातील शंभरहून अधिक कुटुंबाचा दैनंदिन गाडा हाकला जातो. मात्र करोनाने या वाहनांची चाके थांबवली असल्याने पूर्णतः वाहतूक व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या संबंधित वाहनचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे विटा येथील काही चालकांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मजुरीने जाण्याचा मार्ग निवडला आहे. हातावर पोट असणाऱ्या वाहनचालकांना काम केल्याशिवाय पर्याय नसल्याने शेतामध्ये तसेच बांधकामावर रोजगाराने जावे लागत आहे, असे अनेक चालक काम नसल्यामुळे बेरोजगार झाले आहेत. टाळेबंदीमुळे त्यांची रोजीरोटी बंद झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परमिट धारकांची वाहने बंद असली तरी वाहनासाठीचा टॅक्स, इन्शुरन्स आदी कागदपत्रांसाठी लागणारा वार्षिक खर्च पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये सुरू आहे. या अधिकच्या खर्चाने दोन महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने व व्यवसाय लवकर सुरू होण्याची खात्री नसल्याने येथील चालक वर्ग संकटात सापडलेला आहे. यामुळे टॅक्स, इन्शुरन्समध्ये संबंधित विभागाकडून सवलत देण्यात यावी, अशी मागणी येथील चालकांनी केली आहे. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात देशात आणि राज्यात काही प्रमाणात सूट मिळालेली असली, तरी अजूनही प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आहेत. यासाठी लोकप्रतिनिधी आणि शासनाने परमिट वाहतूक व्यावसायिकांचा प्रश्न गांभीर्याने घेऊन या चालकांसाठी मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.
ता.३०-०५-२०२० सांगली प्रतिनिधी : केन अॅग्रो एनर्जी (इं) रायगाव (ता. कडेगाव) या साखर कारखान्यासह स्वामी रामानंदभारती सहकारी सूतगिरणी तासगाव व खानापूर तालुका को-ऑप. स्पिनिंग मिल विटा-गार्डी या थकबाकीदार संस्थांच्या मिळकतींच्या विक्रीसाठी जिल्हा बँकेने निविदा मागविल्या आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील, शिवसेनेचे आमदार अनिलराव बाबर यांच्याशी संबंधित या संस्था आहेत. या निविदेमुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.केन अॅग्रो या साखर कारकान्याकडे जिल्हा बँकचे 189 कोटी 34 लाख रुपये थकित आहेत. स्वामी रामानंदभारती सहकारी सूतगिरणी, तासगावकडे 56 कोटी 47 लाख रुपये थकित आहेत. खानापूर तालुका को-ऑप. स्पिनिंग मिलकडे 28 कोटी 21 लाख रुपये थकित आहेत. जिल्हा बँकेने सिक्युरिटायझेशन अॅक्टअंतर्गत थकबाकी वसुलीसाठी या संस्थांचा ताबा घेतलेला आहे. या संस्थांच्या विक्रीसाठी निविदा मागविल्या आहेत. निविदा अर्ज भरण्याची अंतिम तारीख दि. 3 जुलै आहे. निविदा उघडण्याची तारीख दि. 6 जुलै आहे. केन अॅग्रो कारखान्याकडून येणे असलेल्या कर्ज खात्याच्या वसुलीपोटी जिल्हा बँकेने ताब्यात घेतलेल्या स्थावर मिळकतीच्या व मशिनरीच्या विक्रीसाठी निविदा मागविल्या आहेत. कारखान्याची रायगाव हद्दीतील 37.18 हेक्टर जमीन त्यामधील इमारती व कारखाना, डिस्टीलरी प्लॅन्ट अँड मशिनरीच्या विक्रीसाठी निविदा मागविल्या आहेत. केन अॅग्रोकडे 189 कोटी 34 लाख रुपये थकबाकी आहे. बँकेने लिलावासाठी राखीव किंमत 114 कोटी 33 लाख रुपये नमूद केली आहे. स्वामी रामानंदभारती सहकारी सूतगिरणी तासगाव यांच्याकडून येणे असलेल्या कर्जखात्याच्या वसुलीपोटी बँकेने ताब्यात घेतलेल्या स्थावर मिळकतीच्या व मशिनरीच्या विक्रीसाठी निविदा मागविल्या आहेत. गिरणीची जमीन 13.90 हेक्टर आहे. जमीन, इमारती, प्लॅन्ट अॅण्ड मशिनरीचा लिलाव होणार आहे. राखीव किंमत 57 कोटी रुपये नमूद केली आहे. खानापूर तालुका को-ऑप. स्पिनिंग मिल्स लि. विटा (गार्डी, ता. खानापूर) यांच्याकडून येणे असलेल्या कर्ज खात्याच्या वसुलीपोटी बँकेने ताब्यात घेतलेल्या स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी निविदा मागविल्या आहेत. गिरणीची 13.44 हेक्टर जमीन व त्यामधील इमारतींच्या विक्रीसाठी निविदा मागविल्या आहेत. राखीव किंमत 28 कोटी रुपये आहे. माणगंगा साखर कारखाना आटपाडी, महांकाली साखर कारखाना कवठेमहांकाळ, डिव्हाईन फूडस पलूस, शेतकरी विणकरी इस्लामपूर, प्रतिबिंब इंडस्ट्रिज इस्लामपूर, विजयालक्ष्मी कॉटन मिल्स आटपाडी या थकबाकीदार संस्थांच्या विक्रीसाठी जिल्हा बँकेने दोनदा निविदा मागविल्या होत्या. एकही निविदा न आल्याने जिल्हा बँकेने स्वत: निविदा भरल्या असून लॉकडाऊनमुळे खरेदी प्रक्रिया रखडली आहे. उर्वरित कर्जाची वसुली होणार संचालकांकडून कर्जाची, थकबाकीची पूर्ण बाकी निविदा उघडण्यापूर्वी भरावी. तसे न केल्यास लिलावातून येणे बाकी वसूल न झाल्यास उर्वरित येणेबाकी, व्याज व खर्च, कर्जदार कारखाना, सूतगिरणी, स्पिनिंंग मिल्सच्या कर्जास हमी दिलेल्या संचालकांकडून वसूल करण्यात येईल, असे जिल्हा बँकेने नोटिसीमध्ये नमूद केलेले आहे. त्यामुळे संचालकांमध्येही खळबळ उडाली आहे.
ता.३०-०५-२०२० सांगली प्रतिनिधी : लॉकडाउनचा नियम मोडल्याने शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संभाजी भिडे यांनी सांगली ते कोल्हापूर असा प्रवास केला त्यासाठी त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडियन पिनल कोड कलम 188 अंतर्गत भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगली जिल्ह्यातून परवानगी नसताना कोल्हापूर जिल्ह्यातील उदगांवमध्ये प्रवास आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आंतर-जिल्हा प्रवेश करण्यास मर्यादा आणल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी प्रशासनाची प्रथमत: परवानगी घ्यावी लागते.मात्र भिडे गुरुजी यांनी या नियमाचे उल्लंघन करत प्रवास केला होता. त्यामुळे त्यांच्यावर शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे प्रवेश केल्याने जिल्हा संचारबंदीचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ता.२७-०५-२०२० विटा प्रतिनिधी : पडळकर हे आरएसएसशी संबंधित असूनही त्यांना प्रकाश आंबेडकर का महत्वाची पदे आहेत, अशी जाहीर टीका त्यांनी केली. प्रकाश आंबेडकर हे भाजपला सोयीस्कर काम करत असल्याचा आरोप करत लक्ष्मण माने यांनी वंचित आघाडी सोडण्याची घोषणा केली होती वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर विधानसभा निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले गोपीचंद पडळकर हे आता विधान परिषदेवर बिनविरोध आमदार झाले आहेत. त्यांच्या आमदारकीचे वंचित आघाडीच्यावतीने स्वागत करण्यात आले आहे. गेल्या दीड वर्षांत गोपीचंद पडळकर यांचा राजकीय प्रवास वेगवान राहिला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी भाजप ठोस भुमिका घेत नसल्याने पडळकरांनी भाजपशी संबंध नसल्याचे जाहीर करत उत्तम जानकर यांच्या साथीने आरक्षण आंदोलन सुरू केले.लोकसभा निवडणुकीच्यावेळी पडळकर व उत्तम जानकर हे इच्छुक होते. सांगलीत पडळकरांना तर माढ्यात उत्तम जानकरांना तिकीट हवे होते. पडळकरांनी भाजपबरोबरच काँग्रेसकडेही प्रयत्न चालवले होते. काँग्रेस आघाडीत सांगलीची जागा राजू शेट्टींच्या स्वाभिमानीला गेल्याने त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र तिन्ही ठिकाणी तिकीट न मिळाल्याने अगदी शेवटच्या क्षणी पडळकरांनी वंचित बहुजन आघाडीला तिकीट मागितले. त्यानंतर मोठा वाद झाला, मात्र प्रकाश आंबेडकरांनी पडळकरांना तिकीट दिले. 'वंचित' आरोपीच्या पिंजऱ्यात लोकसभेचे वातावरण तयार होत असताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आघाडीत यावे म्हणून प्रयत्न सुरू होते, मात्र आंबेडकर स्वतंत्रपणे लढण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. परिणामी वंचितच्या उमेदवारांमुळे आघाडीचे उमेदवार पडणार व भाजपचे उमेदवार विजयी होणार, असे गणित मांडले गेते. वंचित आघाडी ही भाजपची 'बी टीम' आहे असा जाहीर आरोप करण्यात येत होता. त्यातच पडळकरांना उमेदवारी जाहीर केल्यावर पुन्हा तो आरोप नव्याने आणि धारधारपणे झाला. कारण पडळकरांना तिकीट मिळाल्यावर पडळकर आणि संभाजीराव भिडे यांच्या संबंधाचे फोटो व्हायरल झाले. वंचित आघाडी अस्तित्वात येत असताना कोरेगाव भीमा येथील दंगलीला भिडे जबाबदार असल्याचे आरोप स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. वंचित आघाडीची हवा तयार होण्याला कोरेगाव भीमा येथील दंगलीचा मुद्दा कारणीभूत ठरला होता. मग भिडे यांचे कार्यकर्ते असलेल्या पडळकरांना वंचित तिकीट कशी काय देवू शकते? असा सवाल उपस्थित झाला होता. या वादाची मोठी चर्चा झाली. तरीही पडळकरांना प्रकाश आंबेडकरांना तिकीट दिले होते. पडळकरांचे स्वत:चे संघटन, वंचितची हवा आणि तासगाव आणि कडेगावमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादीने केलेल्या सहकार्यामुळे पडळकरांनी 3 लाखाच्या वर मते घेतली. ही मते प्रकाश आंबेडकरांना अकोला, सोलापूरमध्ये मिळालेल्या मतांपेक्षा जास्त होती. महासचिवपदाची जबाबदारी पडळकरांना वंचित आघाडीच्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक मतदान मिळाल्याने त्यांच्या नेतृत्वाची राज्यात चर्चा झाली. त्यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही पडळकरांचे कौतुक केले होते. दरम्यान वंचित आघाडीच्या कार्यकारणिची रचना झाली. त्यात पडळकरांना महासचिव करण्यात आले. तो निर्णय वंचित आघाडीच्या स्थापनेसाठी प्रमुख भुमिका निभावलेले नेते लक्ष्मण माने यांना आवडला आहे. पडळकर हे आरएसएसशी संबंधित असूनही त्यांना प्रकाश आंबेडकर का महत्वाची पदे आहेत, अशी जाहीर टीका त्यांनी केली. प्रकाश आंबेडकर हे भाजपला सोयीस्कर काम करत असल्याचा आरोप करत लक्ष्मण माने यांनी वंचित आघाडी सोडण्याची घोषणा केली होती. वंचित आघाडीचे दावे या संपुर्ण प्रक्रियेत वंचित आघाडी पडळकरांच्या बाजूने होती. पडळकरांचे वैचारिक परिवर्तन झाल्याचा दावा वंचितच्या प्रवक्त्यांनी केला होता. तर संभाजी भिडे यांची ताकद कमी करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पडळकरांना वंचित आघाडीत घेतल्याचे अण्णाराव पाटील यांनी म्हटले होते. वंचित आघाडी पडळकरांचे ताकदीने समर्थन करत असताना दुसऱ्या बाजूला पडळकरांच्या भाजपसोबत वाटाघाटी सुरू होत्या. शेवटी विधानसभा निवडणुका जाहीर होत असताना पडळकरांनी अधिकृतपणे भाजप प्रवेश केला. त्यावेळी वंचित आघाडीने काही प्रतिक्रया दिलेली नव्हती. पडळकारांचा वंचित आघाडीतील प्रवास चार महिन्याचाच राहिला.पडळकर बारामतीत भाजपकडून उभे राहिले, मात्र त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. उमेदवारीवरून भाजपमध्ये वांदग नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपने गोपीचंद पडळकरांना उमेदवारी दिली. त्यावेळी एकनाथ खडसे, पंकाजा मुंडे या महत्वाच्या नेत्यांना डावलण्यात आले. पडळकरांवरून भाजपमध्ये वादंग माजला. सांगलीतील भाजप नेत्या नीता केळकर यांनी तर या पडळकरांचे कर्तृत्व ते काय, अशी टीका केली. तर मोदींवर टीका करणाऱ्यांना आमदार कसे करता, असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. भाजपमधून पडळकरांना मोठा विरोध झाला असलातरी वंचित आघाडीने स्वागत करण्याची भुमिका घेतली आहे. पडळकर आमदार होवून सांगली जिल्ह्यात आल्यानंतर त्यांच्या सत्कारासाठी वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक गुरव हे तासगावमध्ये हार तुरे घेवून उभे होते. त्यांनी पडळकर यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. डॉ. विवेक गुरव हे पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांचे पुत्र आहेत. प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांची भुमिका सातत्याने भाजपविरोधी राहिली आहे. डॉ. विवेक गुरव यांनी पडळकरांच्या बाबतीत आपली स्वतंत्र भुमिका घेतली आहे. तशी फेसबुक पोस्टही त्यांनी केली आहे.
ता.२७-०५-२०२० कराड प्रतिनिधी : नैसर्गिक साधन संपत्तीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराड तालुक्याला गेल्या काही वर्षापासून गौन खनिज माफियांचे ग्रहण लागले आहे. वाळू, दगड, मुरूम आदी गौन खनिजाची राजरोसपणे कोणत्याही परवानगी शिवाय लूट सुरू आहे. येथील टेंभू प्रकल्पानजीक पोकलॅन्ड व डंपरच्या सहाय्याने उत्खनन सुरू असल्याने सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायीनी ठरलेल्या टेंभू योजनेला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, संबंधित उत्खनन करणाऱ्या माफीयांनी येथील प्रांत व तहसील कार्यालय मॅनेज केल्याची जोरदार चर्चा आहे.कराड तालुक्यातील महसूल विभाग खाबुगिरीने पुरता बरबटून गेला आहे. कृष्णानदी असो वा कोयना अथवा तालुक्यातून वाहणारी कोणतीही नदी असो वाळू व लालमातीचे उत्खनन नित्याचीच बाब बनली आहे. यासाठी ना कोणती परवानगी ना परवाना. महसुली अधिकारी व कर्मचारी मॅनेज केले की झाले. नाममात्र रॉयल्टीभरून प्रशासनाची बोळवण करायची आणि हजारो, लाखो ब्रासचे उत्खनन हा अजंडाच राबवला जात आहे. या बेकायदेशीर उत्खननावर करोना सारखी महामारीसुध्दा मात करू शकली नाही. संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा, संचारबंदी लागू केली आहे. लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात शासकीय कार्यालयात फक्त पाच टक्के कर्मचारी कालांतराने हळूहळू हे प्रमाण वाढवण्यात आले. यादरम्यान फक्त जीवनावश्यक वस्तुंची विक्री व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे आदेश पारित केले गेले. मात्र, या आदेशालाही कोलदांडा दाखवण्याचे धाडस माफियांनी कराड तालुक्यात करून दाखवले आहे. ज्या शासकीय प्रकल्पांना गौनखनिज आवश्यक आहे तसेच त्या प्रकल्पाचे काम सुरू करण्यास शासनाची परवानगी मिळाली आहे आणि त्यासाठी उत्खनन करणाऱ्यांकडे पर्यावरण विभागाची परवानगी आहे. त्यांनाच गरजेनुसार सोशल डिस्टन्सिंग नियम व संचारबंदी आदी सर्व आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटी शर्तीवर राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन काळात परवानगी मिळाली आहे. परंतु, कराड तालुका यासाठी अपवाद ठरला आहे. येथील गौनखनिज उत्खननासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही. संबंधित विभाग व अधिकारी मॅनेज करून राजरोसपणे उत्खनन सुरू आहे. येथील टेंभू प्रकल्पाच्यानजीक मोठ्याप्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. मात्र, गांधारीच्या भुमिकेत असलेल्या कराड महसूल विभागाला हे उत्खनन दिसणार कसे? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. ओंड, तुळसण येथून मागणी, शेरेत उत्खनन लॉकडाऊन काळात ओंड येथे 100 ब्रास व तुळसण येथे 50 ब्रास उत्खननाची परवानगी तहसील कार्यालयाकडे मागण्यात आली आहे. तर कराड-तासगाव या राष्ट्रीय मार्गाच्या भरावासाठी परवानगी घेऊन शेरे, ता. कराड येथून मुरूमाचे उत्खनन सुरू असलल्याची माहिती प्रांत कार्यालयाकडून देण्यात आली. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही गावातून गौन खनिज उत्खननासाठी मागणी अर्ज आला नसल्याचेही सांगल्यात आले. पोकलॅंड व जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन टेंभू प्रकल्पाच्या बोगद्यानजीक गेल्या काही दिवसांपासून पोकलॅन्ड, जेसीबी व डंपरच्या सहाय्याने मुरूमाचे उत्खनन सुरू आहे. या परिसरात जागोजाग मोठ्याप्रमाणावर उत्खनन करण्यात आले आहे. त्यामुळे डोंगरात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. तर अनेक ठिकाणी खड्डयाची खोली व उत्खनन क्षेत्र लक्षात येऊन नये म्हणून विशेष काळजी घेतण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. दिवसरात्र टप्प्या टप्प्याने उत्खनन केले जात असून रस्त्यांने अनेक डंपर गौनखनिजाची वाहतूक करत आहे. मात्र यावर कारवाई होताना दिसत नाही.
ता.२७-०५-२०२० इस्लामपूर प्रतिनिधी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कासेगाव चेक पोस्टवर दोन दिवसापासून अडकून पडलेल्या मुंबई येथील त्या कुटुंबाचे तात्पुरते पालकत्व अखेर इस्लामपूर पोलिसांनी स्विकारले आहे. त्या कुटुंबाला इस्लामपूर येथे आणून त्यांची राहणे व जेवणाची व्यवस्था येथील ' माणुसकीचे नाते ' या ग्रुपने केली आहे. या लोकांना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश मिळेपर्यंत त्यांची सर्व व्यवस्था येथे केली जाईल असे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी सांगितले.मुंबई-वाशी येथील बारा जणांना अवैधरीत्या वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील पोलिस चेक पोस्टवर सोडून जीप चालकाने त्यांच्याकडून २० हजार रुपये घेवून शुक्रवारी मुंबईला पलायन केले होते. पोलिसांनी या लोकांना सांगली जिल्ह्यात प्रवेश न दिल्याने गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील हे कुटुंब पोलिस चेक पोस्टवर थांबून होते.या लोकांकडे कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यासाठी कोणताही परवाना नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात त्यांना प्रवेश मिळत नव्हता तर सातारा पोलिसही त्यांची जबाबदारी स्विकारण्यास तयार नव्हते. त्यामुळ सांगली-सातारा जिल्ह्याच्या सिमेवर कासेगाव येथील चेक पोस्टवर हे १२ लोक शुक्रवारी रात्रीपासून थांबून होते. या १२ जणांच्या कुटुंबात वृध्द महिला व लहान मुलांचाही समावेश आहे. त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था नसल्याने या कुटुंबाचे हाल सुरू होते. दै. 'पुढारी'ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत इस्लामपुरचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी माणुसकीचे नाते या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून या लोकांची इस्लामपूर येथील सदगुरु आश्रम शाळेत राहणे व जेवणाची व्यवस्था केली आहे. शनिवारी रात्री या कुटुंबाला येथे आणण्यात आले. त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवेशावर जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत त्यांची येथेच व्यवस्था करण्यात येणार आहे.
ता.२६-०५-२०२० कडेगाव प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडेगाव शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी ईद निमित्त होणारी नमाज शासनाच्या आदेशानुसार मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरामध्येच अदा केली. त्यांनी कोरोनापासून देशासह संपूर्ण जगाचे रक्षण कर व कोरोना संकट दूर करण्यासाठी प्रार्थना केली. यावेळी तर गळा भेटीला फाटा देत एकमेकांना सोशल डिस्टन्सने शुभेच्छा देण्यात आल्या. परंतु इतिहासात पहिल्यांदाच ईदगाह मैदानावर शांतता पसरली होती.कडेगाव, कडेपूर, शाळगाव, वांगी, अमरापूर, देवराष्ट्रे, चिंचणी, नेर्ली, तडसर आदी गावासह संपूर्ण तालुक्यात रमजान ईद उत्साहाने साजरी होत आहे. येथे सकाळी ७ ते ९ या वेळेत सर्व मुस्लीम बांधवांनी आपापल्या घरीच सोशल डिस्टन्सचे पालन करीत नमाज पठण केली. कोरोना पार्श्वभूमीवर सर्वत्र धार्मिक स्थळे, मस्जिद, ईदगाह मैदान बंद करण्यात आले आहेत. शासनाने जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे या आदेशाचे पालन करीत मुस्लिम बांधवांनी साध्या पद्धतीने घरातच धार्मिक विधी नुसार ईद साजरी केली.दरम्यान कडेगाव शहरासह तालुक्यात पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इतिहासात प्रथमच ईदगाह मैदानात शांतता मुस्लिम धर्मांत पवित्र रमजान महिना व रमजान ईदला अनन्य साधारण महत्व आहे. या ईद निमित्त प्रतिवर्षी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव ईदगाह मैदानात नमाज अदा करतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच इतिहासात येथील ईदगाह मैदानात शांतता पसरली होती.
ता.२६-०५-२०२० विटा प्रतिनिधी : 'स्मशानातील सोनं' ही अण्णा भाऊ साठे यांची प्रसिद्ध कथा आहे. या कथेचा नायक भीमा त्याच्या एका संवादात म्हणतो, 'खरी भूत स्मशानात नाही तर माणसात राहतात'. याची प्रचिती विटा शहरातील एका हातमाग कामगाराला आली. हा कामगार इचलकरंजी येथे काम करत होता.लॉकडाउन झाल्यानंतर काही दिवस कसे बसे त्याने काढले. उपासमार होत असल्याने त्याने गाव जवळ करायचं ठरवलं. पण गावी जायला काही साधन नव्हते. इचलकरंजी येथून रेल्वे च्या ट्रॅक वरून चालत चालत तो किर्लोस्कर वाडीला आला. रात्री तेथे मुक्काम केला. तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला जेवण दिले. रात्र काढल्यावर सकाळ पुन्हा त्याचा प्रवास सुरू झाला. आळसंद या गावातील शाळेत त्याने एक मुक्काम केला. तिथे एका घरातून जेवण मिळाले. यानंतर तो विटा शहरात पोहचला. मात्र, तिथे त्याला नातेवाईकांनी घरात घेण्यास नकार दिला. तो सांगतो'तहसील कार्यालयात सांगितले नगरपरिषद येथे जा. तिथेही त्यावेळी दाद मिळाली नाही, यानंतर मी एक दिवस बाजार समितीतील स्मशानभूमीत झोपलो. दुसऱ्या दिवशी तिथेच झोपलो. तर स्मशानभूमीत येऊन तेथील हमालाने हाकलवून लावले. माणसे जवळ घेत नसल्याने मी दुसऱ्या स्मशानभूमीत जाऊन झोपलो.'' स्वतः च्या घराच्या चार भिंतीत सुरक्षित वाटते. मात्र, घरातून नाकारल्याने या कामगाराला स्मशानभूमी सुरक्षित वाटली.स्मशान भूमीत त्याची हातावर पोट असणारी बहीण त्याला डब्बा पोहचवत राहिली. दुसऱ्या दिवशी या घटनेची चर्चा सुरू झाल्याने तात्काळ त्याला एका शाळेत नेण्यात आले. या नंतर मॅक्स महाराष्ट्र बरोबर बोलताना त्याने शाळेत वीज पंखा पाणी याची सोय नसल्याने तिथेही त्याचे हाल सुरू आहेत असे सांगितले.ज्या कामगारांच्या जीवावर शहरं उभी राहतात. त्या कामगाराला आज शहरं सामावून घेऊ शकत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे.
ता.२५-०५-२०२० कडेगाव प्रतिनिधी : कडेगाव नगरपंचायत झाली आणि पहिलीच निवडणूक अटीतटीची झाली. १७ पैकी १० काँग्रेस तर ७ भाजप, असे बलाबल झाले. नगरपंचायतीत काँग्रेस विरुद्ध भाजप, असा सामना सतत घडत आहे. याचे जाहीर प्रदर्शन अनेकवेळा झाले आहे. आता एका भाजप नगरसेवकाचे पद धोक्यात आले आहे. वारंवार गैरहजर राहणं त्या नगरसेवकाला भोवणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी त्या नगरसेवकाला दि. २७ तारखेपर्यंत खुलासा मागविला आहे.कडेगाव नगरपंचायतीत कदम-देशमुख गटात कलगीतुरा सुरू असतो. राज्यात भाजप सत्तेत असताना, डॉ. पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची सत्ता आली होती. भाजपचे ७ सदस्य आल्याने भाजप प्रथमपासून आक्रमक राहिली आहे. भाजपाचा एक सदस्य नगरपंचायतीच्या मिटींगला सतत गैरहजर राहिला आहे. हा विषय कायद्याच्या चौकटीतून पुढं आला आहे. हा विषय जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात गेला आहे. भाजपचे नगरसेवक कुलदीप दोडके यांना जिल्हाधिकाऱ्यांनी गैरहजर राहिल्याबद्दल नोटीस पाठवली आहे. २७ तारखेपर्यंत खुलासा मागविला आहे. याबाबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे.
ता.२४-०५-२०२० खटाव प्रतिनिधी : लोणी येथील अनिल सदाशिव शिंदे यांनी गावी येण्यासाठी सर्व कायदेशी अटींचे पालन करून आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पनवेलहून 300 किलोमीटरचे अंतर पायी कापून पाच दिवसांत आपले गाव गाठले. गावी आल्यानंतरही त्यांनी स्वःतला शेतामध्ये क्वारंटाईन करुन घेऊन नंतरच गावात प्रवेश केला. प्रशासनाचे सर्व नियम पाळून सहकार्य केल्याबद्दल लोणीकरांनीही त्यांचे कौतुक केले.पनवेल येथे कापडाच्या मिलमध्ये गेली अनेक वर्षे अनिल शिंदे हे काम करत आहेत. लॉकडाउनमुळे अचानक बंद पडलेल्या उद्योग, व्यवसायामुळे खाण्याचे हाल होऊ लागले. हाताला काम नसल्याने त्यांनी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. कायदेशीर अटींची पूर्तता करून गावाकडे जाण्यासाठी मित्र व स्नेहींकडे वाहनाची चौकशी केली. एकट्यासाठी वाहन करणे आवाक्याबाहेर असल्याने त्यांनी शेवटी पायी चालत गाव गाठण्याचा निर्णय घेतला. प्रवासाला निघण्यापूर्वी अंथरूण, पांघरूण, बिस्किटाचे पुडे व मोबाईलची व्यवस्था केली. रस्त्याने रणरणते ऊन, त्याचा बसणारा चटका, वादळी वाऱ्याच्या पावसाचा तडाखा सोसत शेकडो किलोमीटरचे अंतर कापत घराच्या ओढीने त्यांची पावलं पडू लागली. रात्री नऊ वाजता कोणतेही गाव न गाठता रोड डिव्हायडरमध्ये अंथरूण टाकायचे. मोबाईलवरून घरी फोन करून कुठे आलोय, ते सांगायचे व पुन्हा मोबाईल स्विच ऑफ करायचा. झोपण्यापूर्वी फक्त एकच बिस्कीटचा पुडा खायचा. तीन तासांची झोप घ्यायची. बरोबर 12 वाजता उठायचे. वाटेत पेट्रोल पंपावर पाण्याच्या बॉटल भरून घ्यायच्या व पुन्हा प्रवासाला सुरवात करायची, असा त्यांचा नित्यक्रम ठरलेला. या प्रवासात त्यांच्याबरोबर परराज्यातील कामगारांचा तांडा होताच. मजल-दरमजल करत पाचव्या दिवशी खटाव तालुक्याची हद्द येताच घरी, ग्रामपंचायत, पोलिस पाटलांना फोन करून रितसर माहिती देऊन स्वतःला 14 दिवस शेतात क्वारंटाइन करून घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याप्रमाणे सर्व सोपस्कार पार पाडून मगच त्यांनी गावात प्रवेश केला. सर्व नियमांचे काटेकोर पालन केल्याबद्दल ग्रामपंचायतीने त्यांचे अभिनंदन केले. सर्वांच्यासाठी त्यांनी आपल्या कृतीने आदर्श घालून दिल्याबद्दल लोणीसहित पंचक्रोशीतून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. अनिल शिंदे यांनी आपल्या कृतीद्वारे गावाला व प्रशासनाला सहकार्य केले. त्यांनी केवळ लोणी गावालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना कोरोनाच्या काळात कसे सहकार्य करावे, याचा आदर्श घालून दिला आहे. - महेश देवकर, पोलिस पाटील, लोणी
ता.२४-०५-२०२० आटपाडी प्रतिनिधी : कोरोनाच्या टाळेबंदीत सवलत मिळताच पुण्या-मुंबईसह परराज्यातून शेकडो मुलनिवासी आता गावाकडे परततत आहे. मात्र गावात आल्यानंतर गावकीतील जुन्या वादांना फोडणी मिळत आहे. अलगीकरण कक्षात राहण्यावरून गावकारभाऱ्यांशी त्यांचे वाद होत असून हे वाद मिटवणे हा पोलिसांसाठी नवाच उद्योग झाला आहे. आटपाडी तालुक्यातील हजारो जण नोकरी, उद्योग-व्यवसाय निमित्त पुणे, मुंबई शहरात आणि देशभर गेले आहेत. कायद्याने आला की क्वारंटाईन आणि तसाच आला तर मोकाट अशी तक्रार अनेकांची आहे. मात्र विनापरवाना आलेले आटपाडी गाव आणि परिसरात मोकाट फिरत आहेत. त्यांना होम क्वारंटाईन करावे यासाठी गावागावात ग्रामपंचायत, दक्षता समिती आणि बाहेरून आलेल्या लोकांत प्रचंड टोकाचे वाद आणि संघर्ष होऊ लागले आहेत. ग्रामपंचायत आणि दक्षता समितीना पोलीस- प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे तीव्र नाराजी पसरली आहे. सध्या तालुक्यात 1107 जणांना होम क्वारंटाईन केले आहे. अनेकांच्या हातावर शिक्के मारूनही ही मंडळी बाहेर फिरत आहेत. ग्रामपंचायत आणि दक्षता समितीच्या आवाहानला ते प्रतिसाद देत नाहीत. यावरून अनेक गावात प्रचंड टोकाचे वाद आणि संघर्ष सुरु आहेत. अनेक ठिकाणी संबंधित व्यक्ती, स्थानिक राजकारण आदीवरून त्याला क्वारंटाईन करणे आणि त्यात सवलत देणे असे प्रकार सुरु आहे. या प्रकाराला राजकीय वळण लागले आहे. पळसखेल आणि देशमुखवाडी गावात यावरून प्रचंड वाद झाला आहे. अनेक ग्रामपंचायतीने प्रशासनाला संबंधित लोकांची माहिती कळवली आहे तरीही त्याची दखल घेतलेली नाही. पळसखेल ग्रामपंचायत आणि दक्षता समितीने यासंदर्भात बाहेरून आलेल्या लोकांची माहिती महसूल प्रशासनाला लेखी दिली. महसूल विभागाने ही पोलिसांना यासंदर्भात गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले. मात्र त्याची अंमलबजावणीस टाळाटाळ सुरु आहे. गावागावात बाहेरून आलेली मंडळी आणि मूळची गावातील मंडळी यांच्यात टोकाचा संघर्ष सुरु आहे.
ता.२२-०५-२०२० विटा प्रतिनिधी: लाल व काळा मसाला करण्यासाठी लागणाऱ्या लाल मिरचीचे भाव कोरोनामुळे दुप्पट झाले आहेत, तर दुसरकीडे हिरवी मिरची मात्र शेतकऱ्याला पंधरा ते चाळीस रुपये प्रतिकिलो दराने विक्री करावी लागत आहे. यामुळे दलाल व व्यापारी तुपाशी असताना शेतकरी मात्र उपाशीच, अशी स्थिती मिरची उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. जाड मिरचीला अत्यल्प भाव सध्या हिरवी मिरची काढण्याची कामे जोरात सुरू आहेत. मात्र कोरोनाच्या भीतीपोटी गार्डी, घानवड, कुर्ली,पारे,साळशिंगे,लेंगरे येथे मिरची विकायला जाता येत नसल्याने नाइलाजास्तव कमी भावात व्यापाऱ्यांना ती विकण्याची वेळ आली आहे. कोरोनामुळे शेतकरी बाहेरगावी शेतमाल विकण्यास घाबरत असल्याने त्याचा फायदा दलाल व व्यापारी घेत आहेत. दर वर्षी या दिवसात मिरचीला 50 ते 100 रुपये किलो असा भाव हमखास मिळतो. परंतु यंदा कोरोनामुळे बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने हिरवी मिरची प्रकारानुसार 15 ते 40 रुपये किलो या दराने विकावी लागत आहे, तर जाड मिरचीला अत्यल्प भाव असल्याने काही शेतकऱ्यांनी तोडणी अर्ध्यावर बंद केली आहे. शेतकरी मात्र उपाशीच झाडावरच मिरच्या पिकून लाल होऊ लागल्याने काही शेतकऱ्यांनी लाल मिरची तयार करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र त्यासाठी मेहनत व मजुरी वाढत आहे. शेतकऱ्यांकडील मिरचीची अशी अवस्था असताना मसाला व लोणचे तयार करण्यासाठी दुकानांमध्ये वाळलेली लाल मिरची 200 ते 300 रुपये प्रतिकिलो विकली जात आहे. यामुळे दलाल व व्यापारी तुपाशी असताना शेतकरी मात्र उपाशीच, अशी स्थिती मिरची उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. भरउन्हात कष्ट करत मिरची पिकवली; परंतु आता मिरची विकावी कशी व कुठे, असा प्रश्न आहे. व्यापारी बांधावर खरेदी करताना कमी भावाने खरेदी करतात आणि याउलट दुकानात लाल मिरची घेताना चढ्या भावाने खरेदी करावी लागत आहे. मिरची उत्पादक शेतकरी
ता.२०-०५-२०२० मायणी प्रतिनिधी : खटाव तालुक्यातील मायणी येथे अकोला येथून आलेल्या दाम्पत्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मायणी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मायणीत करोनाबाधित रुग्ण सापडल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली असून प्रशासनाकडून संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्यात आली आहे.वैद्यकीय अधिकारी डॉ. तुरुकमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार मायणीतील एका मळ्यातील 55 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला हे दोघे पती-पत्नी व मुलगा अकोला येथून प्रवास करुन 10 मे रोजी मायणीत दाखल झाले होते. त्याच दिवशी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन तपासणी केली. त्यावेळी कोणताही त्रास नसल्याने त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले.त्यानंतर त्यापैकी पतीला 13 मे रोजी ताप आल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. त्यावेळेला त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी आराम करावयास सांगितले. पुन्हा ते 17 मे रोजी ताप आल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले, त्यावेळी मात्र त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यांच्या मुलालाही स्त्राव घेण्यासाठी बोलावण्यात आले. दरम्यानच्या काळात संबंधिताने 12 मे रोजी येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेतले होते. 17 मे रोजी दुपारी त्यांचे स्त्राव घेण्यात आले. 18 मे रोजी रात्री उशिरा या दाम्पत्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तर मुलाचा रिपोर्ट प्रलंबित आहे, अशी माहिती डॉ. तुरूकमाने यांनी दिली.पॉझिटिव्ह रुग्णाने उपचार घेतलेल्या खासगी रुग्णालयांमधील डॉक्टर व त्यांच्या स्टाफला इन्स्टिट्यूट क्वारंटाइन करण्यात आले असून रुग्णांच्या निकटवर्तीयांनासुद्धा इन्स्टिट्यूट क्वारंटाइन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी डॉक्टरांनी दिली. तसेच संबंधित रुग्ण काही ठिकाणी फिरला असल्याची चर्चा असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहितीसुद्धा घेण्यात येत आहे. मायणीसह परिसरात एकच खळबळ माजली असून गावच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. गावात आरोग्य, महसूल, पोलिस पथक दाखल झाले आहे. मायणी व परिसरातील लोकांनी येत्या काही दिवस घरीच राहून स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ता.२०-०५-२०२० देवराष्ट्रे प्रतिनिधी : "कोरोना' चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. सर्व व्यावसायिक लॉक झाले आहेत. लग्न सोहळ्यांचे कार्यक्रमही रद्द झालेत. केटरिंग व्यवसायावरही संकट आले. पण मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव) येथील केटरिंग व्यावसायिक अनिल निकम यांनी संचारबंदीतही संधी शोधली.संकट कधी आपला नाश करू शकत नाही. डोके वापरले तर विकासाचा मार्ग खुला होतो, अस त्यांचं मत आहे. आडरानात राहणारा अनिल रोज व्हाट्सऍपच्या माध्यमातून तेरा हजारांचा माल विकत आहे. सोशल मीडियावर तासनतास वाया घालवणाऱ्या तरुण पिढीला त्याची धडपड आदर्श घालून देणारी आहे. यावर्षी लग्न सोहळ्यांचे मुहूर्त जास्त होते.हंगाम चांगला जाणार, कमाई चांगली होणार अशी आशा होती. पण "कोरोना' चा प्रादुर्भाव वाढला आणि जगच थांबले. संचारबंदी जाहीर झाली. लग्नसोहळे रद्द करण्यात आले. पुणे, मुंबईसह परराज्यातून अनेकजण मायभूमीत येऊ लागले. नागरिकांनी गावांच्या सीमा बंद केल्या. परिसरात फिरणे अवघड झाले. या परिस्थितीत न डगमगता बंदीतही संधी कशी मिळेल, आपला व्यवसाय चालेल याकडे अनिल यांनी लक्ष दिले. घरातच काम सुरु केले. पदार्थ पार्सल स्वरुपात मिळतील, अशी जाहिरात व्हाट्सऍपच्या माध्यमातून सर्वत्र पसरवली. गावासह परिसरात मुंबई, पुणे इतर नागरिक मायभूमीत परतलेत. हॉटेल बंद असल्याने खवैय्यांना चविष्ट पदार्थ तो देत आहे. खवैय्यांसाठी मेजवानी रोज 50 किलो मोतीचूर लाडू, 25 किलो जिलेबी, 200वडापाव, 10 किलो भडंग, 9 किलो गुलाबजामुन, 7 किलो बालुशाही अशी रोज विक्री होते. त्यातून प्रतिदिन तेरा हजार सातशे पन्नास रुपयांचा व्यवसाय होत आहे.
ता.२०-०५-२०२० विटा प्रतिनिधी : कोरोनाच्या संकटामुळे आपल्या गावी परतल्याचे समाधान मिळालेल्या हजारो कामगारांना आपल्या भविष्याची चिंता लागुन राहिली आहे. तसेच परिस्थिती लवकर पुर्वपदावर आली नाही तर पुढे काय असा प्रश्न विटा, खानापूर, लेंगरे, भाळवणी, साळशिंगे,रेवणगाव,रेणावी, पारेआदी भागातील कामगारांना पडला आहे. सध्या पुणे, मुंबई व इतर भागातुन आलेले नागरीक शेती कामात आपल्या कुटुंबाला हातभार लावीत आहे. परंतु कोरोनाचे संकट असेच राहिले तर येणारा काळ कामगारांसाठी अवघड ठरणार आहे. विटा, खानापूर, लेंगरे, भाळवणी, साळशिंगे,रेवणगाव,रेणावी,पारे भागातील अनेक युवक मोठ्या संख्येने पुण्याला नोकरीला आहे. तर काहीजण व्यवसाय व इतर कामांसाठी पुण्याला असतात. यापैकी अनेक कामगार लॉकडाऊन जाहीर होण्यापुर्वी आपल्या गावी परत आले आहेत. तर काही कामगार लॉकडाऊन शिथील केल्यानंतर आपल्या गावी परतत आहेत. मात्र पुणे आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्रात अधिक प्रमाणात सुट देण्यात आलेली नाही. त्यामुळे कामगारांची चिंता वाढत असुन सर्व व्यवहार सुरळीत झाले तरी येणाऱ्या काळात परत जाण्याची लवकर परवानगी मिळणार का याबाबतही कामगारांमध्ये सांक्षकता असुन गावी येऊन पोहचल्याचे समाधान असले तरी येणारा काळ पुणे, मुंबई व इतर ठिकाणी कामास असलेल्या कामगारांना त्रासदायक ठरणार आहे. पुणे व इतर भागातुन आलेल्या कामगारांसमोर प्रश्न लॉकडाऊनमुळे आपल्या गावी परतलेल्या अनेक कामगारांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असुन दररोज कामाची सवय असलेल्या कामगारांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. अनेकजण पुणे व इतर भागात वास्तव्यास आहेत त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही अनेक कामगारांसमोर उभा ठाकला आहे त्यामुळे कोरोनाचे संकट लवकर दुर व्हावे अशीच अपेक्षा प्रत्येक कामगार करु लागला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस पुण्यावरुन गावाकडे आलो आहे. तेंव्हापासुन वडीलांना शेती कामात मदत करीत आहे. मात्र कोरोनाचे संकट लवकर दुर होणे आवश्यक आहे. अन्यथा सर्वांनाच मोठा फटका बसणार आहे. गावाकडे परतलेल्या कामगारांसाठी सरकारने मदतीचा हात पुढे करणे आवश्क आहे. -एक ग्रामस्थ
ता.१९-०५-२०२० वडूज प्रतिनिधी : खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील नेर धरणामधील पाणी येरळा नदीत सोडल्याने बंधारे भरून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे पैसे भरले; परंतु हे पाणी भुरकवडी, कुरोली भागात पोहोचण्यापूर्वीच बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. दरम्यान, धरणाच्या पाण्यावर ओलिताखाली येणाऱ्या भागातील सर्वांचा हक्क आहे. मग, कोणाच्या दबावाखाली पाणी बंद करण्यात आले, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून पाणी द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने नेर धरण पूर्ण भरले होते. धरणातील पाणी रब्बी हंगामासाठी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाने प्रयत्न केले होते. शेतकऱ्यांचे अपेक्षित पाणी मागणी अर्ज आले नव्हते, तरी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाणी उपलब्ध करून दिले होते. एप्रिल-मेमधील पाणीटंचाई लक्षात घेऊन खटाव, कुरोली, भुरकवडी परिसरातील शेतकऱ्यांनी पैसे भरून येळा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यांनी पैसे भरल्यावर नदीत पाणी सोडण्यात आले. खटाव, भुरकवडी, कुरोली परिसरात पाणी पोहोचले, पण बंधारे भरण्यापूर्वी पाणी अचानक बंद करण्यात आले. धरणात पुरेसा पाणीसाठा नाही, धरण परिसरातील शेतकऱ्यांसाठी पाणी ठेवावे लागणार असल्याची कारणे पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना काही रक्कम परत करण्यात आली. पैसे नको, पाणी द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी करूनही दुर्लक्ष करण्यात आले. सहाशे हेक्टर लाभक्षेत्र असलेल्या नेरचे पाणी शेवटच्या टोकावरील अनेक गावांना कधीच मिळत नाही. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही, अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
ता.१८-०५-२०२० आटपाडी प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील पारेकरवाडी येथे ग्रामपंचायतीने गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी "खिंडार मुक्त गाव' अभियान राबवले. तीन दिवसांत गावातील 45 वर पडकी घरे आणि चिलार काढून जागा स्वच्छ केल्या. या खिंडार मुक्त अभियानला आटपाडी पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन कौतुक केले.पारेकरवाडी आटपाडी तालुक्यतील छोटेसे गाव. इतर गावांप्रमाणेच येथेही जागोजागी मोकळ्या जागा, चिलारीची झाडे वाढली होती. अनेक जुनी घरेही पडलेल्या अवस्थेत होती. या जागांचा वापर केला जात नव्हता. या जागा म्हणजे कचरा टाकण्याचे उकीडडे बनले होते. सरपंच नारायण हांडे, ग्रामसेवक अभिजीत माने आणि ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येऊन गाव स्वच्छ आणि सुंदर करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात खिंडार मुक्त गाव अभियान तीन दिवस राबवले.जेसीबीच्या साह्याने 45 पडकी घरे आणि जागोजागी असलेली चिलारीची झाडे काढली. 19 हजार 500 रुपये खर्च आला. प्रत्येक पडक्या घरासाठी सरासरी 450 रुपये एवढा खर्च आला. सारा खर्च ग्रामपंचायतीने केला. गावचे रूपडे बदलून गेले आहे. पडकी घरे आणि चिलार काढल्यामुळे अनेक ठिकाणी स्वच्छ मैदान तयार झालेय. या अभियानला पंचायत समितीच्या सभापती भूमिका बेरगळ, जिल्हा परिषदेचे समाज कल्याणचे माजी सभापती ब्रह्मदेव पडळकर आणि गटविकास अधिकारी मधुकर देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली. अभियानचे साऱ्यांनीच कौतुक करून तालुक्यातील अन्य गावांनीही पारेकरवाडीचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले आहे.
ता.१७-०५-२०२० झरे प्रतिनिधी- आटपाडी तालुक्यातील रुग्णांना खाजगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या बद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवून त्यांना बदनाम करण्याचा काही समाजकंटकांचा प्रयत्न सुरू आहे. पुढील काळामध्ये असा प्रकार घडल्यास किंवा ज्यांनी अफवा पसरविली आहे, तो व्यक्ती सापडल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल येईल, असे तहसीलदार सचिन लंगुटे म्हणाले. याबाबत सविस्तर माहिती अशी, विरळी (ता. माण) येथील पंचवीस वर्षाचा तरुण पॉझिटिव्ह सापडल्याने सर्व परिसर हादरून गेला होता. त्याचा संपर्क झरे परिसरामध्ये आला आहे, अशी चर्चा सुरू होती आणि त्या पंचवीस वर्षाच्या तरुणांचा काही डॉक्टरांशी संपर्क आलेला आहे. त्या डॉक्टरला क्वरंनटाईन केले आहे, अशी अफवा पसरवली जात असून खाजगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर खाजगी डॉक्टर स्वतःच्या जबाबदारीवर रुग्णांना सेवा देतात आणि त्यामध्ये अशी खोटी अफवा पसरवून डॉक्टरांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. अशा खोट्या अफवा पसरून डॉक्टरांना बदनाम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत. त्यामुळे विनाकारण बदनामी करू नये, असे लंगुटे यांनी आवाहन केले आहे.विरळी येथील तरुण पॉझिटिव्ह आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच झरे येथील काही नागरिक मुंबई वरून आले होते. ते नागरिक क्वरानटाईन होण्यास विरोध करत होते. शिवाय ते दवाखाना व मेडिकलच्या आसपास राहत होते. त्यामुळे काही काळ मेडिकल व दवाखाने बंद ठेवले होते. त्या अनुषंगाने डॉक्टरांचा पॉझिटिव्ह तरुणांशी संपर्क आला आहे, त्यांना तपासण्यासाठी सांगलीला हलवण्यात आले आहे, अशा आशयाच्या अफवा पसरविल्या जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोरोणाच्या पार्श्वभूमीवरत सर्व दवाखाने बंद ठेवले होते. सर्व डॉक्टरांना ग्रामपंचायत, तहसीलदार व नागरिकांनी ऋग्णसेवा चालू ठेवण्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी दवाखाने उघडून रुग्णांची सेवा सुरू ठेवली आहे. रुग्ण सेवा देत असताना अशा अफवांना सर्व डॉक्टरांना सामोरे जावे लागत आहे. डॉक्टरांना विनाकारण बदनाम करणारा सापडल्यास त्याच्यावरत दंडात्मक कारवाई करणार आहे. - सचिन लंगोटे, तहसीलदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व डॉक्टरांनी दवाखाने बंद केले होते. त्यांना सांगून दवाखाने सुरू करण्यास सांगितले. सर्व डॉक्टर रुग्णांना सेवा व्यवस्थित देतात. काहीतरी अफवा पसरून डॉक्टरांना बदनाम करत आहेत. हे समाजकंटकांनी थांबवावे. - ब्रह्मानंद पडळकर, माजी समाजकल्याण सभापती व जिल्हा परिषद सदस्य
ता.१७-०५-२०२०कडेगाव प्रतिनिधी : मूळ चिंचणी येथील व सध्या मुंबईतील शाहूनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या 32 वर्षीय सहायक पोलिस निरीक्षकाचा कोरोनाने शनिवारी पहाटे मृत्यू झाला. या पोलिस अधिकार्याचे मूळ गाव चिंचणी (ता. कडेगाव) आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचे वडील नोकरीनिमित्त शिराळा येथे गेल्याने त्यांचे कुटुंब सध्या तेथेच वास्तव्यास आहे.मागील अनेक दिवसांपासून या पोलिस अधिकार्यास ताप, सर्दी आणि खोकला येत होता. त्यामुळे त्यांनी दि. 13 मे रोजी कोरोनाची तपासणी केली होती. तपासणीत त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दि. 16 मे रोजी ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणार होते. परंतु, शनिवारी पहाटे ते घराच्या बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.धारावीतील शाहूनगर पोलिस ठाण्याचा परिसर हा कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात आहे; मात्र अशा परिस्थितीतही ते 24 तास नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. चिंचणी येथे त्यांनी नवीन घराचे बांधकाम सुरू केले आहे; मात्र घरकूल पूर्ण होण्याआधीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
-
ता.१६-०५-२०२० विटा प्रतिनिधी : पडळकर वाडी ! जेमतेम सहाशे लोकसंख्येचे गाव. या गावात कुणी साध पंचायत समितीचे सदस्य होण्याचे स्वप्न पाहिले तर तो वेड्यात निघेल अशी परीस्थिती. धनगर समाजाची १८१ कुटुंबे असणारे गाव उन्हाळ्यात ओस पडलेले असायचे. मेंढपाळ उन्हाळ्यात मेंढ्या चारण्यासाठी स्थलांतरीत व्हायचे. अशा गावातील गोपीचंद पडळकर या ध्येय वेड्या तरुणाने आमदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. ज्या राजकीय परंपरेत आमदाराचा पोरगाच आमदार होतो. खासदारांचा पोरगाच खासदार होतो. त्यांच्याच घरात पाळण्यातील युवा नेतृत्व जन्म घेते. राहिलेले मार्केट कमिटीचे चेअरमन होतात. त्यांचेच कारखाने निघतात. मतदार संघातील सत्तेचा सुर्य ज्यांच्या वाड्यातून उगवतो. त्या प्रस्थापित राजकीय वाड्यातील सत्ता केंद्रालाच सुरुंग लावण्याचे काम या तरुणाने केलं. प्रस्थापितांच्या समोर कुणी खोकलं की त्यांना ठोकल अशा परिस्थितीत गाव गाड्यातील बारा बलुतेदार जातींचे संघटन त्यांनी केले. सरंजामी राजकीय क्षेत्रात गोपीचंद पडळकर या तरुणाने आपली सामाजिक राजकीय कारकीर्द सुरू केली. 'माझा जन्म आमदार खासदार होण्यासाठीच झाला आहे' अशा आत्मविश्वासाने हा तरुण कामाला लागला. आणि आज विधानपरिषदेचे ते आमदार झाले. या बाबत त्यांच्या आई हिराबाई पडळकर यांची प्रतिक्रिया मॅक्स महाराष्ट्राने घेतली. त्या या प्रसंगी अतिशय भावनिक झाल्या आणि म्हणाल्या. 'माझा गोपा आमदार झाला. दोन पोरं भायर गेली की, माझ्या जीवाची धाकधूक असायची. कोण काय करलं मारून टाकलं? अशी भीती वाटायची. मी ठरीवल होतं गोपाला डाक्टर करायचं. पण दोन मारकान त्यो हुकला पूना राजकारणात हुकला. हे बघायला त्याचे वडील असायला पाहिजे होते.दुसऱ्याच्या वळचणीला असणाऱ्या समाजातून एक सभापती तर दुसरा आमदार झाला. ह्या गुष्टीचा आमा सगळ्यांना आनंद आहे'. गोपीचंद पडळकर यांच्या गावी येण्याची वाट भागातील लोक पाहत आहेत. झरे येथील खंडोबा मंदिरात पूर्ण गावाला वाटण्यासाठी ट्रॉली भरून लाडू बनवले आहेत. परिसरातील लोक या नेत्याचे गुढ्या उभारुन स्वागत करणार आहेत. उठसूट पुरोगामी पणाचा टेंभा मिरवणाऱ्या राजकीय पक्षांनी राजकीय घराणी पोसण्यापलीकडे बहुजनातील अशा तरुणांना राजकीय स्पेस निर्माण करून देण्याऐवजी त्याच्या स्वप्नांचे पंख कापण्याचेच काम केले. त्यांनी जी राजकीय घरानी पोसली. त्यांनी या पक्षातून त्या पक्षात जाताना निष्ठा विकल्या. तर त्यांना राजकीय करीयर असं गोंडस नाव दिलं जातं. मात्र, घराणेशाहीच्या राजकारणात टिकण्यासाठी पडळकर यांच्यासारख्या लोकांनी वेगळा पर्याय निवडला असता त्यांच्यावर प्रतिगामी पणाचा शिक्का मारायालाही हीच मंडळी पुढे असल्याचे दिसते. राजकीय नेतृत्वापासून पडळकर यांना दूर ठेवण्यासाठी काही नेत्यांनी शेवटच्या रात्रीपर्यंत प्रयत्न केल्याचे त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर सांगतात. या सगळ्या राजकीय डावपेचात सरंजामी नेत्यांना चितपट करत गोपीचंद पडळकर आमदार होत आहेत. या संबंधी मॅक्स महाराष्ट्र सोबत बोलताना त्यांनी मला मिळालेल्या संधीचे सोने करेन अशी प्रतिक्रिया दिली. संघर्षातून आटपाडी तालुक्याच्या मुरमाड खडकात उगवलेल्या या राजकीय नेतृत्वाकडून लोकांना अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्यात ते कितपत यशस्वी होतील हे येत्या काळात कळेल.
ता.१५-०५-२०२० मायणी प्रतिनिधी : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने देशात लॉकडाऊन करत सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आदेश दिले. मात्र मायणीत ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंग न पाळता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून नियमांचे उल्लंघन होत आहे. राज्यात लॉकडाऊनचा सध्या तिसरा टप्पा सुरू आहे. मात्र जनता दक्षता न बाळगता घराबाहेर पडत आहे, दुकाने व व्यवसाय सुरू आहेत, चांदणी चौकापासून ते गावातील मुख्य बाजारपेठेपर्यंत लॉकडाऊनचा फज्जा उडाला आहे. तर ग्रामपंचायतीने भाजी विक्रेत्यांना येथील खंडोबा माळावर बसण्यासाठी परवानगी दिली असली तरी तेथे मात्र जत्रेचे स्वरूप आले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसमोर सामाजिक अंतर पाळले जात नाही. मायणी मुख्य बाजारपेठ असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे, मायणी ग्रामपंचायतीने व पोलिसांनी आता खऱ्या अर्थाने ठोस निर्णय घेऊन अधिक कडक कारवाई करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या सकाळी नऊ ते दोन या वेळेपर्यंत प्रामुख्याने दुकाने चालू ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे.सध्या खटाव व माण तालुक्यात खरशिंगे व विरळी या ठिकाणी करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. सरकारने लॉकडाऊन शिथिल केल्याने मायणीत प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, महसूल विभाग यांनी सुस्कारा सोडला असला तरी खरेदीच्या निमित्ताने लोक घराबाहेर पडून प्रामुख्याने चांदणी चौक, मुख्य बाजारपेठ, खंडोबा माळ येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत.
ता.१५-०५-२०२० औंध प्रतिनिधी : जिल्ह्यात आतापर्यंत ग्रीन झोन राहिलेल्या खटाव तालुक्यात अखेर करोनाने शिरकाव केला असून खरशिंगे (ता. खटाव) येथील एका 20 वर्षाच्या युवकाचा करोना अहवाल पॉंझिटिव्ह आल्याने औंधसह पळशी, पुसेसावळी परिसरात खळबळ उडाली. त्यामुळे ठाण्यातून खरशिंगे असा प्रवास करत खटाव तालुक्यात करोनाने शिरकाव केला आहे.बाधित रुग्ण आपल्या आईवडीलांसह ठाणे येथून दुचाकीवरून गावाकडे खरशिंगे येथे प्रशासनाला चकवा देऊन आले होते. त्यानंतर त्या कुटुंबाला गावानजीकच असणाऱ्या त्यांच्या घरात होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. काल या कुटुंबातील वडीलांना थोडा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी दुचाकीवरून सातारा गाठले होते.सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून कुटुंबातील तिघांचे स्त्राव घेण्यात आले होते. मात्र, त्रास होणाऱ्या व्यक्तिचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला. तर त्यांच्या संपर्कातील 21 वर्षीय मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या घटनेमुळे औंध, पळशी, पुसेसावळी खरशिंगेसह परिसर हादरून गेला आहे. संबंधित कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या 24 जणांना प्रशासनाने क्वारंटाइनमध्ये ठेवले आहे. युवक पॉझिटिव्ह सापडल्यानंतर खरशिंगे गाव सील करण्यात आले आहे. सध्या खरशिंगे येथे प्रशासनाने प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. तसेच बाधित रुग्णाचे घर, प्राथमिक शाळा, गावात निर्जंतुकीकरण फवारणी सुरू करण्यात आली आहे. प्रशासन खरशिंगे येथे तळ ठोकून आहे.
ता.१५-०५-२०२० कडेगाव प्रतिनिधी : लग्नाचा बार जोरदार उडवून द्यायचा, असे दोन्हीकडचे ठरले होते, पण कोरोना आडवा आला. लग्न लांबवायचे तर किती? मग ठरले, मोजक्या लोकांना घ्यायचे आणि लग्न उरकून टाकायचे. या मोजक्या पाहुण्यांत मग कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम हे आवर्जून आले आणि दहा-पंधरा लोकांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा खास ठरला चिंचणी (ता. कडेगाव) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर व सोशल डिस्टनसिंगचे पालन करीत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांचा लग्न सोहळा शेतामध्ये पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी फक्त दहा लोकांची उपस्थिती होती . चिंचणी येथील अजय पाटील आणि कमळापूर (ता.खानापूर) येथील भाग्यश्री गायकवाड यांचा विवाह लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसापासून लांबला होता. लग्न सोहळा धुमधडाक्यात करण्याची दोघांच्याही कुटुंबियांची इच्छा होती. काही दिवसांपूर्वी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम व युवा नेते डॉ. जितेश कदम यांचेशी अजयचे याबाबत बोलणे झाले. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी गुरुवारी, 14 मे रोजी दुपारी अजयच्या चिंचणी येथील शेतामध्ये लग्न घेण्याचा विचार मांडला. त्याला दोन्ही कुटुंबीयांनी होकार दिला. केवळ दहा लोकांच्या उपस्थितीत विवाह करण्याची परवानगी घेण्यात आली. त्याप्रमाणे वधूकडील पाच आणि वराकडील पाच अशा एकूण केवळ दहा लोकांच्या उपस्थित शेतामध्ये विवाह संपन्न झाला.यावेळी कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम व डॉ. जितेश कदम यांनी उपस्थित राहून वधू-वरास शुभेच्छा दिल्या. यावेळी सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्यात आले. या लग्नाला नवदाम्पत्यासहत्यांचे आई वडील व भटजी यांचेसह प्रमुख नातेवाईक उपस्थित होते. लग्न समारंभासाठी होणारा मोठा खर्चटाळून या पैशातून गावातील गोरगरीब मजुरांना जीवनावश्यक वस्तूंची किट घरोघरी पोहोचकरण्यात आल्याचे वर अजय याने सांगितले. या विधायक उपक्रमाचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.
ता.१४-०५-२०२० विटा प्रतिनिधी : विटा शहरातील भाळवणी रस्त्याजवळ अनधिकृत पाच इमारतींची कामे आढळून आल्याप्रकरणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याचे वडिल सुभाष शंकरराव पाटील ( रा. भाळवणी रोड, विटा ) यांच्याविरूद्ध विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पालिकेचे रचना सहायक महेश सुरेश गायकवाड यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पाटील यांचे सर्व्हे नं. 198 मध्ये बांधकाम सुरू आहे. त्याचा परवाना त्यांनी घेतला नाही. त्यामुळे मुख्याधिका-यांनी त्यांना अनाधिकृत बांधकाम काढून जमीन पुर्ववत करण्याची नोटीस दिली होती. पाटील यांनी त्यांचे म्हणणे पालिकेला दिले नाही व बांधकामही काढले नाही.त्यामुळे त्यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ता.१४-०५-२०२० विटा प्रतिनिधी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू केली आहे. जमाव रोखण्यासाठी पोलिस रात्रंदिवस झटत आहेत. असे असतानाही खेड्यात मात्र याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. खेड्यात रस्त्यावर फिरू देत नाहीत म्हणून शेतात, झाडाखाली, स्मशानभूमीत निवांत ठिकाणी 20-25 जण एकत्र येऊन जुगार खेळत आहेत. टाइमपासच्या नावाखाली जुगार खेळाने मोठा जोर धरला आहे. यात पुणे, मुंबईहून आलेल्यांची संख्या जास्त असल्याने संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. खानापूर तालुक्यातील रेवानगर,सुर्यनगर,गांधीनगर,विटा,गार्डी,घानवड,नागेवाडी, लेंगरे, साळशिंगे,माहुली,पारे, कार्वे परिसरात आपला गावच बरा म्हणत पुणे, मुंबईहून प्रत्येक गावात 100 ते 200 नागरिक आले आहेत. एवढ्यावर न थांबता सकाळी 10 वाजता आपले जेवण आटपून गावाशेजारील शेतात जाऊन 20-25 जण एकत्र जमत आहेत व जुगार खेळत आहेत. काहीजण तर चक्क स्मशानभूमीतच जावून जुगार खेळत आहेत. जमावबंदी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने संचारबंदीसोबतच प्रत्येक गावात आपत्ती व्यवस्थापन समितीची नेमणूक केली आहे. तरी देखील प्रत्येक गावात चार ते पाच ठिकाणी 20 ते 25 जण एकत्र जमून जुगार खेळत आहेत. आपत्ती व्यवस्थापन समिती या बाबींवर सहजासहजी आळा घालू शकते. टाइमपासच्या नावाखाली एकत्र येणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान, जुगाराबरोबरच अनेक ठिकाणी व्यसनही केले जात आहे. नियमबाह्य वागणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
ता.१३-०५-२०२० विटा प्रतिनिधी : तब्बल आठवडा उलटून गेला तरी विट्याचे तहसीलदार ऋषीकेत शेळके यांना मारहाण करणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यास अटक न केल्याच्या निषेधार्थ महसूल कर्मचाऱ्यांनी आजपासून विटा तहसील कार्यालयात बेमुदत बंद आंदोलन सुरू केले आहे.वाळूच्या पकडलेल्या वाहनांचा दंड रद्द करण्याच्या कारणावरून विटा (जि. सांगली) येथील तहसीलदार ऋषीकेत शेळके यांना डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि त्याच्या सोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने तहसील कार्यालयाच्या आवारात गाडीतून ओढून मारहाण केली होती. ही घटना मागच्या रविवारी , ३ मे रोजी घडली. याबाबत तहसीलदार शेळके यांनी रीतसर विटा पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.मात्र मारहाणीच्या प्रकरणानंतर पैलवान पाटील फरारी असल्याचे सांगण्यात येत आहे.या प्रकरणात समाज माध्यमातून पैलवान चंद्रहार पाटील याची उघडपणे बाजू घेणाऱ्या आणि महसूल विभागालाच दोषी ठरवणाऱ्या पोस्ट्स टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर मात्र महसूल कर्मचारी संघटना आक्रमक बनली. ६ मे रोजी या संघटनेने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन देऊन सुरुवातीला तीन दिवस काळ्या फिती लावून काम केले. तसेच तीन दिवसांत कारवाई न झाल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. पण, आजअखेर पैलवान पाटील विरोधात कोणतीही कारवाई न झाल्याने आजपासून तहसील कार्यालयात कामबंद आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे आज कार्यालयाला चक्क टाळेच ठोकले होते तसेच कोणताही कर्मचारी कार्यालयाकडे फिरकला नाही.
ता.१३-०५-२०२० सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात आणखी तीन जण कोरोनाबाधित झाले असून यामध्ये मिरज होळीकट्टा येथील ६८ वर्षीय महिला तसेच सांगली येथील फौजदार गल्लीतील ४० वर्षीय महिलेचा समावेश आहे.अंकले, ता. जत येथील कोरोनाबाधित ठरलेल्या रुग्णाचा सहकारीही कोरोनाबाधित झाला आहे.कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या ठिकाणी शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ सुरू केल्या असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चालू आहे.या ठिकाणी वैद्यकीय पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
ता.१२-०५-२०२० विटा प्रतिनिधी : "आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून, त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने राहावे, एक तीळ सर्वांनी करंडून खावा, माणसानेच गाणे गावे माणसाचे'' असं "गोलपीठा' कार कवी नामदेव ढसाळ यांनी कवितेत म्हटलं आहे. गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या माणसांच्या जगण्याची कोरोनामुळे घडी विस्कटून गेली आहे. "कोरोना' चा प्रतिबंधासाठी देशभरात लॉकडाऊन जाहिर करण्यात आला. लॉकडाऊनची झळ सामान्यांपासून उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्यांना बसली. हातावर पोट असलेल्यांच्या जगण्याची घडी विस्कटली. त्यांचा प्रत्यय मेंढपाळ महिलांनाही बसला. माणदेशातील लता पुकळे कुकुडवाड व मीरा नरळे या जिगरबाज महिला गावाकडं जाण्यासाठी पायपीट करीत आहेत. लता व मीरा ह्या वाळवा तालुक्यातील शिरगावहून संसारपयोगी साहित्य घोड्यावर लादून गावकडं चालत निघाल्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या. लोकांचे जगणं असहाय्य झाले. लता व मीरा संसार सावरण्यासाठी मुळगावी चालत निघाल्यात.माणदेशातील मेंढपाळ पोटाची खळगी भरण्यासाठी सुपिक भागात जातात. लॉकडाऊन असल्याने ते मुळगावी निघाले आहेत. "कोरोना'मुळे कुणी गावात राहू देईना मेंढ्या जगवण्यासाठी ऊसपट्ट्यातील कागलपर्यंत जातो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गावाकडे जूननंतर गावाकडे येतो. "कोरोना'मुळे कुणी गावात राहू देईना. त्यामुळं गावाकडं निघालोय. - मीरा नरळे, इरळी, ता. माण
ता.१२-०५-२०२० विटा प्रतिनिधी : कोरोना संकटानं मानवाचं कंबरडं मोडलं आहे. जीव भला म्हणत लोकं घरचा आसरा जवळ करीत आहेत. पोटाची भूक शमविण्यासाठी लोकं गावं सोडून पर मुलुखात परागंदा झाले आहेत. परागंदा होणाऱ्यात माणदेशी माणूस देशभरात विखुरला आहे. गलाई व्यावसायिक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. कोरोना संकटात गलाई बांधव अडचणीत आला आणि त्यांना गावाची ओढ लागली. या ओढीनं ते गाव जवळ करीत असताना त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. यात सर्वाधिक त्रास कर्नाटक पोलिसांचा होत आहे. कर्नाटक पोलीस गलाई बांधवांची अडवणूक करू लागले आहेत. माणदेशी मातीची ओळख, महती, थोरवी देशभरात नेऊन पोहचविणारा गलाई बांधव आजमितीला अडचणीत सापडला आहे. काबाडकष्ट करून लौकिक, सधनता प्राप्त करणारा गलाई बांधव अपमान सहन करीत आहे. ही वेळ त्यांच्यावर कोरोनाने आणली आहे. कोरोना संकटात देशभरात हजारो गलाई बांधव अडकून पडले. त्यांच्या वेदना, व्यथांची कळकळ शरद पवारांना आली. माणदेशी इलख्यावर जीव असणाऱ्या पवार साहेबांनी गलाई बांधवांच्या गावी येण्यात पुढाकार घेतला. माझा माणदेशी माणूस स्वगृही आला पाहिजे ही त्यांची भूमिका होती. त्यांच्या प्रयत्नाने गलाई बांधव आपल्या गावी येत आहेत. पण त्यांच्या व्यथांची मालिका सुरूच आहे. कोरोना संकटात गावाची ओढ लागलेल्या गलाई बांधवांना गावाकडं येताना आनंद झाला. पण त्यांच्या आनंदावर विरजण घालण्याचे काम कर्नाटक पोलीस करू लागले आहेत. गलाई बांधव अटी, नियमांचे पालन करून गावचा प्रवास करत असताना, त्यांना कर्नाटक पोलीस नाडण्याचा उद्योग करू लागले आहे. गलाई बांधव खासगी वाहनातून प्रवास करीत आहेत. या वाहनांना कर्नाटक पोलिसांचा जाच सुरू आहे. या वाहनांना रात्री-बेरात्री अडवून उलट-सुलट प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत. वाहनातून खाली उतरवून गलाई बांधव व त्यांच्या कुटुंबांना ताटकळत उभा केले जात आहे. पोलीस बेधडक ‘मलिदा’ मागत आहेत. त्याची पूर्तता केली की वाहने सोडली जात आहेत. कोरोना संकटात माणुसकी दाखवायची सोडून ‘खिसा’ गरम करण्यासाठी गलाई बांधवांना वेठीस धरीत आहेत. महाराष्ट्र पोलीस जीव धोक्यात घालून कोरोना संकटातून लोकांचा बचाव करीत आहेत. मात्र कर्नाटक पोलीस गलाई बांधवांची पिळवणूक करीत आहेत. त्यांच्या या कृतीने गलाई बांधवांत नाराजी आहे.
ता.१२-०५-२०२० जत प्रतिनिधी : जत तालुक्यातील डफळापूर नजिकच्या चेकपोस्टवर पोलिसांसोबत नाकाबंदीच्या ठिकाणी मदतीस म्हणून ड्युटीवर असलेल्या एका शिक्षकाला चेकपोस्टवरून पळालेल्या भरधाव ट्रक चालकाने अंगावर ट्रक घालून चिरडले, त्यात मदतनीस शिक्षक जागीच ठार झाला. नानासाहेब (पिंटू) सदाशिव कोरे वय- 36 रा. डफळापूर (शाळा कोळी वस्ती,डफळापूर) असे ठार झालेल्या शिक्षकांचे नाव आहे. तर संजय बसगौंडा चौगुले वय 30 हा थोडक्यात बजावला. डफळापूर स्टँडनजिक मंगळवारी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास ही ह्रदयद्रावक घटना घडली. शिंगणापूर नजिकच्या आंतराष्ट्रीय चेक नाक्यावर वर हा शिक्षक नियंत्रण कर्मचारी म्हणून सोमवारी रात्रीच्या ड्युटीवर होता. सिमेंटने भरलेला ट्रक कर्नाटकातून जतकडे निघाला होता. घटनेनंतर हणमंत रामचंद्र मुरड (वय 37 रा.नाथाचीवाडी ता. दौंड जि.पुणे), (ट्रक नं.एम एच 12 एल डी 9749) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक मनीषा डुबूले, डीवायएसपी दिलीप जगदाळे, पोलिस निरिक्षक राजाराम शेळके घटनास्थळी भेट दिली. अथनीकडून ट्रक चालक ट्रक घेवुन आला असता त्यास त्या ठिकाणी डयुटीवर असणारे शिक्षक नानासो सदाशिव कोरे वय 35 रा. डफळापुर ता. जत यांनी ट्रकला थांबण्याचा इशारा केला असता, ट्रक चालकाने ट्रक न थांबवता शिक्षक कोरे यांना शिवीगाळ करुन तेथुन निघुन गेला. त्यास परत थांबविण्यासाठी ऑपरेटर चौगले व कोरे यांनी ट्रकचा डफळापूर पर्यंत पाठलाग करुन त्यांनी त्यांची गाडी ट्रकच्या पुढे काढुन गाडी बाजुला लावुन परत ट्रक थांबवण्यास सांगितले असता ट्रक चालकाने ट्रक न थांबवता शिक्षक कोरे याना ट्रकने उडवुन देवुन कोरे यांच्या मृत्युस कारणीभुत झाला आहे.
ता.११-०५-२०२० विटा प्रतिनिधी : साळशिंगे (ता. खानापूर ) येथे तीसवर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. खानापूर तालुक्यात पहिलाच कोरोनाचा रूग्ण सापडल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे.साळशिंगे येथील सहा जणांचे एक कुटुंब चार दिवसांपुर्वी अहमदाबादहून गावी आले होते. स्थानिक ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीने ते रितसर परवानगी घेऊन आलेत का याची चौकशी करून त्यांना शेतातील वस्तीवर क्वारंटाइन करण्यात आले होते.त्यातील एका महिलेला त्रास होऊ लागल्याने तिची विटा ग्रामीण रूग्णालयात तपासणी करण्यात आली. महिलेला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने तिला व तिच्या पतीला प्रशासनाने शनिवारी मिरज सिव्हील हॉस्पिटलकडे संदर्भित करण्यात आले होते.त्यात महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर सदर महिलेच्या पतीचा अहवाल निगेटिव्ह आला असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी साळसिंगे येथे पथक रवाना झाले असून प्रशासनातर्फे अनुषंगिक उपाययोजना तत्काळ करण्यात येत आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.
ता.१०-०५-२०२० आटपाडी प्रतिनिधी : आटपाडी पोलिसांनी सांगली-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील उंबरगाव चेकपोस्ट नाक्यावर कारवाई करीत कर्नाटकातून कराडकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो मधून तब्बल १४ लाख ५२ हजार रुपयांचा बंदी असलेला गुटखा पकडला.याबाबत अधिका माहिती अशी, सांगली-सोलापूर जिल्हा सरहद्दीवर उंबरगाव येथे आटपाडी पोलिसांचे चेकपोस्ट आहे. दि. ७ रोजी रात्री २ वाजता आयशर टेम्पो क्र. एम.एच.४६ बी.एफ. ४२३५ हा उंबरगाव चेकपोस्टवर आल्यावर तेथील पोलीस कर्मचारी पोना अशोक घोरपडे, विशाल चव्हाण, देशमुख यांनी सदर टेम्पो थांबवून तपासणी केली असता टेम्पोच्या काचेवर अत्यावश्यक सेवा, मेडिकल असा स्टिकर लावलेला होता. परंतु आरटीओचा परवाना नव्हता, अधिकृत पत्र काचेवर चिकटवले नव्हते त्यामुळे तपासणी केली असता टेम्पोच्या हौदात मागील बाजूस भुशाची पोती व त्यापुढील बाजूस गुटख्याची पोती असल्याचे आढळून आले. टेम्पोचालक रूपचंद प्रेमचंद पांडे (वय 40, रा. महु, मध्य प्रदेश) याला व 10 लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो व 14 लाख,52 हजार, 288 रुपये किंमतीचा गुटखा ताब्यात घेतला. महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असणारा गुटखा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी मेघना समाधान पवार यांच्या फिर्यादीनुसार आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मनीषा दुबले यांच्या सूचनेनुसार विटा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे व आटपाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलीस उपनिरीक्षक कनकवाडी, पोलीस हवालदार नंदकुमार पवार, पोलीस नाईक खाडे, कराळे, पोलीस शिपाई देशमुखे, मोरे, अतुल माने या पथकाने कारवाई केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.
ता.०८-०५-२०२० जत प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात एकजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी दिली. जत तालुक्यातील हा पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे. त्याचे मुळ गाव अंकले असून तो मुंबई येथे कामाला आहे. टप प्रथम चेंबूर मधून माल वाहतूक ट्रकमधून नागजफाटा येथे आल्याचे समोर आले आहे. तेथून तो अंकलेपर्यत बुधवारी पहाटे चालत आले होते. तेथील नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी अंकले जिल्हा परिषद शाळेत त्यांना क्वारंटाईन केले होते. डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजित चौथे यांच्या पथकाने बुधवारी रात्री त्याची तपासणी केली होती.त्यात एकाची संशयास्पद लक्षणे आढळून आल्याने त्याला मिरजला हलविले होते.तेथे त्यांच्या स्वाबची तपासणीत तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट आले आहेत. त्याने ज्या ज्या वाहनातून प्रवास केला त्या चालकांचे शोध सुरू आहेत. त्याशिवाय ते अन्य कोणाकोणाच्या संपर्कात आले आहेत. याची तपासणी केली जात आहे.
मा. श्री. महादेव सुर्वे (बापु) (सांगली जिल्हातील खानापुर तालुका खंबाळे गावचे सुपुत्र विल्लुपुरम तमिळनाडू येथील जेष्ठ गलाई व्यावसायिक कुस्तीमल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे तमिळनाडू राज्य संपर्कप्रमुख सामाजिक कार्यकर्ते श्री महादेव(बापूं) सुर्वे live येत आहेत ⏰ वेळ - सायंकाळी 5 वा. •••••••••••••••••••••• ज्यांना LIVE पाहता येत नसेल त्यांनी फेसबुक App वर खालील लिंकद्वारे विडिओ पाहून सेटिंग करावी https://youtu.bUe/q70YpTYbVgk
ता.०७-०५-२०२० कडेगाव प्रतिनिधी : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ना. डॉ. विश्वजीत कदम हे अधिकचे सतर्क आणि संवेदनशील आहेत, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत ना. डॉ. विश्वजीत कदम यांनी कोरोना संदर्भात विविध विषयांना स्पर्श केला. यामध्ये राज्यातील परराज्यात अडकून पडलेल्या लोकांसाठी रेल्वे सुविधा उपलब्ध करून द्यावी, शिवभोजन थाळीची संख्या वाढवावी. कोरोनाचं संकट असो वा महापुराचं संकट यात ना. डॉ. विश्वजीत कदम यांनी संवेदनशीलपणे काम केल्याचं दिसून आलं आहे. राज्यात कोरोनाचं संकट भीषण रूप घेऊन असताना, लोकांच्या निगडित प्रश्नावर त्यांनी प्रथमपासूनच आघाडी घेतली आहे. सांगली जिल्ह्यात त्यांनी विविध पातळीवर काम केलं आहे. कोरोना संकटात लोकांना आधार म्हणून त्यांची धडपड दिसून येत आहे. आज मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत ना. डॉ. विश्वजीत कदम यांनी महाराष्ट्र राज्यातून परराज्यात विविध व्यवसायानिमित्त लोक गेले आहेत. लॉकडाऊन काळात ते आपल्या गावी येऊ इच्छितात. त्यांची अडचण आणि भावना जाणून त्यांनी त्वरित रेल्वेची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी केली. राज्यातील जनता उपाशीपोटी राहू नये म्हणून शिवभोजन थाळीची संख्या वाढवावी, हा मुद्दा प्रकर्षाने मांडला. सांगली जिल्ह्यात कोरोना संकटात प्रशासनाचे काम उत्तम असल्याचे ते म्हणाले. जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, आरोग्य विभागाचे काम दक्षतेने सुरू असल्याचे ना. कदम यांनी आवर्जून सांगितले.
ता.०७-०५-२०२० दिघंची प्रतिनिधी : दिघंची येथे ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामनिधी मधून दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य असलेले किट माजी जि.प. सदस्य तानाजी पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.देशामध्ये कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे संचारबंदी असून सर्वत्र लॉकडाऊन असल्याने त्याचा फटका अंध व अपंग बांधव यांना सुद्धा बसला असून जगायचे कसे हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाल्याने दिघंची ग्रामपंचायतीने ५ टक्के ग्रामनिधी मधून त्यांना जीवनावश्यक साहित्य असलेले कीट वाटप केले. यावेळी सरपंच अमोल मोरे, युवा नेते विकास मोरे, मेजर नानासो जावीर, मुन्नाभाई तांबोळी, संजय वाघमारे, बळीराम रणदिवे, अजित रणदिवे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
ता.०६-०५-२०२० कडेगाव प्रतिनिधी : मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या कोतीज तालुका कडेगाव येथील ५५ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली असल्याचे रविवारी समजले .परंतु या कोरोना बाधित व्यक्तीच्या दोन मुली,पुतण्या व पुतण्याची पत्नी व पुतण्याचा मुलगा असे पाच जण आनाधिकृत प्रवास करून २३ एप्रिल रोजी सकाळी कोतीज गावात आले आहेत.यामुळे चिंता वाढली आहे.या पाच जणांसह त्यांच्या कोतीज येथील कुटुंबातील अन्य सहा अशा १२ जणांना कडेगाव येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले आहे. या ११ व्यक्तींचे 'स्वॅब' तपासणीसाठी घेतले जाणार आहेत.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोतिज गावात खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान कोतीज परिसरामध्ये नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे.गावामध्ये अत्यावश्यक सेवेसाठी येणाऱ्या प्रत्येकाची दक्षता समिती व पोलीस यांचेकडून विचारपुस केली जात आहे व कसून तपासणी केली जात आहे.संबंधित कुटुंबाचे घर गावाबाहेर वस्तीवर आहे परंतु त्यांचा गावात कोणाशी संपर्क आला आहे का याची माहिती घेतली जात आहे. दरम्यान त्या वस्तीवरील शेजारच्या अन्य दोन व्यक्तींना होम कोरंटाइन केले आहे. आरोग्य विभागाच्या सेविका व आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन सर्वे करीत आहेत. दरम्यान पाचजण मुंबईहुन अनधिकृत प्रवास करून कोतीजमध्ये आले त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आता खबरदारीच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची कमतरता राहणार नाही याची देखील काळजी घेतली जात आहे. प्रांताधिकारी गणेश मरकड,तहसीलदार डॉ.शैलजा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी अशोक वायदंडे ,पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी सतर्क राहून कोरोना प्रतिबंधासाठी सर्वोतोपरी उपाययोजना करीत आहेत .
ता.०६-०५-२०२० विटा प्रतिनिधी : विट्यापासून जवळच असलेल्या तासगाव रस्त्यालगतच्या कार्वे हद्दीतील महापारेषण कंपनीच्या 220/33 केव्ही अतिउच्च दाब वीज उपकेंद्राला आग लागली. तांत्रिक बिघाड होऊन मोठा स्फोट झाल्याने ही घटना घडली. त्यात महापारेषणचा 50 एमव्हीए क्षमतेचे रोहीत्र जळाले. अंदाजे अडीच कोटी रुपयांचे नुकसान असल्याचे सांगण्यात आले. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. त्यामुळे खानापूर तालुक्यातील वीज पुरवठा काही काळ ठप्प झाला होता. परंतु, युद्धपातळीवर प्रयत्न करून पर्यायी यंत्रणेद्वारे वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.शहरातील कार्वे वीज उपकेंद्राला सायंकाळी मागच्या बाजूला ठिणग्या पडताना काहीजणांनी पाहिले. त्यानंतर प्रचंड मोठा आवाज ऐकू येऊ आला. संपूर्ण वीज उपकेंद्राजवळ आगीच्या ज्वाळा आणि प्रचंड मोठ्या धुराचे लोट बाहेर पडू लागले, तसेच एकामागून एक स्फोटाचे मोठे आवाज आले. त्यामुळे आजूबाजूचा परिसर हादरला. आगीचे रौद्ररूप पाहून घटनास्थळावरून लोक भयभीत होऊन बाजूला पळाले. त्यानंतर विटा पालिका, तासगावहून अग्निशामक बंब मागविण्यात आले. त्यांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळजवले. याबाबत विट्याच्या उपविभागीय अधिकारी विशाल ग्रामोपाध्ये यांनी सांगितले की, हे वीज उपकेंद्र 50 एमव्हीए क्षमतेचे आहे. संपूर्ण खानापूर तालुक्याला त्यातून वीज पुरवठा केला जातो. आता हे केंद्रच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने खानापूर तालुक्यातील वीज व्यवस्था कोलमडली आहे. मोठा अनर्थ टळला विटा - तासगाव रस्त्यालगत च्या कार्वे वीज उपकेंद्राला लागलेली आग तब्बल दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर नियंत्रणात आणण्यात यश आले. विटा पालिकेच्या अग्नीशामन दलाने ही आग आटोक्यात आणली. माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील, नगराध्यक्षा प्रतिभा पाटील आणि मुख्याधिकारी अतुल पाटील यांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ अवघ्या काही क्षणात विटा पालिकेच्या अग्निशमन दलाला सुचना दिल्या. अग्निशामक दलातील कर्मचारी शब्बीर मुल्ला, सत्तार शेख, चनबसय्या स्वामी, सतीश पोटकुळे, रवींद्रजानकर,शरद साबळे यांनी प्राणाची बाजी लावून आगीवर नियंत्रण मिळवत मिळविले.
ता.०५-०५-२०२० सांगली प्रतिनिधी : कृष्णा आणि उपनद्यांना आलेल्या महापुरातून यावर्षी शंभर टक्के धडा घेतला पाहिजे. कोयना आणि वारणा धरणातील पाण्याचा विसर्ग, अलमट्टी धरणातील पाणीसाठी याचे कोटेकोर नियोजन केले पाहिजे. तसे झाले नाही तर पुन्हा एकदा सांगली पाण्यात जाण्याचा धोका राहील, अशी भिती शिवसेनेचे नेते दिगंबर जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.ते म्हणाले, ""गेल्यावर्षी सांगलीत आलेला महापूर महाभयानक होता. आता आपण कोरोनाशी लढतो आहोत. ही लढाई सुरुच राहणार आहे, मात्र सांगलीकरांनी आता महापूर पुन्हा येणार नाही ना, याची भिती वाटू लागली आहे. वातावरण स्वच्छ आहे. पाऊसकाळ वाढेल, असा अंदाज आहे. अशावेळी महापुरातून धडा घेतलाच पाहिजे. त्यासाठी गेल्यावर्षीच्या महापुराबाबत नेमलेल्या वडनेरे समितीचा अहवाल कुठे आहे? तो सादर झाला असेल तर त्यातील सूचनांवर काम का झाले नाही, याची उत्तरे शोधली पाहिजेत.जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्वतः त्यात लक्ष घातले पाहिजे. राष्ट्रीय जल आयोगाने धरणातील पाणीसाठ्यांबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवली आहेत. ती काटेकोर पाळली गेली नाहीत म्हणून गेल्यावर्षी महापुराचे संकट आले. 31 मेपर्यंत धरणातील पाणीसाठी 10 टक्केच असावा, 31 जुलैला तो 50 टक्के असावा, 31 ऑगस्टला तो 75 टक्के असावा, असे नियम आहेत. कोयना धरणाच्या निर्मितीपासून ते दरवर्षी 100 टक्के भरत आले आहे. त्यामुळे पाणीसाठा कायम ठेवण्याची गरज नाही.'' ते म्हणाले, ""कोयना आणि अलमट्टी धरणातील समन्वय आधीपासूनच उत्तम दर्जाचा असायला हवा. गेल्यावर्षी पाटबंधारे विभागाच्या घोडचूका झाल्या. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो, सूचना दिल्या, मात्र त्यांनी चूक केलीच. ती सांगलीला भोगावी लागली. आता तर कृष्णा नदीवरील पुलांची संख्या वाढती आहे. यावेळी महापूर आला तर सांगली उद्ध्वस्त होईल.'' अतिक्रमणे हटवा दिगंबर जाधव म्हणाले, ""महापुराला अनेक कारणे आहेत. त्यात नाल्यांवरील अतिक्रमणे हाही एक भाग आहे. आमचा अतिक्रमणे काढण्यास अजिबात विरोध नाही. महापालिकेने जरूर ती मोहिम राबवावी.''
ता.०४-०५-२०२० कडेगाव प्रतिनिधी : कोतिज (ता. कडेगाव) येथील मुंबईस्थित पंचावन्न वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मुंबईतील रुग्णालयातून सांगली जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आली आहे. याच कोरोनाबाधिताच्या दोन मुली, भाऊ,भावजय व पुतणी अशा एकूण पाच व्यक्ती 23 एप्रिल रोजी विना परवाना कोतीज येथे आल्याने तालुक्यातील खळबळ उडाली आहे.आरोग्य विभागाने मुंबई हून कोतीज येथे आलेल्या पाच जणांसह त्यांच्या कुटुंबातील इतर ५ जणांना आज रात्री उशीरा संस्थात्मक क्वारंनटाईन केले. कोतिजसह तालुक्यातील नागरिकांत पुन्हा प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोतीज येथील दोन भाऊ मुंबई येथे आपल्या कुटुंबियांसोबत राहतात.तर त्यापैकी एका पंचावन्न वर्षीय व्यक्तीला सर्दी, ताप व खोकला जाणवू लागला. त्यामुळे ते मुंबई येथील रुग्णालयात गेले असता तेथील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 30 एप्रिल रोजी त्यांच्या घशातील स्वाईबचे नमुने घेतले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी (ता.1) कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याची माहित आज येथील जिल्हा रूग्णालयाला दिली आहे. दरम्यान, तालुका प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक वायदंडे, पोलिस प्रशासनाने कोतीज येथे जाऊन संबंधीत वस्ती सील केली आहे. तसेच गावातही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तर आरोग्य विभागाने मुंबईहून आलेल्या संबंधित कोरोना बाधीत रुग्णाच्या नातेवाईकांना कडेगाव येथील शासकीय वसतिगृहात संस्थात्मक क्वारंनटाईन केले असून उद्या सोमवारी (ता.4) त्यांच्या घशातील स्वाॅईबचे नमुने घेवून ते मिरज येथे तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.
ता.०४-०५-२०२० नागज प्रतिनिधी : शेतजमिनीतून जाणार्या रस्त्यावरील झाडे काढण्याच्या वादातून नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील नेताजी धोंडीराम गोरे (वय 45) यांच्या घरावर होळकर कुटुंबियांनी हल्ला केला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. शनिवारी दुपारी चाकू, कुर्हाड व तलवारीने केलेल्या मारहाणीत नेताजी गोरे यांचा खून झाला.मुळचे सांगोला तालुक्यातील किडेबिसरी गावची असणारी ही दोन्ही कुटुुंबे गेल्या कित्येक वर्षापासून नागज गावच्या हद्दीत म्हामनाचा मळा येथे वस्ती करून राहतात. नागज व किडेबिसरी गावच्या सीमेलगत नागजपासून सुमारे तीन किलोमीटर उत्तरेला डोंगररांगांच्या पायथ्याला नेताजी गोरे व दादासो होळकर यांची वस्ती आहे. दोघांच्या घरांमध्ये केवळ पाचशे मीटर अंतर असावे. होळकर याने दोघांच्या घरांच्या मधला रस्ता बांध घालून बंद केला होता. त्यामुळे नेताजी गोरे व दादासो होळकर यांच्यात वाद धुमसत होता. दरम्यान, दादासो होळकर यांच्या घरापासून किडेबिसरीकडे जाणारा रस्ता नेताजी गोरे यांच्या शेतातून जातो.होळकर यांच्यामार्फत जे.सी.बी. च्या सहाय्याने रस्त्याच्या आड येणारी गोरे यांच्या शेतातील झुडूपे काढण्याचे काम सुरू होते. नेताजी गोरे यांनी आधी दोन्ही घरांमधील रस्त्यावर घातलेला बांध काढ, मगच माझ्या शेतातून रस्ता कर, असे म्हणत काम थांबवले. यावेळी होळकर व गोरे यांच्यात जोरदार वादावादी झाली.नेताजीचा कायमचा काटा काढायचा, या हेतूने होळकर यांच्या कुटुंबियांनी कट रचला. काही काळायच्या आतच संशयित नितीन दादासो होळकर, बबन दादासो होळकर, दादासो होळकर, नंदा दादासो होळकर, रंजना बबन होळकर, माणिक शिवाप्पा होळकर, आण्णासाहेब किसन होळकर, प्रसाद अभंग होळकर, चेतन रामा होळकर हे कुर्हाडी, चाकू, तलवारी, काठ्या घेऊन आले व नेताजी गोरे यांच्या घरावर हल्ला केला. होळकर यांच्याजवळील हत्यारे बघून नेताजी यांच्या पत्नी कुसुम (वय38), मुलगी कृष्णजा (वय 20) व मुलगा राहुल (वय 19) यांनी त्यांना घरात कोंडले. त्यानंतर जमावाने मुलगा राहुलवर हल्ला केला. राहुलच्या खांद्यावर काठी बसताच माराच्या भीतीने त्याने पलायन केले. नेताजीला घरातून बाहेर काढा, म्हणून जमावाने पत्नी कुसुम, मुलगी कृष्णजा व ऋतुजाला मारहाण करायला सुरूवात केली. त्यानंतर ऋतुजाने वडिलांना बाहेर काढताच होळकर कुटूंबिय त्यांच्यावर तुटून पडले.तलवार, चाकू व कोयत्याने त्यांच्या अंगावर वार केले. या मारहाणीत नेताजी गोरे जागीच कोसळले. नेताजीला मारहाण करताना विरोध करणार्या पत्नी कुसुम, कृष्णजा, ऋतुजा यांनाही जमावाने मारहाण केली.नेताजी गोरे यांच्या खुनामुळे गोरे यांचे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे.
ता.०३-०५-२०२० विटा प्रतिनिधी : खानापूर जि. सांगली येथील तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना तहसील कार्यालयाच्या आवारातच मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, तहसीलदार ऋषिकेत शेळके हे तहसील कार्यालयामधुन काम करून ते बाहेर पडत असताना त्याठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हा आपल्या सहकार्यासोबत त्या ठिकाणी आला व वाळूचा दंड इतका का केला म्हणून वाद घालू लागला. तसेच केलेला दंड कमी करण्याची करण्याची मागणी करू लागला. यावेळी तहसीलदार यांनी मी केलेला दंड मला कमी करण्याचा अधिकारी नाही तुम्ही अपील करा असे सांगताच पैलवान चंद्रहार पाटील व त्याच्या सहकाऱ्याने तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना गाडीत बसत असताना मारहाण केली. मारहाणी नंतर पैलवान चंद्रहार पाटील व त्याचे सहकारी मागील बाजूने पळून गेले. याबाबत तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी विटा पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे.
ता.०३-०५-२०२० झरे प्रतिनिधी : विभुतवाडी (ता. आटपाडी) येथे शारीरिक अंतर ठेवूनच रक्षा विसर्जन करण्यात आले. येथील ज्ञानू मोटे यांचे २९ एप्रिल रोजी निधन झाले होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने लग्न समारंभ, अंत्यविधी, रक्षाविसर्जनाला जास्त लोक जण्यास निर्बंध आहेत. सर्वच ठिकाणी नागरिकांची काळजी घेतली जात आहे. त्यामुळेच मोठे यांचे रक्षाविर्जन थोडक्याच नातेवाईकांच्या उपस्थित करण्यात आले. रक्षा विसर्जनाला येणाऱ्या लोकांमध्ये शारीरिक अंतर ठेवण्यासाठी काळजी घेतली होती. त्यासाठी स्मशानभूमीच्या बाजूच्या मोकळ्या मैदानामध्ये पांढऱ्या रंगाने गोल वर्तुळ काढले होते. यामुळे उपस्थितांनी याच वर्तुळात थांबून रांगेने रक्षाविर्जन केले. परंतु, काहींनी याबाबत अनेक प्रश्न विचारले, कारण ग्रामीण भागांमध्ये याची कल्पना लोकांना जास्त नाही. त्यामुळे पांढऱ्या रंगाचे पर्तुळ पाहून लोक कुजबुजू लागले होते. परंतु नंतर सर्व नागरिकांच्या लक्षात आले की कोरोणाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतर ठेवणे अत्यावश्यक आहे. गावच्या उपसरपंच स्वाती मोटे यांचे सासरे व ग्रामसेवक रामचंद्र मोटे, सुखदेव मोटे(ढोले) यांचे ते वडील होते. रक्षा विसर्जनासाठी भाजप नेते गोपीचंद पडळकर व जिल्हा परिषद सदस्य ब्रह्मानंद पडळकर, सरपंच चंद्रकांत पावणे सर्व ग्रामपंचायत सदस्य व नातेवाईक यांच्यासह अनेक पदाधिकारी ,अधिकारी उपस्थित होते. परंतु शारीरिक अंतर ठेवून रक्षाविसर्जनची पहिलीच वेळ असल्याने लोकांना रक्षाविसर्जन नवके वाटले.
ता.०३-०५-२०२० मायणी प्रतिनिधी : सरकार घव- तांदूळ देतंय; पण नुसत्या धान्याच करायच काय? त्येला काय आई- बाप लागतू का नाय? तेला- मिठासाठी पैका आणायचा कुठणं? रोजगाराअभावी आर्थिक चणचणीने घायकुतीला आलेले लोक असा परखड सवाल विचारत असून, गरजेपुरती आर्थिक मदतही शासनाने करावी, अशी मागणी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाउनने गोरगरिबांच्या हातचे रोजगार गेले. कामच नाही तर त्याचा मोबदला कोण देणार? हात कोरडेच असल्याने हातावरचे पोट असलेल्या अनेक लोकांची उपासमार होऊ लागली. त्यावर उपाय म्हणून शासनाने उपाययोजना केल्या. लोकांना स्वस्त दरात गहू व तांदूळ देण्याची व्यवस्था करण्यात आली. अंत्योदय योजनेंतर्गत रेशन कार्डधारकांना मोफत धान्य वितरणाचे आदेश दिले. लोकांची फसवणूक होऊ नये, यासाठी कायदेशीर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले. परिणामी कायद्याचा धाक व सततच्या जनजागृतीमुळे संबंधित लाभार्थ्यांना धान्य मिळत आहे. समाजातील काही दानशूरही धान्याची पॅकेज, संसारोपयोगी साहित्याची किट वाटत आहेत. काही शहरी व निमशहरी भागात अन्नछत्र सुरू केली असून, त्याद्वारे निराधारांना आधार दिला जात आहे. मात्र, केवळ धान्य मिळालेल्या लोकांना दैनंदिन खर्चाचे कोडे सुटलेले नाही. रोजच्या तेला- मिठासाठी पैसा आणायचा कुठून? ही मोठी समस्या आहे. गेल्या महिना दिड महिन्यामध्ये लोकांच्या हाताला कसलेही काम नाही. त्यामुळे खिसे रिकामेच आहेत. कमी अधिक प्रमाणात सर्व जणच पैशांअभावी नाडलेले आहेत. त्यामुळे उसनवारही कोणी देईनात. स्वस्त धान्य दुकानांतून गरजेपुरते धान्य मिळाले आहे; परंतु धान्य दळण्यापासून ते जेवण तयार करण्यासाठी लागणारे इंधन, गॅस, भाजीपाला व दैनंदिन तेला-मिठाचा अटळ खर्च कशातून करायचा? असा यक्षप्रश्न लोकांसमोर ठाकला आहे. आर्थिक तरतुद करणे अशक्य होत आहे. त्यामुळे केवळ धान्याचा पुरवठा न करता शासनाने दैनंदिन जीवनावश्यक अन्य वस्तूंचाही पुरवठा करावा. कोरोनाचे संकट टळून सर्व व्यवहार सुरळित होईपर्यंत दैनंदिन खर्चासाठीही शासनाने आर्थिक मदत करावी. समाजातील दानशूरांनीही गरजू लोकांना आवश्यकतेनुसार आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे. ""कामधंदा नसल्याने लोकांना सर्वाधिक अडचण आहे ती पैशांची. दैनंदिन खर्च भागविण्यासाठी गरजूंना धान्याबरोबर आर्थिक मदतीचीही आवश्यकता आहे.'' - राहुल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, खातवळ, ता. खटाव
ता.०३-०५-२०२० सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील परराज्यात, परजिल्ह्यात अडकलेलेमजूर, यात्रेकरू, विद्यार्थी, पर्यटक व अन्य कामासाठी अडकलेल्या व्यक्ती यांनी त्यांच्या स्वगृहीयेण्यासाठी, ते ज्या ठिकाणी अडकले आहेत त्या ठिकाणच्या जिल्हादंडाधिकारी यांच्याकडेप्रवासाच्या परवानगीसाठी अर्ज करणे बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तींनी प्रक्रियेस होणाराविलंब टाळण्यासाठी संबंधित जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा, असे आवाहनजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. प्रवासपरवानगीच्या अर्जासाठी गुगललिंकचा वापर करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. परराज्यात, परजिल्ह्यात अडकलेले मजूर, यात्रेकरू, विद्यार्थी, पर्यटक व अन्य कामासाठी अडकलेल्या व्यक्ती यांनी या संदर्भात काही शंका असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील दूरवध्वी क्रमांक 0233-2600500 व मो.क्र. 9370333932, 8208689681 या क्रमांकावर संबंधित व्यक्तींनी संपर्क साधावा. तसेच टोल फ्री क्रमांक 1077 ची संपर्क सुविधा सद्यस्थितीत सांगलीजिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांकरीता उपलब्ध आहे. सदर प्रवासासाठी संबंधित जिल्हादंडाधिकारीयांचे ना हरकत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर त्यांना सांगलीजिल्ह्यात येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडून परवानगी दिली जाईल. या प्रमाणे सांगली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येईल. सदर तपासणी करण्यासाठी जिल्हा स्थलसीमा हद्दीवरील चेक पोस्टवर व आरोग्य पथके नेमण्यात आलेली आहेत. तसेच सदर प्रवाशांना सक्तीने 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात येईल. सांगली जिल्ह्यातून जाण्यासाठी सांगली जिल्ह्यातील संबंधित व्यक्तींनी ते राहत असलेल्या तहसील कार्यालयाच्या ठिकाणी अर्ज करावा. या बाबत काही शंका असल्यास तहसील कार्यालयाच्या दूरध्वनी अथवा ई-मेलवर संपर्क साधावा. त्यानुसार शासन निर्णयामधील सर्व कार्यवाही पूर्ण केल्यानंतर तहसील कार्यालयाकडून त्यांची शिफारस जिल्हाधिकारी कार्यालयास केली जाईल. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रवासासाठी परवानगी संबंधित जिल्हादंडाधिकारी यांना पाठविण्यात येईल. संबंधित जिल्हादंडाधिकारी यांच्याकडून प्रवासासाठी परवानगी दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडून अंतिम परवानगी देण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या कार्यालयाकडून अंतिम परवानगी दिल्यानंतरच सदर व्यक्तीला प्रत्यक्ष प्रवासास सुरुवात करावयाची आहे. परवानगी मिळालेले व्यक्ती ज्या वाहनाने प्रवास करणार आहेत, अशा वाहनांना जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडून प्रवासाचा निश्चित मार्ग कालावधी नमूद करून देण्यात आलेला पास सोबत असणे बंधनकारक असणार आहे. तहसिल कार्यालयाचे नाव, ई-मेल व कंसात फोन नं. पुढीलप्रमाणे. मिरज - [email protected] (0233-2222682), तासगाव - [email protected] (02346-250630), कवठेमहांकाळ - [email protected] (02341-222039), वाळवा - [email protected] (02342-222250), शिराळा - [email protected] (02345-272127), विटा - [email protected] (02347-272626), आटपाडी - [email protected] (02343-221624), कडेगाव - [email protected] (02347-243122), पलूस - [email protected] (02346-226888), जत - [email protected] (02344-246234). या प्रमाणे देण्यात येणारी परवानगी ही जिल्ह्यात घोषित करण्यात आलेल्या व या पुढे वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या कंटेनमेंट झोन मधील व्यक्तींना दिली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. सांगली जिल्ह्यात येण्यासाठी प्रवास परवानगीच्या अर्जासाठी https://sangli.nic.in/notice/for-filling-information-of-tourists-students- pilgrims-workers-others-from-other-states-districts-to-return-to-sangli- district/ या गुगल लिंकचा वापर करावा. सांगली जिल्ह्यातून जाण्यासाठी प्रवास परवानगीच्या अर्जासाठी https://sangli.nic.in/notice/regarding-filling-information-for-tourists- students-pilgrims-workers-others-to-travel-from-sangli-district-to-other- states-districts/ या गुगल लिंकचा वापर करावा.
ता.०२-०५-२०२० कराड प्रतिनिधी : ज्याची भीती होती त्या कोरोना संकटाने शुक्रवारी कराड शहरात प्रवेश केला. कराड उपजिल्हा रुग्णालयातीळ 6 कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यामधील 5 नर्स व एक फार्मासिस्ट आहे. एक महिला रुक्मिणी नगर येथील आहे. व एक जण अगशिवनागर येथील आहे . रुक्मिणी नगर मधील महिलेची प्रसूती शहरातील व्हावळ हॉस्पिटलमध्ये झाली होती. त्यामुळे व्हावळ हॉस्पिटल व उपजिल्हा रुग्णालय पूर्ण सील करण्यात आले आहे. कराड शहरात कोरोनाची दुसरी साखळी सुरू झाल्याने धोका अधिक वाढला आहे. रेड झोन मध्ये गेलेल्या कराड तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 42 वर पोहोचली आहे. कराड उपजिल्हा रुग्णालयात डिलिव्हरीसाठी आलेल्या आगाशिवनगर येथील महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या संपर्कात आलेल्या रुग्णालयातील नर्स व डॉक्टर यांचे नमुने पुणे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यातील 5 नर्स व एक फार्मासिस्ट यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान कराड शहरातील रुक्मिणी नगर मधील एक महिला खासगी ठिकाणी सोनोग्राफी करण्यासाठी गेली असता तिला उपजिल्हा रुग्णालयात जाऊन कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला दिला होता. सदर महिला उपजिल्हा रुग्णालयात गेली. तेथे तिच्या स्त्रावाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट प्राप्त होण्याअगोदरच गुरुवारी शहरातील व्हावळ हॉस्पिटलमध्ये सदर महिलेची प्रसूती झाली. तिला मुलगा झाला आहे . ज्यादिवशी तिची प्रसूती झाली त्याच दिवशी रात्री तिचा कोरोन रिपोर्ट प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे व्हावळ हॉस्पिटलचे प्रशासन हादरले आहे. सदर महिला व तिच्या बाळाला कराड उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे आहे. उपजिल्हा रुग्णालयातील फार्मासिस्टसह 6 कर्मचारी, प्रसूत झालेली रुक्मिणी नगर मधील महिला व आगाशिवनगर येथील एक जण असे 8 जणांचे कोरोना रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्याने कराड तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या 42 वर गेली आहे. उपजिल्हा रुग्णालय व व्हावळ हॉस्पिटल सील करण्यात आले असून हॉस्पिटलचा दीड किमी परिसरात पूर्ण नाकाबंदी करण्यात आली आहे. कोरोनाची दुसरी साखळी सुरू झाल्याने आणि त्याचा शिरकाव कराड शहरात झाल्याने कोरोनाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
ता.०१-०५-२०२० कवठेमहांकाळ प्रतिनिधी : वाळवा-शिराळा तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर आता कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी येथे एक तरूण कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. तो तरूण मूळचा जत तालुक्यातील असून दुधेभावी येथे मामाच्या घरी आला होता. तो तरूण मुंबईतून आला असून तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल संध्याकाळी प्राप्त झाला. त्या तरूणाच्या संपर्कात आलेल्यांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. दरम्यान, गावात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने गाव सील करण्यात आले आहे.
ता.०१-०५-२०२० कलढोण प्रतिनिधी : मायणी तालुका खटाव येथील मायणी- वडूज रोडवर मुख्य चौकालगत असलेल्या सुरेश घोणे यांच्या देशी दारूच्या दुकानातील 57 दारू बॉक्समधील एक लाख 42 हजार 782 रुपयांची दारू तळिरामांनी चोरून नेली. याबाबत मायणी पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत फिर्याद देण्याचे काम सुरू होते.याबाबत कोरेगाव दारूबंदी उत्पादन शुल्क व दुकान मालक यांनी दिलेल्या माहितीनुसार मायणीच्या मुख्य चौकात सुरेश घोणे यांचे दुकान दुय्यम निरीक्षक दारूबंदी व उत्पादन शुल्क कोरेगाव यांनी ता. 21 मार्च रोजी सील केले होते. त्यानंतर मायणी व परिसरातील तळिरामांची गोची झाली होती. अखेर दारूची तलफ भागविण्यासाठी चोरट्यानी लॉकडाउनमध्ये दारूचे दुकान फोडून अनलॉक केले. रात्री मायणीत पहारा देणाऱ्या गुरखामार्फत पोलिस पाटील यांना घोणे यांच्या दुकानात चोरी झाल्याचे समजले. त्यानंतर पोलिस पाटील यांना चोरटे दिसूनही आले. त्यांचा पाठलाग केला. मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे दोन दुचाकीवर पलायन करण्यात यशस्वी झाले. त्यानंतर दुकान मालक घोणे यांनी दुकानात हजेरी लावल्यानंतर चोरट्यांनी दुकानातील छताचा पत्रा उचकटून व शिडीच्या मदतीने दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील एकूण 57 बॉक्स चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यात 750 मिलीच्या 46 हजार 764 रुपयांच्या 216 बाटल्या, 180 मिलीच्या 90 हजार 740 रुपयांच्या 1745 बाटल्या व 90 मिलीच्या पाच हजार 278 रुपयांच्या 203 बाटल्या असा एकूण एक लाख 42 हजार 782 रुपयांचा माल पळवून नेल्याची माहिती महेश गायकवाड दुय्यम निरीक्षक दारूबंदी व उत्पादन शुल्क कोरेगाव यांनी दिली. सदर घटनेची फिर्याद दुकानमालक रात्री उशिरापर्यंत सुरू होते. चोरट्यांची हुशारी? या चोरीत एकूण दारूचे 57 बॉक्स चोरीस गेले असून, एकदम एवढे बॉक्स कसे काय नेले? हा प्रश्न उपस्थित झाल्यावर गेल्या काही दिवसांपासून ही चोरी सुरू असावी, असा अंदाज पोलिस व प्रत्यक्षदर्शींकडून व्यक्त केला जात आहे.
ता.०१-०५-२०२० सांगली प्रतिनिधी : आज आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचेवतीने देशातील सर्व जिल्ह्यांचे रेड, ऑरेंज आणि ग्रीन या ३ झोनमध्ये वर्गीकरण करुन यादी जाहीर केली. त्याबद्दलचे पत्र आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या सचिव प्रीती सुदन मॅडम यांनी दिले. यामध्ये सांगली जिल्ह्याचा ऑरेंज झोनमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. सुरुवातीला सांगली जिल्ह्यामध्ये १५ पेक्षा जास्त रुग्ण आढळल्याने सांगली जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये केला गेला असल्याचे निदर्शनास आले होते. परंतु सांगली जिल्ह्यातील २६ रुग्न हे पूर्ण बरे झालेले असून सांगली जिल्ह्याला रेड झोनमध्ये समाविष्ट न करता ऑरेंज झोनमध्ये समाविष्ट करणेबाबत खासदार संजयकाका पाटील यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचेकडे मागणी केली होती. तसेच त्यांचेकडून राज्य शासनाकडेही त्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. या वर्गीकरण यादीनुसार महाराष्ट्रातील १४ जिल्हे रेड झोनमध्ये, १६ जिल्हे ऑरेंज झोनमध्ये आणि ६ जिल्हे ग्रीन झोनमध्ये समावेश आहे. सांगली जिल्ह्याला यामुळे आता ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतींचा लाभ होणार आहे.
ता.३०-०४-२०२० जत प्रतिनिधी : तामिळनाडूतील कोईमतूर येथे सोने-चांदीच्या दुकानात काम करणारे कामगार व त्यांच्या कुटुंबातील पाच जण वाहनाने जत तालुक्यातील पाच्छापूर फाटा येथे आले होते त्यांच्या मूळ गावी आंबवडे तालुका खटाव येथे जात असताना जत प्रशासनाने पाच जणांवर राष्ट्रीय आपत्ती कायदा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.हे पाच जण जत मधून आंबवडे या मूळ गावी निघाले होते . रावळगुणवाडी येथील सरपंचांना ही माहिती समजल्यावर त्यांनी प्रशासनाला कळविले प्रशासनाने या सर्वांना स्थानबद्ध करून भारती हॉस्टेलमध्ये ठेवले आहे. याप्रकरणी विमल पिंगळे वय 55 ,शंकर जंजाळे वय 25, बालाजी रमेश देवकर वय 18 ,अजित यशवंत जंजाळे वय 20, रोहिणी जोंधळे वय 21 सर्वजण रा.आंबवडे ता .खटाव अशी या सर्वांची नावे आहेत. या पाच जणांवर विनापरवाना प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची फिर्याद मंडल अधिकारी संदीप मोरे यांनी पोलिसात दिली होती. प्रशासनाने सर्वांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले आहे.
ता.२९-०४-२०२० आटपाडी/प्रतिनिधी : सध्या देशामध्ये व राज्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे संचारबंदी लागू करण्यात आली असून संपूर्ण देशच लॉकडाऊन करण्यात आला आहे. प्रत्येकजण या संकटावर मात करण्यासाठी आपापल्या परीने योगदान देत आहेत. शेटफळे ता. आटपाडी, जि.सांगली येथील युवा उद्योजक शिवप्रताप गायकवाड यांचा भाचा कु. सौरभ भोसले याने कोरोना या विषाणू वर मात करण्यासाठी त्याने फुट प्रेस सॅनिटाइजर या उपकरणाची निर्मिती केली आहे. या उपकरणामुळे हाताचा सॅनिटायझर च्या बाटलीला कोणताही स्पर्श न करता केवळ पायाने पैडल दाबल्यास त्याद्वारे हातवर सॅनिटायझरची फवारणी होणार आहे. त्यामुळे कितीही लोकांना या उपकरणाद्वारे सॅनिटायझरची फवारणी केली असता संसर्ग टाळता येणार आहे. सौरभ भोसले यांच्या या उपकरणाचे कौतुक आंध्रप्रदेश सरकारने केले आहे. या उपकरणाला राज्यातून मागणी होत आहे. राज्यातील तसेच देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीने या उपकरणाची खरेदी करून गावातील प्रत्येक चौकात व गल्लीत हे उपकरण उभा करून त्यास सॅनिटायझरची बाटली लावल्यास लोकांना त्याचा फायदा होणार आहे व कोरोनाचा फैलाव कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या सौरभ भोसले हा राजारामबापु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर येथे शिक्षण घेत आहे.
नँशनल गोल्ड सिल्व्हर रिफायनरी & ज्वेलर्स आसोशीयन यांचे वतीने galaipariwar.com चे संस्थापक श्री. मधुसिंग ऊपाध्ये व सहकारी रावसाहेब पाटील यांच्या चांगल्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
७. संपूर्ण भारतभर गलाई व्यावसायिकांपैकी ९०% गलाई व्यावसायिक हे खानापूर , आटपाडी , कवठेमहांकाळ , तासगाव , मान, खटाव , सांगोला व मंगळवेढा या आठ तालुक्यातील आहेत. त्यामुळे या आठ तालुक्यांना "सुवर्ण क्रांती" तालुके म्हणून घोषित करावे जेणेकरून या तालुक्याची देशभर एक वेगळी ओळख निर्माण होईल. ८. महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या व्यावसायिकांचा धंदा गेले ३०-४० वर्ष एकाच ठिकाणी सुरु आहे. कालांतराने शहरीकरण झाल्यामुळे सध्या हा व्यवसाय करण्यास पर्यावरण खात्याच्या जाचक अटींमुळे व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थिती मध्ये व्यावसायिकांकडून योग्य ते पर्यावरण रक्षणा संदर्भात हमीपत्र घेऊन व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. अगदीच दुर्मिळ स्थिती मध्ये काही अटींमुळे त्या जागचा व्यवसाय थांबवावा लागला तर व्यावसायिकांना सरकारने पर्यायी जागा नजीकच्या परिसरामध्ये उपलब्ध करून द्यावी जेणे करून व्यावसायिकाची ग्राहक तुटण्याची भीती दूर होईल. ९. भविष्यात सरकारी सोन्याच्या खाणीतून काढलेल्या सोन्याचे शुद्धीकरण हे गलाई व्यावसायिकांकडून करून घ्यावे. हि प्रक्रिया टेंडर पद्धतीने करावी व त्यासाठी नियम व नियमावली करावी. हि टेंडर प्रक्रिया राबवताना काही काळजी घेण्यात यावी जेणे करून सर्व राज्यातील व्यावसायिकांना फायदा होईल. हा मुद्दा आपण केंद्र शासनाकडे धोरण ठरवण्यापूर्वी मांडावा. १०. इतर राज्यामध्ये राहायचा , व्यावसायिक जागेच्या भाडेचा , शिक्षणाचा व इतर खर्च अधिक असल्यामुळे जे व्यावसायिक करपात्र नाहीत अश्या व्यावसायिकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी उभे राहावे हि नम्र विनंती. वरील सर्व हक्काच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील अशी आशा करतो.
श्री. अमोल मच्छिंद्रनाथ देशमुख B.E , MBA १२ , सैख्यदा कॉलनी , सावंतपूर वसाहत . ता. पलूस , जि. सांगली ४१६३०८ मो.नं ९९७५३७६००० प्रती , मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस , मुखमंत्री , महाराष्ट्र राज्य , मा. महोदय सुवर्ण गलाई व्यवसायासाठी केंद्र सरकार धोरण ठरवणार आहे. यासाठी समिती हि बनवण्यात येणार आहे. समिती बनवत असता त्यामध्ये गलाई व्यासायीकांच्या हिताचे खालील नमूद केलेल्या मुद्यांचा समावेश करावा. अशी सर्व गलाई व्यावसायिकांची विनंती आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने खालील सर्व मुद्दे नवीन येणाऱ्या धोरणामध्ये समाविष्ट करून घ्यावेत अशी शिफारस केंद्र शासनाकडे करावी. संपूर्ण भारतामध्ये एकून एक लाख गलाई व्यावसाईक आहेत. तसेच या व्यवसायावरती दहा लाख लोक अवलंबून आहेत. विशेष गोष्ट हि कि संपूर्ण भारत वर्षात असलेले हे व्यावसाईक सांगली व सोलापूर जिल्हयामधील असणाऱ्या खानापूर , आटपाडी , कवठेमहांकाळ , तासगाव , मान , खटाव , सांगोला व मंगळवेढा या आठ तालुक्यातील आहे. सोने वितळून ते शुद्ध करून देणे हे गलाई व्यासायीकांचे मूळ काम. या व्यतिरिक्त अनेक सोने , चांदी संदर्भात जोड काम हे बांधव करतात. नवीन आलेल्या तंत्रज्ञानाने तसेच जागतिक मंदी मुळे गलाई व्यवसायावर अत्यंत वाईट संकट आले आहे. पण तरीही सर्व गलाई बांधव अत्यंत जिद्दीने उभे राहिले आहेत आणि येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देत आहेत. आपल्या मूळ गावापासून , परिवारापासून दूर राहून इतर राज्यामध्ये गलाई व्यावसाईक सेवा पुरवीत आहेत. आपल्या गलाई बांधवानी महाराष्ट्रचे नाव भारतभर करून दाखवले आहे. शिवजयंती असो, महाराष्ट्र दिन कि गणेश चतुर्थी , इतर राज्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात व लाखोच्या उपस्थिती मध्ये हे सन साजरे केले जातात. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत गलाई व्यावसायिकांचे जाळे पसरले आहे.